२००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला लागले, घशापाशी जळजळ झाली. बरेच दिवस तेथील प्रदूषणं-नियंत्रकांना हा उपद्रव नेहमीप्रमाणे मोटारकारच्या धुरांडय़ातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होतोय असे वाटले. पण अमेरिकन वैज्ञानिक राथर याने केलेल्या संशोधनातून त्याला जे आढळून आले ते आश्चर्यजनक होते. शहरात वापरल्या जाणाऱ्या लाखो एल.पी.जी. सिलेण्डरमधून त्या काळात गळणाऱ्या वायूमुळे तसेच हे सिलेण्डर ज्या टाकीतून भरले जातात त्या टाकीतूनही गळती होते, त्याचा हा एकत्रित परिणाम होता. त्यांचे हे निष्कर्ष त्यांनी प्रख्यात विज्ञान मासिक सायन्समध्ये छापले. तोवर सरकारने मोटारगाडय़ांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले होते, पण त्या वेळी एल.पी.जी. सिलेण्डर हा मुद्दा त्यात नव्यानेच आला. १९९५ सालाच्या सुमारास दिल्लीत मोटारगाडय़ांच्या प्रदूषणाचा मुद्दा महत्त्वाचा होता. पण नंतर तेथे गाडय़ांना नॅचर गॅस सक्तीचा झाल्यावर ते प्रदूषण कमी झाले. तोच प्रयोग मुंबईत केल्यावर येथेही तो यशस्वी झाला.
मेक्सिको शहरात २००३ साली २० लाख टन एल.पी.जी. वापरला गेला. तेथे स्वयंपाकघरातील इंधन आणि घरे गरम करण्यासाठी इंधन म्हणून एल.पी.जी. वापरला जातो. मुंबईत घरे गरम करावी लागत नसल्याने एवढा एल.पी.जी. लागत नाही. शिवाय तेव्हा मेक्सिकोची लोकसंख्या २ कोटी होती, तर आता २०१४  साली मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आहे. ‘पेमेक्स’ नावाची कंपनी मेक्सिकोत एल.पी.जी. वायू विकत असे. त्यांनी या वायूचे ज्वलनाचे गुण तेच ठेवून हा वायू हवेत पसरला तरी तो उपद्रवकारक होणारा नाही म्हणून संशोधन सुरू केले. शेवलांड नावाच्या शास्त्रज्ञाने १९९२ ते १९९५ मध्ये घेतलेल्या मेक्सिको शहरातल्या हवेचे २०० नमुने गोळा केले आणि त्यात एल.पी.जी.चे घटक असलेले ब्यूटेन आणि प्रोपेन सापडले. दिल्लीला दाट धुके असते. अशा प्रदूषणापासून जपायला हवे.
अ. पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – कुछ दिलने कहा
आपण स्वत:शी बोलतो ते कोण ऐकतं? आपण ऐकतो तेव्हा कोण बोलतं? आपला स्वत:शी संवाद होतो तो कोणत्या भाषेत? आपल्या संवादामधली भाषा आपल्याला समजते का? आपलं बोलणं आपल्याला कळतं का? की आपण दुसऱ्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करतो, तसं आपलंही ऐकत नाही?
शब्दात बोलावं की सुरात गुणगुणावं? संदिग्ध प्रश्न आणि त्याची अनिश्चित उत्तरं, हाच आपला संवाद! कुछ दिलने कहा, कुछ भी नहीं, ऐसी ही बाते होती हैं। ऐसी भी बाते होती हैं.. हे अनुपमा चित्रपटातलं लतादीदीनं गायलेलं स्व. हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आजमी यांचं गाणं ऐकता ऐकता भावविभोर व्हायला होतं.
मनाला बोलल्यासारखं वाटलं खरं, पण कोणी बोललं नाही, मनानं काहीतरी ऐकलं, पण बोललं मात्र कुणी नव्हतं. आपल्याच मनाचे हे खेळ! असं असतं का? असतात खऱ्या काही अशा गोष्टी आणि होते खरी अशी बातचीत. अशा असतात मनाच्या गजाली. आत्ममग्न होऊन गुणगुणल्यासारखं म्हटलेल्या या गाण्यानं मुग्ध व्हायला होतं. एका न उमललेल्या फुलाचे हे नि:श्वास आहेत. न फुललेल्या कळीचे श्वास आहेत असा भास होतो.
संपूर्ण गाण्यावर अस्फुटपणाची उत्स्फूर्त गाज आहे. व्यक्त व्हायला उत्सुक असलेल्या भावना विरून जातात. कोणीतरी ऐकायला उत्सुक असल्याचा भास होतो आणि भावना विरून गेल्याने त्या व्यक्तीचा विरस झाल्याची चुटपुट लागल्याची नकळत जाणीव होते. आपल्या इच्छा निदान डोळ्याद्वारे तरी सांगाव्या म्हणजे कोणाला तरी समजून त्यालाही सुकून मिळेल असं वाटतं. अजब भावनांच्या सावल्यांचे खेळ आपलंच मन आपल्याशी खेळतं. कसं असतं ना माणसाचं, याच मनाची समजूत घालण्याकरिता तात्पुरतं समाधान करण्याकरता भावनांचे फुलोरे उधळायचे. आपलं आयुष्य तर या लटक्या वसंतात फुलून आलं नाही. हेदेखील कळलं नाही की या कळ्यांच्या गालावर स्मितरेषा आहे, की ओघळलेल्या अश्रूंची उभी रेघ आहे, असंही असतं आयुष्य..
शर्मिला टागोरनंदेखील हळुवारपणे हे गाणं अभिनीत केलंय. उंच उंच झाडांच्या रेखाकृतीमध्ये शुभ्रवस्त्रांकित शर्मिला पाहणं अतिशय हृद्य वाटतं. गाण्याच्या चित्रीकरणालादेखील आत्मरततेची डूब आहे. दीदींनी गातानादेखील असाच आत्मचिंतनात बुडून गेलाय.
पण मित्रा, या गाण्यातल्या ‘पलकों की ठंडी सेज पर, सपनों की परिया सोती हैं’ या काव्यचरणानं मात्र अंगावर रोमांच येतात. ठंडी पलकों पर निजलेल्या स्वप्नांतल्या पऱ्या त्या नायिकेइतक्याच विश्रब्ध आहेत. पऱ्या आहेत, पण झोपलेल्या, पलकें आहेत, पण ती आसुसलेपण संपून थंड झाली आहेत अशी.. असून नसल्यासारखं आणि नसून असल्यासारखं.. असं असतं आपलं मन कधी रितं वाटलं तर गाणं ऐकावं. त्या रितेपणातलं अवकाश दीदींच्या स्वरांना अपुरा होतो.. सहजपणे.
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – सर्व सत्तांहून तज्ज्ञसत्ता ही श्रेष्ठतर
‘‘गेल्या दीडशें वर्षांत युनायटेड स्टेट्स, ग्रीस, जर्मनी, इटली, रुमानिया, बल्गेरिया, जपान इत्यादि अनेक देशांतील लोकांनीं थोडेंफार स्वातंत्र्य व स्वराज्य मिळविलें. ही मिळकत त्या त्या देशांतील बहुतेक अधिकतर लोकांच्या देशप्रीतीचें, समाजप्रीतीचें व स्वत:वरील प्रेमाचें फळ आहे. अधिकतर लोकांनीं आपल्या वैयक्तिक हितसंबंधावर थोडेंफार पाणी सोडिलें नसतें तर त्या त्या देशांतील स्वार्थत्यागी लोकांना मिळालेलें दिसतें तेवढेंहि स्वातंत्र्य व स्वराज्य खचित मिळालें नसतें. पण नुसत्या एकटय़ा स्वार्थत्यागानेंच स्वराज्याची व स्वातंत्र्याची उपलब्धि होते अशी समजूत करून घेण्यांत हांशील नाहीं. स्वार्थत्यागाचा योग्य परामर्श घेणारें कौशल्य जर देशांत निपजलें नाहीं तर त्याग गाभटतो व जिवंत स्वातंत्र्याला प्रसवण्यास असमर्थ ठरतो. ईश्वराच्या कृपेनें व समाजाच्या पुण्याईने त्या त्या देशांत योग्य वेळीं कर्मकुशल असे राजकारणधुरंधर खंदे पुरुष निर्माण झाले आणि लोकांच्या स्वार्थत्यागाला त्यांनीं स्वराज्याचें रूप आणलें.’’  
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९१५ साली प्रातिनिधिक राज्यपद्धतीपेक्षा तज्ज्ञसत्तेचे सामथ्र्य अधिक उपकारक असते, असे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. ते लिहितात -‘‘मिळविलेलें स्वातंत्र्य व उभारलेलें स्वराज्य चालविण्याचा एक धोपट मार्ग गेल्या दीडशें वर्षांत युरोपांत व अमेरिकेंत सरसहा स्वीकारलेला दिसतो. हा मार्ग म्हणजे प्रतिनिधिसत्ताक पद्धतीनें राज्य चालविणें.. वस्तुत: पाहतां सत्ता तज्ज्ञ अशा नि:स्पृह कार्यकर्त्यां लोकांच्या हातीं ठेवली, तर स्वातंत्र्य व सुराज्य ह्य़ांचा अवतार राष्ट्रांत उत्तमोत्तम तऱ्हेनें होईल. प्रतिनिधिसत्तेंत जसे लोक तसे त्यांनीं निवडून दिलेले प्रतिनिधि असतात. लोक अज्ञ, दारूबाज, हक्कांची जाणीव नसणारे व अशास्त्रज्ञ असले तर त्यांनीं निवडलेले प्रतिनिधि तज्ज्ञ, सदगुणी व शास्त्रज्ञ असूं शकणें प्राय: असंभवनीय असतें.. राज्यसत्ता, महाजनसत्ता, व्यापारीसत्ता, प्रतिनिधिसत्ता इत्यादि सर्व सत्तांहून तज्ज्ञसत्ता ही श्रेष्ठतर आहे व ही उत्पन्न करण्याकडे जो मुत्सद्दी आपली करामत खर्चितो त्याला उत्तम राष्ट्रकार्यधुरंधर म्हणतां येईल. ’’