28 February 2021

News Flash

कुतूहल : काळं शिसं

इंग्लंडमधील बॉरोडेल या भागात सोळाव्या शतकात घनरूपी ग्रॅफाइटचे मोठे साठे सापडले

‘नावात काय आहे?’, असं शेक्सपियर म्हणाला होता. त्या महान साहित्यिकाचं म्हणणं खरं असेलही; पण मनाला ते चटकन पटत नाही. नाव काय तर म्हणे मदनमोहन आणि चेहरा उगीचच पिकासोनं चितारल्यासारखा..आता हेच पाहा ना.. हातात धरलेल्या लेखणीला काय म्हणायचं तर ‘शिसपेन्सिल’ ! पण तिच्यात कुठंही शिशाचा अंशच नाही.

पांढऱ्यावर काळं करण्यासाठी त्यातली जी काडी आपण वापरतो ती बनलेली असते ग्रॅफाइटची, म्हणजे कार्बनच्या एका रूपाची.

तरी त्याला ‘शिसं’ म्हटलं जातं. त्याला दोन कारणं आहेत. रोमन काळात बोरूसारखी जी लेखणी वापरली जायची तिचं टोक, म्हणजे स्टायलस, असायचं शिशाचं. शिसं हे तसं सहजासहजी न वाकणारं. म्हणून त्याचा वापर होत असे. त्या बोरूची जागा पेन्सिलीनं घेतल्यानंतरही त्यातलं ‘टोक’ शिशाचंच असेल हे गृहीत धरलं गेलं.

इंग्लंडमधील बॉरोडेल या भागात सोळाव्या शतकात घनरूपी ग्रॅफाइटचे मोठे साठे सापडले. ते काय आहे हे धातू-वैज्ञानिकांना प्रथम कळलंच नाही. पण ते काळसर रंगाचं शिसं असावं असाच त्यांचा समज झाला. आणि तेच नाव- ब्लॅक लेड- त्यांनी त्याला दिलं. त्याचे विविध उपयोग होऊ शकतात, हे ध्यानात आल्यावर त्याचं खरं मोल लक्षात आलं. म्हणून जणू सोन्याचंच रक्षण करतो आहोत अशा थाटात या ब्लॅक लेडच्या खाणींचं आणि साठय़ाचं रक्षण करण्यासाठी खास सनिकांच्या गस्तीची व्यवस्था करण्यात आली.

ते घनरूपी असलं तरी तसं ठिसूळ होतं. आणि सहजासहजी मोडलं जात होतं. म्हणून त्याचा वापर करण्यासाठी ते लाकडात किंवा कातडय़ात गुंडाळायचा पर्याय शोधून काढला गेला. कागद किंवा इतर तशाच पृष्ठभागावर खुणा करण्यासाठी, लिहिण्यासाठी ते उपयोगी पडतं, हे समजल्यानंतर त्या लाकडातल्या काडीचा पेन्सिलीसारखा उपयोग सुरू झाला आणि ब्लॅक लेड पेन्सिलीचा जन्म झाला!

त्यातलं शिसं हे शिसं नाही, कार्बन आहे, याची ओळख पटल्यानंतरही ते ‘काळं शिसं’ हे तोवर सर्वाच्या तोंडी झालेलं नाव तसंच टिकून राहिलं. काप गेले तरी भोक उरावं, तशीच ही परिस्थिती?

शेक्सपियर म्हणतो ते खरंच आहे. ग्रॅफाइटच्या पेन्सिलीला शिशाची पेन्सिल म्हटलं म्हणून तिनं लिहिता येणार नाही असं थोडंच आहे?

– डॉ. बाळ फोंडके , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 5:06 am

Web Title: graphite a mineral with extreme properties
Next Stories
1 जे आले ते रमले.. : अलेक्झांडर किनगहॅमचे पुरातत्त्वीय संशोधन (२)
2 अलेक्झांडर किनगहॅम (१)
3 थॅलिअम
Just Now!
X