ग्रेटा थुनबर्ग या स्वीडनच्या मुलीने जगभरात खळबळ निर्माण केली आहे. पर्यावरण चळवळीत ‘थिंकिंग ग्लोबली अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिंग लोकली’ असे नेहमी म्हटले जाते. ग्रेटा त्याच वाटेवर चालते आहे. तिने आपल्या शालेय जीवनात पर्यावरण समस्येबद्दल गंभीर विचार केला. फक्त विचार करून ती थांबली नाही, तर तिने विचाराला कृतीची जोड दिली.

ग्रेटाला समजतच नव्हते की, तिला जे समजते आहे ते अजून मोठय़ा माणसांना का कळत नाही? आपण सगळे निसर्गाकडून सर्व गोष्टी अनिर्बंधपणे ओरबाडत आहोत. इतक्या वेगाने ओरबाडत आहोत की, आपल्या पुढच्या पिढय़ांसाठी आपण निसर्ग आणि पृथ्वीकडे काहीही ठेवणार नाही. आपण आपल्या पुढच्या पिढय़ांकरता असलेल्या सर्व नैसर्गिक स्रोतांचा यापूर्वीच फडशा पाडला आहे.

मात्र, ग्रेटाने बोलायला सुरुवात केली. शाळा बुडवून ती त्यांच्या संसदेसमोर निदर्शनासाठी बसली. निश्चयाने केलेल्या या उपक्रमाला हळूहळू अनेकांचा पाठिंबा मिळायला लागला. तिचे विचारणे एकच होते : जागतिक तापमानवाढीच्या परिणामांची आपल्या सर्वाना जाणीव आहे, तरीही आपले राज्यकत्रे या विषयात निर्णय घ्यायची टाळाटाळ का करीत आहेत? विकासाच्या वैश्विक संकल्पनेतून पर्यावरणाचे भान हरवत चालले आहे. निसर्ग आणि बोलू न शकणारी मूक जीवसृष्टी- त्यांच्यावतीने आवाज उठवणारे कोणीही नसल्यामुळे- उद्ध्वस्त होत चालली आहे.

तिच्यासारख्या अनेक ग्रेटा आता जगभरात निर्माण होऊ लागल्या आहेत. ग्रेटाच्या आंदोलनाच्या ६८व्या आठवडय़ात माद्रिद येथे तिच्या समर्थनासाठी पाच लाख लोक जमले होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी भरवल्या जाणाऱ्या परिषदांमधून गारेगार वातानुकूलित सभागृहात बसून, विमानाने प्रवास करून बडय़ाबडय़ा देशांचे मोठमोठे नेते आपापल्या देशाची भूमिका मांडत असतात. अशांसमोर ग्रेटाने एक आदर्श निर्माण केला. ती कोणत्याही जागतिक परिषदेला विमानाने प्रवास करून उपस्थित राहात नाही.

‘भविष्यासाठी शुक्रवार’ हा तिचा नारा आता सर्व जगभर पसरत चालला आहे. विशेषत: तरुणाई या आंदोलनात सहभागी होत आहे. ‘फ्रायडेज् फॉर फ्युचर’ या मोहिमेत आम्ही दर शुक्रवारी आपल्याला कुठल्या तरी बदलात सहभागी होण्याचे, पर्यावरण संवर्धनातील सहभागाचे आवाहन करू. आपण प्रतिसाद द्याल?

विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org