आता माणसाच्या नुसत्या डोक्याचं वजन कसं करायचं? डोकं एखाद्या स्क्रूसारखं धडाला थोडंच बसवलेलं असतं! की आटे फिरवून केलं वेगळं आणि टाकलं तराजूच्या पारडय़ात. पुरंदरच्या लढाईत त्या मुरारबाजीचं धड डोकं गमावल्यानंतरही लढत राहिलं होतं असं सांगतात. त्या वेळी कदाचित त्या तुटून पडलेल्या डोक्याचं वजन करता आलं असतं. पण जिवंत आणि धडधाकट व्यक्तच्या डोक्याचं वजन! अशक्यच असं आपण म्हणू. पण ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकाच्या संपादकवर्गानं ती अशक्य बाबही शक्य करण्याची किमया करून दाखवली आहे. आणि तीही विज्ञानाच्या तत्त्वांना कुठंही बाधा न आणता.

त्यांनी आपल्याच एका सर्वसाधारण चणीच्या आणि तुळतुळीत टक्कल पडलेल्या सहकाऱ्याची या मोहिमेसाठी निवड केली. त्यानंतर एक भलीमोठी परात घेऊन तिच्यामध्ये एक अशीच मोठी बादली ठेवली. साधारण चार अंश सेल्सियस इतकं तापमान असलेल्या पण न गोठलेल्या पाण्यानं ती भरली. या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. त्यानंतर त्यांनी त्या सहकाऱ्याचं डोकं उलटं धरून हनुवटीपर्यंत त्या पाण्यात बुडवलं. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो घाबराघुबरा होऊ नये म्हणून अर्थात त्याला श्वास रोखून धरायला सांगायला ते विसरले नाहीत.

काठोकाठ भरलेल्या आंघोळीच्या टबमधलं पाणी आíकमिडीज त्यात बसल्यानंतर जसं बाहेर सांडलं, त्याचप्रमाणे बुडवलेल्या डोक्यापायी बादलीतलं पाणी बाहेर सांडलं. पण ते सगळं त्या परातीत साठवलं गेलं. बाहेर सारलेलं पाणी डोक्याच्या आकारमानाइतकं होतं. हे अर्थातच आíकमिडिजच्या तत्त्वानुसारच झालं. ते परातीतलं पाणी गोळा करून त्याचं आकारमान मोजण्यात आलं. वैज्ञानिक पद्धतीची कास धरत हा प्रयोग तब्बल पाच वेळा करून डोक्याचं सरासरी आकारमान मोजण्यात आलं.

डोक्याचा कवटीचा ठणक भाग सोडला तर बाकीचा मेंदू मुख्यत्वे मृदूच असतो. एवढंच नाही तर त्यात पाण्याचं प्रमाणच जास्ती असतं. त्यामुळं डोक्याची घनताही पाण्याइतकीच असावी हे गृहीत धरण्यात आलं. आकारमान मोजलेलं होतंच. त्याला घनतेनं गुणलं की वजन मिळतं. तसंच गणित करून डोक्याचं वजन मिळवलं गेलं. ते भरलं ४.२५ किलोग्राम. आहे की नाही डोकं!

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

एम. टी. वासुदेवन नायर (१९९५)

१९९५ चा ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळमचे प्रसिद्ध लेखक श्री. एम. टी. वासुदेवन नायर यांना भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात आला. साहित्यातून सामान्य माणसाच्या मनोव्यथेला संवेदनशीलपणे चित्रित करणाऱ्या श्री. नायर यांच्या आठ कादंबऱ्या, १८ कथासंग्रह, एक नाटक, दोन प्रवासवर्णने, बाल साहित्य आणि तीन समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अनेक चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. ‘निर्माल्यम्’ (१९७३) – या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून सुवर्णपदक मिळाले, तर ‘ओरू वटक्कन वीरगाथा’ला राष्ट्रीय पुरस्काराने १९८९ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९३३ मध्ये केरळमधील पालकट्ट जिल्ह्य़ातील कुटल्लूर या गावी त्यांचा जन्म झाला. या छोटय़ा गावात विद्वत्तेची, साहित्याची परंपरा नाममात्रही नव्हती. हायस्कूल सात मैल दूर होते. त्या वेळी त्यांच्या पालकांनी अर्धपोटी राहून त्यांना शिकवलं आणि गावात नवी परंपरा सुरू झाली. पुढे परिस्थितीमुळे ते वर्षभर घरीच राहिले. नंतर ते पालक्काट येथे व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांना वाचनाची संधी मोठय़ा प्रमाणात मिळाली. पदवीच्या शेवटच्या वर्षांला असताना ‘मातृभूमी’द्वारा आयोजित कथा स्पर्धेत त्यांना पुरस्कार मिळाला आणि प्रसिद्धीही मिळाली. १९५३ मध्ये त्यांनी रसायनशास्त्रात पदवी संपादन केली.काही काळ शिक्षकीपेशात नोकरी केली. त्यानंतर १९५६ मध्ये ते ‘मातृभूमी’ नियतकालिकात सुरुवातीला उपसंपादक आणि नंतर संपादक म्हणून कार्यरत राहिले.

लहानपणापासूनच त्यांना वाचनाची, लेखनाची आवड होती. केरळमधील अनेक प्रसिद्ध लेखकांचे साहित्य, कथा, कविता त्यांनी वाचल्या होत्या. कविता पाठ केल्या होत्या. त्यांना कुणी विचारलं, की तू कोण होणार आहेस? तर ते गंभीर आवाजात उत्तर देत, ‘मी लेखक होऊ इच्छितो’ आणि खरोखर चौदाव्या वर्षी त्यांनी नियमित लिहायला सुरुवात केली. कविता, कथा, लेख, एकांकिकाही लिहू लागले.  पोस्टेजसाठी तीन पैसे कसेबसे जमवून, नियतकालिकांचे पत्ते मिळवून हे लेखन ते पाठवून देत असत. नंतर, कविता मागे पडली. वयाच्या २४व्या वर्षी त्यांना कादंबरी लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतरही १९७० आणि १९८२ मध्ये त्यांना केरळ साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com