मानवनिर्मित तंतूंची निर्मिती सुरू झाल्यावर तागापुढे खूप मोठे आव्हान उभे राहिले. तागापासून बनणाऱ्या अनेक वस्तू मानवनिर्मित तंतूंपासून अधिक चांगल्या दर्जाच्या व स्वस्त दरात बनवणे शक्य झाले. हे आव्हान पेलण्याकरता सरकारने एक संशोधन संस्था सुरू केली आहे. संशोधन व वृद्धी हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याकडे सगळ्याच बाबतीत (कापसाच्या, रेशमाच्या वा तागाच्या बाबतीत) फारच जाणिवेच्या स्तरावर आहेत. आपल्याकडे संशोधनात्मक मूलभूत दृष्टिकोन विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. हे झाल्यास ताग हा सोनेरी तंतू म्हणून आपले एकमेवाद्वितीय स्थान सिद्ध करेल.
वस्त्र ही मानवी गरज ऋतूप्रमाणे थोडय़ा फरकाने बदलते. थंडीमध्ये गरम वस्त्रांची गरज असते. लोकर हा तंतू ही गरज भागवण्याची क्षमता बाळगून आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांकरता त्यांच्या मूलभूत व वैशिष्टय़पूर्ण गरजांप्रमाणे आपली सेवा देणारा करणारा हा एकमेव समाजवादी तंतू आहे. हा कापसाप्रमाणे नसíगक असला तरी त्याचा स्रोत वेगळा म्हणजे प्राणीजन्य आहे. मेंढय़ाच्या अंगावरील वाढलेले केस म्हणजेच लोकरीचे तंतू होत. जसा मानवी शरीरावरील केस हा मृत भाग आहे त्याचप्रमाणे मेंढय़ांच्या अंगावरील केस हे मृत अथवा निर्जीव असतात. अंगावरील केस कापले तरी मेंढीला काही इजा वा अपाय होत नाही. मेंढय़ाच नाहीत असे जगात फार कमी देश असतील. पाचही खंडांत सर्वाधिक देशांमधे उत्पादन घेतले जाणारा लोकर हा एकमेव तंतू आहे. या अर्थानेही तो समाजवादी तंतू ठरतो. देशोदेशींच्या मेंढय़ा या वेगवेगळ्या वातावरणात वाढतात. वेगळया अन्नपाण्यावर पोसल्या जातात. साहजिकच ठिकठिकाणच्या लोकर तंतूंच्या गुणधर्मामध्ये मोठी तफावत आढळते. या गुणधर्मानुसारच त्यांचा उपयोग ठरत असतो. श्रीमंतांकरिता लागणारे भपकेबाज पेहराव हे दर्जेदार तंतूंपासून बनवले जातात. अंगावरील पेहराव हा तलम तंतूंपासून बनवलेला असतो. अंगावर घालण्याच्या वस्त्राखेरीज अन्य उपयुक्त असणाऱ्या वस्त्रांसाठी जाडे-भरडे तंतू वापरतात. उदा. : घोंगडी, कांबळी आणि गालीचे व अस्तरांकरता लागणारे वस्त्र.
प्रा. सुरेश द. महाजन (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर- ग्वाल्हेर ‘ब्रिटिश-अंकित संस्थान’ कसे बनले?
ग्वाल्हेरच्या अत्याधुनिक युद्धसामग्रीने सज्ज, प्रशिक्षित आणि मजबूत फौजेच्या दराऱ्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरही या संस्थानचा वचक होता.
कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आणि राघोबादादा यांच्या संयुक्त फौजेने पुण्यावर हल्ला केला. वडगाव येथे झालेल्या युद्धात महादजी शिंदेंच्या डावपेचांमुळे त्यांनी ब्रिटिश फौजेस शरण येण्यास भाग पाडले. वडगाव येथे झालेल्या तहात ब्रिटिशांनी पूर्वी घेतलेले ठाणे, साष्टी आणि जवळपास पूर्ण गुजरात पुन्हा मराठय़ांना मिळाले आणि युद्ध खर्च म्हणून ४१ हजार रु. मराठय़ांनी वसूल केले. पुढे १७७९ साली वॉरन हेस्टींग्जच्या आदेशानुसार कर्नल गोदार्दने अहमदाबाद काबीज करून ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेरजवळ सिप्री येथे झालेल्या लढाईत महादजींना जरी माघार घ्यावी लागली तरी त्यांचा निर्णायक पराभव झाला नाही. या लढाईनंतर सालबाई येथे झालेल्या तहात मराठय़ांना उज्जनपर्यंत माघार घेऊन यमुनेच्या पश्चिमेकडील प्रदेश ब्रिटिशांसाठी सोडावा लागला.
नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर मराठी साम्राज्याचा कारभार बारा राजकारणी माणसांनी सांभाळला. या बारा जणांच्या सरकारला ‘बारभाई’ असे नाव होते. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस हे त्यातील प्रमुख मुत्सद्दी होते. महादजींच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरच्या गादीवर आलेल्या दौलतराव शिंदे यांच्या सन्याशी ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेच्या झालेल्या लढाईत ग्वाल्हेरचा पराभव होऊन १८०३ साली दौलतरावने कंपनी सरकारशी संरक्षणात्मक करार केला. १८०३ ते १९४७ ते या काळात ग्वाल्हेर हे ब्रिटिशांचे एक संस्थान बनून राहिले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com