इटालीमध्ये वायव्येला, लिगुरियन समुद्राकाठचे जिनोआ शहर ही लिगुरिया प्रांताची राजधानी आहे. समुद्रकिनारपट्टीवरील ३० कि.मी. लांबीच्या पट्टय़ामध्ये वसलेल्या जिनोआची सध्याची लोकसंख्या ६ लाख ५० हजार आहे आणि २४० चौ.कि.मी.ची व्याप्ती आहे. शहराच्या जन्मापासून व्यापारी, गजबजलेले बंदर असल्याने जिनोआ शहर हे जागतिक व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. इटालीतील कुठल्याही सागरी बंदराहून अधिक मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या बंदरातून होत असल्यामुळे शहराच्या उत्पन्नाचे ते एक प्रमुख साधन झालेय. जिनोआ बंदरातूनच इटालीची ऑलिव्ह ऑइल, वाइन, सुती आणि रेशमी वस्त्रांची प्रमुख निर्यात होते. तसेच जिनोआ बंदरातून कच्चे तेल, कोळसा आणि धान्याची आयात होते. मध्य युरोपियन देशांना जिनोआ बंदर जवळचे आणि सोयीचे असल्याने तिथे सतत जहाजांची ये-जा चालू असते. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या बॉम्बिंगमुळे जिनोआ बंदरातील साधनसामग्रीचे बरेच नुकसान झाले आणि त्यानंतर १९५४ साली झालेल्या मोठय़ा वादळांनी ते बंदर वर्षभरासाठी बंद ठेवावे लागले. पण इटालियन सरकारने ते बंदर पूर्णपणे नव्याने बांधून त्याचे आधुनिकीकरण केले आहे. बंदरामुळे जिनोआचा विकास होऊन ते एक महत्त्वाचे व्यापारी आणि औद्योगिक केंद्रही बनलेय. येथील सिमेंट, लोखंड आणि पोलाद, खते, जहाज बांधणी, वाहन उद्योग, कागद उद्योग, केमिकल्स, साखर आणि वस्त्रोद्योगांमुळे जिनोआची भरभराट झाली. जिनोआच्या प्रमुख उद्योगांपकी पिआजीओ एरो इंडस्ट्रीज ही जगातील जुनी विमान आणि विमान इंजिननिर्मिती करणारी प्रमुख संस्था आहे. १८८४ साली स्थापन झालेली ही कंपनी प्रथम जहाजांचे भाग, रेल्वे आणि विमाने, हेलिकॉप्टर्स बनवीत होती. १९६६ साली कंपनीचे दोन भाग झाले, पिआजो एरो आणि व्हेस्पा स्कूटर्स असे. सध्या जिनोआत पिआजो एरो ही कंपनी कार्यरत आहे. अनसालो एनर्जीआ, सेलेक्स इएस, कोस्टा क्रोसिए वगरे बडय़ा उद्योगांमुळे जिनोआची ओळख एक औद्योगिक केंद्र म्हणून झाली आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

खाजण वने

तिवरवने, कांदळवने, मंगलवने, खारफुटीवने (आणि बंगालची सुंदरवने). खाडीकाठच्या खाऱ्या दलदलीत फोफावणारी ‘अद्वितीय’ खाजण परिसंस्था. अलीकडे यांच्याबद्दल बरेच बोलले-लिहिले जाते. काही दशकांपूर्वी ही वने डांस-चिलटाचे आगर म्हणून टाळली जात. पायाला जखम करणारी दलदल म्हणून अव्हेरली जात. इंधन म्हणून लाकूडफाटा गोळा करण्याच्या जागा समजल्या जात. यांची उपयुक्तता आताच का अधोरेखित केली जाते? जगभरातल्या खाडीकाठाने ही वने वाढतात का? या वनांतली सर्व झाडे एकाच प्रकारची असतात का? जेथे साधारण झाडे मरतात तेथे खाऱ्या चिखलात ही झाडे कशी वाढू शकतात? किनारी प्रदेशातल्या लोकांना त्यांचे महत्त्व काय? पर्यावरण संदर्भात त्यांचे महत्त्व काय?

समुद्राचे भरतीचे पाणी नदीच्या मुखातून जेथपर्यंत नदीत शिरते तेथे खाजण परिसंस्था निर्माण होते. अशा परिसंस्था फक्त गरम, उबदार प्रदेशात वाढतात. उष्ण आणि उबदार समशीतोष्ण कटिबंधाच्या पट्टय़ातील खाडय़ांच्या सुरक्षित किनाऱ्याने वाढतात. उघडय़ा समुद्राकाठी, जेथे लाटांचा मारा जोरात असतो तेथे वाढत नाहीत. भरती-ओहोटीचे पाणी जेथे खेळते अशा उथळ चिखलात फोफावतात.

अशा वनांत असलेल्या प्रमुख वनस्पतींच्या प्रकाराप्रमाणे वनाला नाव मिळते आणि आसपासच्या इतर झाडांनाही कधीकधी त्याच नावाने (अर्थात चुकीने) संबोधले जाते. प्रत्यक्षात या झाडामध्ये अनेक प्रकार आहेत, आणि ते वनस्पतींच्या अनेक कुटुंबातून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर ११ कुटुंबातले १९ वृक्षप्रकार आहेत. त्यात जास्तीत जास्त ठिकाणी तिवर (अविसेनिया – कुटुंब-अविसेनिअसि) आहे, म्हणून तिवरवने हे वनाचे नाव. सिंधुदुर्गाच्या आचरा खाडीकाठी कांदळ (रायझोफोरा -रायझोफोरसी) मोठय़ा प्रमाणावर दिसतो, म्हणून ते कांदळवन. बंगालच्या त्रिभुज प्रदेशात सुंद्री (हेरिटीएरा – स्टक्र्यूलीयेसी)  भरपूर आहे, म्हणून ते सुंदरवन.

याशिवाय काजळा, किरकिरी, कांदळ गुरिया, मरांडी, फुंगी, चिर्पी, इत्यादी अनेक प्रकार अनेक कुटुंबातून आलेले आहेत. म्हणजेच काळाच्या ओघात जमिनीवरचे वनस्पती  प्रकार अनुकूलनामुळे खाऱ्या चिखलात जगण्यास सक्षम झाले. हे सक्षमीकरण त्या वनस्पती प्रकारात जरुरीचे जनुक अथवा जनुकसंग्रह निर्माण झाल्यामुळे होऊ शकले.

–  प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org