गॅरी कॅस्पारोव्ह हा माजी रशियन बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ता. एलो मानांकनानुसार इ.स. १९८६ ते २००५ पर्यंत बुद्धिबळातील प्रथम मानांकन सतत मिळविण्याचा विक्रम त्याने केला. सलग स्पर्धा आणि चेस ऑस्कर जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. १९६३ साली या महान बुद्धिबळ खेळाडूचा जन्म मॉस्कोजवळच्या गावात झाला. १९८५ मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी गॅरीने तत्कालीन बुद्धिबळ विजेता अनातोली कार्पोव्ह याच्यावर मात करून आपल्या पहिल्या जगज्जेतेपदाची नोंद केली. त्यानंतर १९८६, १९८७ आणि १९९० मध्ये पुन्हा अनातोलीवर मात करून स्वत:कडे विश्वविजेतेपद त्याने राखले. पुढे १९९३ मध्ये निगेल शॉट याचा तर १९९५ मध्ये विश्वनाथन आनंद याचा पराभव करीत विश्वविजेत्याचा मान गॅरीने मिळवला. बंडखोर स्वभावाच्या गॅरीचे ‘फिडे’ या जागतिक बुद्धिबळ संघटनेशी मतभेद झाल्यावर १९८६ मध्ये त्याने ग्रँडमास्टर्स असोशिएशन या वेगळ्या बुद्धिबळ संघटनेची स्थापना केली. बुद्धिबळ खेळाच्या प्रसारासाठी गॅरीने जगभर िहडून बरेच कार्य केले. इस्रायल, फ्लोरिडा, जर्मनी इत्यादी देशांमध्ये त्याने बुद्धिबळ अकॅडमी स्थापन केल्या. मार्च २००५ मध्ये गॅरी कॅस्पारोव्हने व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती स्वीकारली. त्यापुढे त्याने लेखन आणि राजकारण या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. सध्या वृत्तपत्रीय स्तंभलेखक म्हणून नाव झालेल्या गॅरीने मॉस्कोमध्ये संयुक्त नागरी आघाडी (युनायटेड सिव्हिल फ्रंट) स्थापन केली आहे. अलीकडे ‘द अदर रशिया’ या सध्याच्या रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांच्या विरोधकांच्या आघाडीत म्हणजे व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकांच्या आघाडीत गॅरी सामील झालाय. २००८ मध्ये झालेल्या रशियन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठी तो सुरुवातीस उमेदवार म्हणून उभा होता. परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या काही औपचारिकता तो पूर्ण करू न शकल्याने निवड मंडळाने त्याला बाद केले. युरोप अमेरिकेत गॅरी याला रशियन अध्यक्ष पुतिन यांचा कट्टर विरोधक मानण्यात येते, परंतु रशियात गॅरीला पुरेसा जनाधिकार नाही. सध्या गॅरीचे वास्तव्य न्यूयॉर्कमध्ये आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

निशिगंध

सुवासिक फुले असणाऱ्या वनस्पतींमधील निशिगंध ही एक महत्त्वाची वनस्पती. Polianthes tuberosa हे या वनस्पतीचे शास्त्रीय नाव. झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची एक ते दीड मीटर एवढी असते. मुळात परकी असली तरी आज ही वनस्पती जगातील सोळा देशांमध्ये प्रामुख्याने आढळते. भारतातील मुख्यत: पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम या राज्यांत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून लागवड केली जाते. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे, सांगली हे जिल्हे निशिगंधाच्या लागवडीमध्ये अग्रेसर आहेत. एकबीजपत्री या प्रकारातील या वनस्पतीची लागवड करताना कंद जमिनीत खोलवर पुरतात. मार्च ते मे हे दोन महिने निशिगंधाच्या लागवडीसाठी योग्य समजले जातात. या वनस्पतीची पाने साधी लांब आणि गडद हिरव्या रंगाची असतात. या वनस्पतीच्या पानांचे निरीक्षण केल्यास त्याच्या पानातील शिराविन्यास हा समांतर प्रकारातील आहे. अशा प्रकारची रचना असलेली पाने एकबीजपत्री या गटात मोडतात. या गटातील वनस्पतींना फांद्या नसतात. फुले खोडसदृश दांडय़ाच्या टोकावर येतात. दांडय़ावर जास्तीत जास्त ३० फुले असतात. दांडय़ाच्या खालच्या भागातील फुले आधी उमलतात, त्यानंतर त्याच्या वरची आणि सर्वात शेवटी टोकाकडील फुले उमलतात. नळीसारख्या आकारातून पांढऱ्या रंगाच्या सहा पाकळ्या वर आलेल्या असतात. अशा प्रकारची विशिष्ट रचना असल्यामुळेच या फुलांना इंग्रजीत टय़ुबरोझ असे म्हटले जाते.

बंगळुरूमधील हॉर्टिकल्चर संशोधन केंद्रात निशिगंधाच्या वेगवेगळ्या जातींवर प्रयोग आणि संशोधन करून नवीन वाणे विकसित केली गेली आहेत.

एकेरी पाकळ्या असलेली निशिगंधची फुले आपल्याला नेहमी बघायला मिळतात. या प्रकारची फुले असलेली जात शृंगार या नावाने ओळखली जाते. त्याचप्रमाणे दुहेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले सुहासिनी या नावाने कृषी क्षेत्रात परिचित आहे. सोनेरी रंगाच्या दुहेरी पाकळ्या असलेले  निशिगंधाचे एक वाण लखनौ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्रात तयार केले आहे.

फुलातील तेलाचा उपयोग अरोमा उपचारासाठी केला जातो. तसेच या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही होतो. फुलाची गुणवत्ता, गंध यामुळेच निशिगंधाला व्यापारी पिकाचे महत्त्व आहे.

सुचेता भिडे (कर्जत)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org