विसाव्या शतकाच्या सुरुवातीची घटना. काही जपानी शेतकऱ्यांना त्यांच्या भातशेतीत एक चमत्कारिक गोष्ट आढळून आली. भातशेतीत सर्वत्र जवळपास समान उंचीचे पीक असताना मध्येच काही रोपे उंच वाढलेली दिसली. जपानी शेतकऱ्यांनी या उंच रोपांना ‘वेडसर’ म्हणून संबोधले आणि ती उपटून फेकून दिली. वैज्ञानिक उत्सुकतेपोटी काही जपानी शास्त्रज्ञांनी त्यांना आपल्या प्रयोगशाळेत नेले. सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करताना त्यांना आढळले की, या रोपांना एका बुरशीजन्य रोगाची बाधा झाली आहे. या बुरशीला त्यांनी ‘जिबरेला फुजिकुरोई’ हे नाव दिले. सर्वसाधारणपणे बुरशीजन्य रोगांमुळे रोपांची वाढ खुंटते, पण जिबरेलाची बाधा झालेली भाताची रोपे मात्र उंच झाली होती.

या मागचे कारण शोधताना, एलिची कुरोसावा या संशोधकाने १९२० साली या जिबरेला बुरशीचे प्रयोगशाळेत संवर्धन करून या बुरशीतून स्रवणारे रसायन वेगळे केले. हे रसायन त्यांनी शेतामधील लहानशा निरोगी भातरोपावर फवारले आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसांतच त्या रोपाची उंची वाढू लागली. म्हणजे रोपावर या बुरशीचे परिणाम घडून येण्यासाठी त्या बुरशीची लागण होणे गरजेचे नव्हते. या बुरशीच्या चयापचयाद्वारे निर्माण झालेले हे रसायन रोपांची उंची वाढण्यासाठी पुरेसे होते. जिबरेला बुरशीपासून निर्माण झालेल्या त्या आम्लधर्मीय रसायनाचे जपानी शास्त्रज्ञांनी १९३८ सालच्या सुमारास पृथकरण केले व त्या रसायनाला जिबरेलिक आम्ल किंवा जिबरेलीन हे नाव दिले. जिबरेलीनवरील अधिक संशोधनाने, जिबरेलीनचा प्रभाव केवळ भातपिकापुरताच मर्यादित नसून, इतर अनेक वनस्पतींची उंची वाढविण्याची क्षमता या रसायनात असल्याचे दिसून आले.

दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चात्य संशोधकांनाही या जपानी संशोधनाची ओळख झाल्यामुळे या रसायनावरील संशोधनाची व्याप्ती वाढली. फक्त बुरशीच नव्हे तर, प्रत्येक वनस्पती हे रसायन कमी-जास्त प्रमाणात स्वत: तयार करत असल्याचे या संशोधनाने दाखवून दिले आणि जिबरेलिन हे रसायन म्हणजे संप्रेरक (हार्मोन) असल्याचे स्पष्ट झाले. पिकांची वाढ होणे, फळांचा आकार वाढवणे, हरितगृहामधील फुलझाडांना योग्य हंगामात फुले आणणे, यासाठी हे रसायन आता वनस्पतींवर फवारले जाते. ‘वेडसर’ म्हणून संभावना झालेल्या भातरोपांवरील संशोधनातून लागलेला एका महत्त्वाच्या वनस्पती संप्रेरकाचा हा शोध आज फलोत्पादनास वेगळ्याच टप्प्यावर घेऊन गेला आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org