हॅन्स ओरस्टेड या डॅनिश संशोधकाने १८२०मध्ये वीज वाहणाऱ्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असल्याचे सिद्ध केल्यावर, इंग्लंडच्या मायकेल फॅरडेसह अनेकांनी यावर संशोधन सुरू केले. मायकेल फॅरडेचे उद्दिष्ट आता उलटे होते – चुंबकीय क्षेत्रापासून वीज निर्माण करण्याचे! १८३०च्या दशकातील काही अयशस्वी प्रयोगांनंतर, १८३१ सालाच्या उत्तरार्धात फॅरडेला यश आले. फॅरडेच्या या ऐतिहासिक प्रयोगांचे निष्कर्ष लंडनच्या रॉयल सोसायटीने १८३२ मध्ये प्रसिद्ध केले.

आपल्या पहिल्या प्रयोगात फॅरडेने एका लाकडी सिलिंडरभोवती तांब्याची, काही मीटर लांबीची तार काळजीपूर्वक गुंडाळली. या तारेतील वेटोळ्यांचा एकमेकांना स्पर्श होऊ  नये म्हणून दोन वेटोळ्यांमध्ये त्याने दोरा ठेवला. त्यानंतर या तारेची टोके त्याने विद्युतप्रवाह मोजणाऱ्या साधनास जोडली. या तारेवर त्याने एक कापड गुंडाळले व त्यावर त्याने दुसरी काही मीटर लांबीची तार, पहिल्या तारेसारखीच काळजी घेऊन गुंडाळली. या तारेची टोके फॅरडेने एका विद्युतघटास जोडून तो पुन:पुन्हा चालू-बंद करून पाहिला. काहीच घडले नाही! नंतर याच प्रयोगात त्याने वेगवेगळ्या लांबीच्या तारा वापरून पाहिल्या, तसेच अधिक शक्तीशाली विद्युतघट वापरून पाहिला. यानंतर मात्र विद्युतप्रवाह चालू-बंद करताना दुसऱ्या तारेत विद्युतप्रवाह निर्माण होऊ  लागला. विद्युतप्रवाह चालू वा बंद करताना विद्युतक्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे, ओरस्टेडच्या शोधानुसार पहिल्या तारेभोवती बदलते चुंबकीय क्षेत्र निर्माण होत होते. हे बदलते चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या तारेत विद्युतप्रवाह निर्माण करत होते. फॅरडेने पुढील प्रयोगात या तारा, लाकडी सिलिंडरऐवजी लोखंडाच्या कडय़ाच्या अध्र्या-अध्र्या भागावर गुंडाळल्या. यातून निर्माण होणारा विद्युतप्रवाह हा अतिशय तीव्र होता.

तारेत विद्युतप्रवाह निर्माण होण्यासाठी चुंबकीय क्षेत्र हे बदलते असावे लागते, हे फॅरडेने जाणले. त्यासाठी आता त्याने विद्युतप्रवाह चालू-बंद करण्याऐवजी तो चालूच ठेवून, त्याला जोडलेल्या तारा एकमेकांपासून पुढे-मागे करून पाहिल्या. चुंबकत्वाच्या बदलत्या तीव्रतेमुळे आताही विद्युतप्रवाह निर्माण झाला. त्यानंतर त्याने एका स्थिर लोहचुंबकाच्या सान्निध्यात धातूची चकती ठेवून ती जोराने गोल फिरवली. धातूच्या चकतीच्या सापेक्ष चुंबकीय क्षेत्र बदलू लागले. त्यामुळे विद्युतप्रवाहाची निर्मिती होऊ  लागली. विद्युत जनित्राचा (डायनॅमो) हा प्राथमिक अवतार होता. कालांतराने या जनित्राचा विद्युतनिर्मितीसाठी अनेक ठिकाणी वापर केला जाऊ  लागला.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org