सुनीत पोतनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळचे फ्रेंच ख्रिश्चन तपस्वी, धर्मप्रचारक हेन्री ल सॉ हे भारतीय अद्वैत तत्त्वज्ञानाबद्दल बरंच काही ऐकून होते. त्यांच्या परिचयाच्या फादर ज्यूल्स यांनी हेन्रींच्या दक्षिण भारतातल्या एका संघटनेत सहभागी होण्याची व्यवस्था केली. पण त्यापूर्वी हेन्रींना इंग्रजी भाषा उत्तमरीत्या आत्मसात करणे, पाश्चिमात्य जीवनशैलीचा त्याग, भारताबद्दल प्रेम आणि पराकाष्ठेचे धर्य या गोष्टींचे पालन करण्यास सांगितले. फादर ज्यूल्सच्या सल्ल्याप्रमाणे सर्व तयारी करून हेन्री १९४८ साली तामिळनाडूत कुलित्तालाई येथे येऊन फादर ज्यूल्सना भेटले. हेन्री आणि फादर ज्यूल्स दोघे सर्वसंगत्याग करून एका अज्ञात, अनामिक आनंदाच्या शोधात एक वर्ष साधना करीत असताना १९४९ मध्ये तामिळनाडूतील तिरुवनमलाई येथे अरुणाचल पर्वताच्या पायथ्याशी महान तपस्वी रमण महर्षी यांच्या भेटीचा योग आला.

रमण महर्षी यांच्या साधनेचा भर शास्त्राध्ययनापेक्षा ध्यानधारणा व समाधीतून आत्मशोधावर होता. काही दिवस अरुणाचलाच्या रमणाश्रमात राहून रमण महर्षीच्या साधना पद्धतीने प्रभावित झालेल्या हेन्रींना जणू पुनर्जन्म झाल्याप्रमाणे प्रचीती आली. पूर्णपणे भारावून गेलेले हेन्री आणि फादर ज्यूल्स पुढे १९५० मध्ये कावेरी नदीच्या किनाऱ्यावर एक झोपडीवजा आश्रम बांधून राहू लागले. रमण महर्षी यांच्या सूचनेप्रमाणे हेन्रींनी स्वत:साठी स्वामी ‘अभिषिक्तानंद’ हे नाव घेतले तर आश्रमाचे नाव ‘सच्चिदानंद आश्रम’ (पुढे याचे नाव शांतिवन झाले) ठेवले. या आश्रमात अभिषिक्तानंद यांनी विशिष्ट धर्मतत्त्वांचा प्रचार न करता भगवी वस्त्रे परिधान करणे, तामीळ किंवा संस्कृतात प्रार्थना करणे, दिवसातून तीन वेळा संध्या वंदनम्, ध्यानधारणा, भक्तिगीत गायन, मननचिंतन आणि संन्यस्त वृत्तीचे आचरण असा दिनक्रम ठरविला. आश्रमात त्यांना अनेक शिष्य मिळाले, त्यामध्ये युरोपियन साधकांचाही समावेश होता. १९६८ साली शांतिवन आश्रम बेडे ग्रिफिथ या शिष्याकडे सुपूर्द करून, अभिषिक्तानंद हिमालयात गेले आणि उत्तरकाशी जवळ दुर्गम भागामध्ये झोपडीत काही दिवस राहिले. १९७३ मध्ये हृषिकेशजवळ असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी, इंदूर येथे त्यांचे निधन झाले.

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Henri le saux anointing
First published on: 17-10-2018 at 02:34 IST