भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग प्रामुख्याने रस्ते बांधणी, लोहमार्ग बांधणी, नद्यांचे कालवे आणि समुद्रकिनारा, सांडपाणी वहन, क्रीडा मदाने आणि कृषी क्षेत्र या ठिकाणी केला जातो.
रस्ताबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रे ही अलगीकरण, मजबुतीकरण आणि पाण्याचे वहन या तीन कारणांसाठी वापरली जातात. रस्ता तयार करताना जमीन खणून त्यामध्ये प्रथम मोठय़ा दगडांचा थर रचला जातो. त्यानंतर त्यावर लहान खडीचा थर अंथरतात आणि शेवटी डांबराचा थर असतो. रस्त्यावरून वाहने जात असताना त्यांच्या वजनाच्या दाबाने हे थर जर एकमेकांत मिसळले आणि खालील माती वर आली तर डांबराच्या थरामध्ये मिसळली तर रस्ता लवकरच खराब होतो. हे थर एकमेकापासून अलग ठेवण्यासाठी रस्त्याखाली कापड अंथरले जाते, यामुळे विविध थर एकमेकांमध्ये मिसळण्यास अवरोध होतो आणि रस्ता अधिक काळ टिकतो. भू-तंत्र वस्त्रे अलगीकरणाबरोबरच रस्त्यासाठी मजबुतीकरणाचे कार्य करतात व रस्त्याची ताकद वाढवतात. याचबरोबर रस्त्याखाली घातलेले कापड रस्त्याखालील पाण्यास वर येऊन डांबराच्या थराबरोबर मिसळू देत नाही तर अशा पाण्याचे वहन करून रस्त्याच्या कडेला नेऊन ते काढून टाकले जाते. हे पाणी जर वर येऊन डांबराच्या थराशी त्याच्या संपर्क आला तर डांबराचा थर खराब होऊन रस्ता खराब होतो. अशा रीतीने अलगीकरण, मजबुतीकरण आणि वहन या तिन्ही कार्यामुळे भू-तंत्र वस्त्रांमुळे रस्ते अधिक काळ टिकतात. रस्ते लवकर खराब न झाल्यामुळे रस्त्यावर होणारा खर्च तर कमी होतोच; परंतु त्याचबरोबर रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या मोडतोडीचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या देखभालीचा खर्चही कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते खराब झाले तर वाहने कमी वेगाने चालवावी लागतात, परंतु रस्ता जर चांगल्या स्थितीत असेल तर वाहनांचा वेग कमी करावा लागत नाही आणि त्यामुळे इंधनाची मोठय़ा प्रमाणावर बचत होते. भारतामध्ये अजूनही रस्त्यांसाठी भू-तंत्र वस्त्रांच्या वापराबद्दल म्हणावी तितकी जागरूकता आलेली नाही. पण अमेरिका, युरोपमधील काही देश आणि काही विकसित देशांमध्ये रस्ताबांधणीमध्ये भू-तंत्र वस्त्रांचा उपयोग कायद्याने सक्तीचा केला आहे.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर – मरतड वर्माची कारकीर्द
त्रावणकोर राज्याचा संस्थापक राजा थिरूनल मरतड वर्मा हा केवळ एक राजकीय मुत्सद्दी आणि कार्यकुशल प्रशासक नव्हता, तर युद्धकुशल सेनानीही होता. संपूर्ण त्रावणकोर राज्य सागरी किनारपट्टीवर असल्यामुळे आणि राज्याचा व्यापार प्रामुख्याने सागरी मार्गानेच होत असल्याने त्याने आपले समर्थ नौदल उभे केले. डच ईस्ट इंडिया कंपनीशी झालेल्या युद्धात पकडला गेलेला सेनानी डी लॅनॉय याचा मरतड वर्माने धूर्तपणे उपयोग करून घेतला. डी लॅनॉय याला त्रावणकोरच्या अ‍ॅडमिरलपदी नियुक्त करून मरतडने आपल्या नौदल आणि लष्कराचेही आधुनिकीकरण करून घेतले. विशेषत: तोफा आणि दारूगोळा बनविण्याच्या तंत्रात लॅनॉयने केलेल्या आमूलाग्र सुधारणांमुळे मरतड वर्माने अनेक लढाया जिंकल्या. तत्कालीन केरळ राज्यांमधील सर्वाधिक प्रबळ असलेला कालिकतच्या झामोरीन राजाचा पराभव केल्यामुळे त्रावणकोरचा केरळातील सामथ्र्यवान राज्य म्हणून दबदबा वाढला.
कोचिनचे राज्य घेऊन मरतड वर्माने उत्तरेस कोचिनपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत राज्यविस्तार केला. मिरे आणि इतर मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारामुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली. मरतड वर्माची कारकीर्द इ.स. १७२९ ते १७५८ अशी झाली. त्याच्या यशस्वी कारकीर्दीत त्याचा दिवाण रामायण दलवा याचा मोठा हातभार लागला. मरतड वर्माने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवले होते. अनेक लढायांमध्ये त्रावणकोर फौजेला मदत करण्यात कंपनीच्या फौजा पुढे होत्या. त्रावणकोर राजघराण्याचे पद्मनाभ (विष्णू) हे कुलदैवत होते. मरतड वर्मा आपल्या कुलदैवताची उपासना श्रद्धापूर्वक करीत असे. १७५० साली त्याने आपले राज्य आणि स्वत:ची खासगी मालमत्ता पद्मनाभ मंदिराला अर्पण केली. त्यानंतरची स्वत:ची राजकीय कारकीर्द मरतडने ‘पद्मनाभदास’ या नात्याने पार पाडली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geotechnique clothing usage
First published on: 09-12-2015 at 00:16 IST