23 February 2019

News Flash

कुतूहल : अफलातून कार्बन

इतिहासपूर्व काळापासून मानवाला कोळसा व काजळी हे कार्बनचे प्रकार ज्ञात होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

अणुक्रमांक सहा असलेल्या कार्बन या मूलद्रव्याचा आवाका अचंबित करणारा आहे. सध्या ज्ञात असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या जवळजवळ दहादशलक्षच्या घरात आहे. रसायनशास्त्रज्ञांच्या मतानुसार ९५ टक्के पदार्थाचा मुख्य घटक कार्बन असावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक पदार्थामध्ये अस्तित्व असलेल्या कार्बनच्या अणूंची रचना साध्यापासून जटिल प्रकारापर्यंत वेगवेगळी असते. हे मूलद्रव्य अविश्वसनीय वाटावे असे आहे. अणूंची रचना विशिष्ट पद्धतीने झाली असता कार्बनचा अत्यंत मृदू असा ग्रॅफाइट प्रकार मिळतो तर त्याच रचनेत काही फेरफार घडता तोच जगातील सर्वात कठीण पदार्थ हिरा असतो.

इतिहासपूर्व काळापासून मानवाला कोळसा व काजळी हे कार्बनचे प्रकार ज्ञात होते. तसेच प्राचीन काळी चीनमध्ये हिरा हा कार्बनचा आणखी एक प्रकार वापरात होता. परंतु कार्बनची मूलद्रव्य म्हणून ओळख अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. काबरे (कोळसा) या लॅटिन शब्दावरून याचे नामकरण कार्बन असे केले. फ्रेंच शास्त्रज्ञ अ‍ॅन्टोनी लॅवोझिएरने काही प्रयोग करून सिद्ध केले की ग्रॅफाइटप्रमाणेच हिऱ्याच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साइड तयार होतो.

विश्वात सापडणाऱ्या विपुल मूलद्रव्यांमध्ये कार्बनचा चौथा क्रमांक लागतो. सूर्य अणि इतर तारे, धूमकेतू तसेच अनेक ग्रहांच्या वातावरणात (कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात) कार्बन आढळतो. ताऱ्यांच्या गर्भात केन्द्रकीय संमीलन प्रक्रियेतून कार्बनची निर्मिती होते. पृथ्वीतलावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये कार्बनचा सिंहाचा वाटा आहे. कार्बनची नैसर्गिक विपुलता, विशिष्ट विविधता व स्वत:च्या अणूंशी जोडणी करीत बहुवारिके (पॉलिमर) तयार करण्याची क्षमता, यामुळे तो सर्व सजीवसृष्टीचा समान व मूलभूत घटक आहे. कार्बनशिवाय वनस्पतींना अन्न तयार करणे शक्य नाही, तयार केलेल्या अन्नाचा कार्बन हा घटक असून त्याच्याशिवाय प्राणिमात्रांचे पोषण होऊ शकत नाही. मानवाच्या शरीरात त्याचे वस्तुमान दुसऱ्या क्रमांकाचे १८.५ टक्के  इतके आहे.

कार्बनचक्र हे निसर्गातील पुनर्चक्राचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांतील कार्बनचे विविधरूपी हस्तांतरण. निसर्गाकडून घेतलेले कार्बनजन्य घटक निसर्गाला परत केले जातात. जेणेकरून मूलद्रव्यी कार्बन कमी होत अथवा वाढत नाही, यात जैविक घटकांचे पोषण होते व त्यांच्या टाकाऊ पदार्थातून वायुरूपी कार्बनचा निसर्गात समतोल राखला जातो.

मीनल टिपणीस :

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

First Published on February 5, 2018 2:58 am

Web Title: great carbon