News Flash

ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन

मधुमेह नियंत्रणाखाली असेल तर शरीरातील रक्तातून योग्य प्रमाणात रक्तशर्करेचे अभिसरण होत राहते.

चित्रसंदर्भ :   diabetesandglucoseworld 

शरीराच्या सर्व रक्तवाहिन्यांतून फिरणाऱ्या लोहित रक्तकणिका ज्या वेळी ऑक्सिजनचे वहन करत असतात, त्याच वेळी रक्तातील ग्लुकोजशर्करा याच रक्तपेशीतील हिमोग्लोबिनवर चिकटली जाते. यालाच ‘ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन’ (HbA1c) असे म्हणतात. हिमोग्लोबिनला किती प्रमाणात ग्लुकोजचे रेणू चिकटून बसतात हे गुणोत्तर आपल्या रक्तात त्या वेळी किती शर्करा आहे यावर अवलंबून असते.

मधुमेही व्यक्तींसाठी तसेच ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे का, हे समजण्यासाठी डॉक्टर्स ‘ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन’ तपासणीचा आग्रह धरतात. या तपासणीमुळे रुग्णाच्या रक्तद्रवात सरासरी किती ग्लुकोज आहे ते समजते. HbA1c ची पातळी जितकी जास्त तितका मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. जर HbA1c ची पातळी जास्त असेल तर मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीची शक्यता अनेक पटीने वाढते.

लोहित रक्तकणिका दर १२० दिवसांनी नव्याने निर्माण होत असतात, त्यामुळे त्याच कालावधीतील रक्तशर्करेच्या प्रमाणाचा नेमका अंदाज आणि रक्तशर्करेच्या नियंत्रणाबाबत आडाखे HbA1c चे मोजमाप केल्याने बांधता येतात. याच्यावरून मधुमेहींसाठी पुढील दिवसांकरिता आहार-विहार यांचे योग्य नियोजन तज्ज्ञ सुचवू शकतात.

मधुमेह नियंत्रणाखाली असेल तर शरीरातील रक्तातून योग्य प्रमाणात रक्तशर्करेचे अभिसरण होत राहते. अशा वेळी A1C हिमोग्लोबिनचे प्रमाण ४% ते ५.९% इतके असते. यावरून शरीरातील रक्तशर्करेचे नियंत्रण योग्य असल्याचे समजले जाते. मात्र हे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक आढळून आले, तर त्या मधुमेह्य़ांचा मधुमेह नियंत्रणाच्या बाहेर असल्याचे निदान केले जाते.

मधुमेही व्यक्तीची HbA1c पातळी ४८ mmol/mo किंवा ६.५% पेक्षा जास्त असणे योग्य नाही. अशा रुग्णाला अधिक काळजीपूर्वक आहार आणि औषधे यांचा वापर करून मधुमेह नियंत्रणात आणावा लागतो. ज्या वेळी A1C    हिमोग्लोबिन हे ६% असते तेव्हा रक्तशर्करेचे प्रमाण, प्रति डेसीलिटर रक्तात १३५ मिलिग्राम इतके असते. नंतर मात्र A1C हिमोग्लोबिन प्रमाणाच्या प्रत्येक १% वाढीने रक्तशर्करेचे  प्रमाण, प्रति डेसीलिटर रक्तामागे ३५ मिलिग्रॅम इतके वाढते. रक्तशर्करेचे प्रमाण १७० मिलिग्रॅम प्रति डेसीलिटर इतके वाढलेले असेल तर A1C  हिमोग्लोबिन ७ टक्कांपर्यंत पोचलेले असते. अशा पद्धतीने A1C हिमोग्लोबिनच्या तपासणीने मधुमेह्य़ांचा भूतकाळ आणि भविष्य या दोन्हीकडे नजर टाकता येते.

– डॉ. नंदिनी नेरूरकर-देशमुख

 

 

आशापूर्णादेवींचे कादंबरीत्रय

‘प्रथम प्रतिश्रुती’ (१९६४) या कादंबरीला १९७६ चा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळाला, इतर अनेक पुरस्कारही मिळाले. ‘प्रथम प्रतिश्रुती’, ‘सुवर्णलता’, ‘बकुलकथा’ या त्रिधारेतील या कादंबरीचा ‘पहिले वचन’ हा मराठी अनुवाद मृणालिनी केळकर यांनी केला असून ‘सुवर्णलता’चा अनुवाद कमला भागवत यांनी केला आहे.

‘प्रथम प्रतिश्रुती’ची सुरुवात करताना आशापूर्णा देवी म्हणतात- सत्यवतीची ही कहाणी मी लिहिलेली नाही. ती घेतली आहे बकुलच्या वहीतून. बकुल म्हणाली होती- ‘हवं तर ही कल्पित कथा समजा, सत्यकथा मानायची असेल तर सत्यकथा माना! बकुल ही सुवर्णलताची मुलगी. सत्यवतीची नात. बकुलची मानसिक धारणाच अशी की, स्वत:चं म्हणून काही महत्त्व असतं हे तिच्या गावीही नाही. कसलाही उत्साह नाही. पण आई सुवर्णलता मात्र तिच्या आईसारखी- सत्यवतीसारखी विचारी, तडफदार आहे.’

सत्यवतीचं (सत्या) लग्न नवकुमार (नोबू)शी होतं. सत्यवतीला लिहिता, वाचता येतं. हे तो समजूनच घेऊ शकत नाही. त्याची तेवढी कुवतही नाही. उलट तो सत्याला म्हणतो, ‘‘आई म्हणते ते खरंच आहे. स्त्रिया अतिहुशार असणं, त्यांनी जास्त शिकणं हे सर्वनाशाचं मूळ आहे.’’ सत्याची सासू कंजूष आणि फटकळ. सत्याच्या मनाविरुद्ध तिच्या मुलीचं- सुवर्णलतेचं लग्न तिला मॅट्रिकही होऊ न देता-  ती लावून देते. सत्याच्या हे जिव्हारी लागतं. मंडपापर्यंत पोहोचूनही आशीर्वाद न देता, उलटपावली ती परत जाते. घरही सोडून निघून जाते. कधी काळी सत्याच्या वडिलांनीही- रामकलींनीही घर सोडलं होतं. पती नोबूच्या विनवणीला न जुमानता, शेवटी त्यालाच नमस्कार करून ती त्याची क्षमा मागते. आपल्या तत्त्वांवर ठाम राहून, नवऱ्याकडे पाठ फिरवून निघून जाते.

१९ व्या शतकाच्या अखेरीस ही घटना घडली, तेव्हा स्त्रीने गृहत्याग करणं ही घटना कुणालाच आवडणारी नव्हती. सुशिक्षित, सुधारक आईच्या गृहत्यागामुळे सुवर्णची सासू तिच्या  आईचा यथेच्छ उद्धार करीत असे. त्यामुळे तिलाही क्वचित आपल्या आईचा राग येई. पण रांधा, वाढा, उष्टी काढत पोरांचं लेंढार वाढवीत खितपत पडावं हेही तिला पटत नसे. स्त्रियांनीही  शिकावं असं तिला वाटत असे. अखेर, आजीनं आपलं लग्न लावून दिल्यानंच  तर आपण आईला मुकलो, ही भावना तिच्या मनात जागी होऊन  तिच्या वागण्यात बदल होऊ लागले. तिच्या मुली पारुल आणि बकुल यांनाही हे कळायला वेळ लागला. सुवर्णच्या मृत्यूनंतर तिच्या ‘स्मृतिकथे’ची मूळ वही बकुल शोधण्याचा प्रयत्न करते. पुढल्या कादंबरीत बलुल व सुवर्णची कथा येते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2017 1:59 am

Web Title: glycosylated hemoglobin
Next Stories
1 हिमोग्लोबिनचे मोजमाप 
2 कुतूहल : हिमोग्लोबिन
3 महमद  इब्न  मुसा  अल्  ख्वारिज्मी
Just Now!
X