मध्ययुगीन युरोपियन साहित्यिकांपकी फ्लोरेन्स येथे १२६५ साली जन्मलेले दान्ते अलिघेरी हे मध्ययुगातले अखेरचे साहित्यिक. त्यांच्या महान कलाकृती, विचार आणि तत्त्वनिष्ठेमुळे पुढच्या साहित्यिकांच्या अनेक पिढय़ांसाठी दान्ते हे एक प्रेरणास्थान बनले. त्यांचे ‘डिव्हाइन कॉमेडी’ हे महाकाव्य जगातील आजवरच्या सर्वोत्तम काव्यकलाकृतीत गणले जाते. राजकारणापासून तत्त्वज्ञानापर्यंत, साहित्यापासून अध्यात्मापर्यंत सर्वत्र त्यांचा संचार होता. अविचल तत्त्वनिष्ठतेमुळे त्यांना हेटाळणी, हद्दपारीसारख्या शिक्षांना सामोरे जावे लागले. असे असूनही दान्ते यांनी आपले विचार अत्यंत तर्कशुद्धपणे मांडले आणि आधुनिक जगाच्या दृष्टीने तेच पुढे उपयुक्त ठरले. दान्ते हे त्यांच्या तत्कालीन आधुनिक साहित्य शैलीमुळे इटली आणि संपूर्ण युरोपातील पुनरुज्जीवन चळवळीचे आद्य प्रणेते म्हणूनही ओळखले जातात. ‘व्हिता नुओव्हा’ हा दान्ते यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांच्या प्रेयसीच्या अकाली मृत्यूनंतर दान्ते यांनी धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान इत्यादी विषयांच्या अभ्यासात स्वतला गुंतवून घेतले. काही काळानंतर ते फ्लोरेन्सच्या राजकारणाकडे वळले. विरोधकांबरोबरच्या मतभेदांपायी १३०२ साली दान्ते यांना फ्लोरेन्समधूनन हद्दपार व्हावे लागले. या काळात कफल्लक अवस्थेत इटलीत वणवणतानाच दान्ते यांनी महत्त्वाची ग्रंथनिर्मिती केली. ‘द व्हल्गारी इलोकेन्तिआ’ आणि ‘इन कॉन्व्हीव्हिओ’ हे गाजलेले ग्रंथ दान्ते यांनी हद्दपारीच्या काळात लिहिले. लॅटिन भाषेचे प्रस्थ इटलीत वाढत असताना, इटलीतील लॅटिनप्रेमी सुशिक्षितांना इटालियन भाषेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘व्हल्गारी’ (व्हर्नाक्युलर) हा ग्रंथ त्यांनी इटालियन आणि लॅटिनमध्ये लिहिला. प्लेटो, ऑरिस्टॉटल यांच्या विचारांचा दान्ते यांच्यावर मोठा प्रभाव होता. धर्म व तत्वज्ञान या वेगवेगळ्या बाबी आहेत अशी त्यांची भूमिका होती. जनतेला शांतता, स्थर्य लाभण्यासाठी शासनाची आवश्यकता आहे आणि ते रोमच्या सम्राटाचे काम आहे, पोपचे काम केवळ धर्मसत्ता सांभाळण्याचे असे दान्तेंचे विचार पुढे पूर्ण युरोपात प्रभावी ठरले. १४ सप्टेंबर १३२१ रोजी दान्तेंचे देहावसान झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

तामण : महाराष्ट्राचे राज्यपुष्प

या झाडाला मोठा बोंडारा, जारूल, क्विन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप अशी अनेक नावे असून त्याचे शास्त्रीय नाव आहे ‘लॅगस्ट्रोमिया रेजिनी’. स्वीडिश बॉटॅनिस्ट मॅगलॅगस्टोम यांच्या सन्मानार्थ हे नाव दिले गेले आहे. रेजिनी म्हणजे राणीचे. लागस्ट्रोमिया स्पेसिओसा हे त्याचे सनाम, स्पेसिओसा म्हणजे अतिशय सुंदर. मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात कोकणात नदीनाल्याच्या काठाने, विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाड व रत्नागिरीच्या जंगलात दिसतात.

झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. झाडाचे साल औषधी असते. बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. झाडाची वाढ लवकर आणि जोमाने होते. लहान झाडालाही फुले येतात. रस्त्याच्या कडेने सावलीसाठी उत्तम वृक्ष आहे.

पानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी, फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फुले दिसायला सुंदर असल्यामुळे राज्यपुष्प हा मान मिळवला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षांतून दोन वेळेलापण येऊ शकतो. मुंबईत अनेक ठिकाणी  ही झाडे दिसतात. एक झाड चुनाभट्टीला मराठी विज्ञान परिषदेच्या आवारातही आहे.

डॉ. माणिक फाटक (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org