अतिशय देखणा आणि निसर्गाच्या अनेक आश्चर्यापैकी एक असलेला जिराफ हा जगातला सर्वात उंच, शक्तिशाली प्राण्यांपैकी एक आणि शांतताप्रिय असा प्राणी आहे. जिराफ प्रामुख्याने आफ्रिका उपखंडातील सव्हाना गवताळ प्रदेश, वने आणि नामिबियातील वाळवंटी प्रदेशांत आढळतात. ओकापी हा जिराफाचा जवळचा नातलग डेमोक्राटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथील वर्षांवनात सापडतो.

सरासरी अठरा फूट उंची आणि बाराशे किलोग्राम वजन असलेला जिराफ हा पूर्णपणे शाकाहारी आहे. काटेरी बाभळीची पाने हे जिराफांचे आवडते खाद्य. आपल्या लांबच लांब जिभेचा वापर करून जिराफ या झाडांची पाने शिताफीने ओढून खातात. दिवसाला साधारणपणे ३४ किलोंच्या पर्णसंभाराचा फडशा पडतात. जिराफ नेहमी स्वसंरक्षणासाठी कळपाने राहातात आणि एकत्र प्रवास करतात. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि मादीशी मीलन करण्याची संधी मिळवण्यासाठी, नर जिराफ एकमेकांशी मानेने युद्ध (नेकिंग) करतात. सामान्यत: जिराफ हा शांत प्राणी आहे; परंतु नुकत्याच झालेल्या काही अभ्यासांनुसार काही विशिष्ट आवाजांद्वारे ते एकमेकांशी संभाषण करतात असे आढळून आले आहे. बछडय़ांचे संगोपन आणि संरक्षण कळपातील माद्या करतात. यासाठी हे बछडे थोडे मोठे झाले की त्यांना एकत्र एका विशिष्ट जागी ठेवण्यात येते. हे जणू त्यांचे ‘पाळणाघर’ असते. कळपातील माद्या मग आळीपाळीने या ‘पाळणाघरावर’ लक्ष ठेवत असतात. आफ्रिकेतील सिंह, तरस, बिबटय़ा आणि मगर हे जिराफांचे प्रमुख भक्षक आहेत. प्रौढ जिराफांची शिकार अवघड असल्याने प्रामुख्याने लहान जिराफ हे या भक्षकांचे प्रमुख लक्ष्य असते.

आफ्रिकेत जिराफ कॉन्झर्वेशन फौंडेशन (जीसीएफ) ही स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे जिराफांच्या संरक्षण व संवर्धनासाठी काम करते आहे. या संस्थेने गेल्या चार-पाच वर्षांपासून जिराफांवर खूप मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू केले आहे. जिराफांच्या त्वचेवर असलेली विलक्षण रंगसंगती आणि विशिष्ट आकृतिबंध असलेले ठसे वरवर एकसारखेच दिसतात. त्यामुळे जिराफांची केवळ एकच मुख्य प्रजाती आहे आणि नऊ उपप्रजाती आहेत असा समज होता. मात्र या ठशांमध्ये कमालीचे वैविध्य आहे आणि हे वैविध्य जनुकीय पातळीवर असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या आधारे अगदी अलीकडे, म्हणजे २०१६ मध्ये मसाई जिराफ, रेटिक्युलेटेड जिराफ, नॉर्दन जिराफ आणि सदर्न जिराफ अशा चार प्रमुख प्रजातींमध्ये जिराफांचे वर्गीकरण करण्यात आले. या चारही प्रजाती साधारणपणे १५ लाख वर्षांपूर्वीपासूनच एकमेकांपासून वेगळ्या झाल्याचेदेखील हे संशोधन सांगते.

– तुषार कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org