विसाव्या शतकाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत नसíगक तंतूंचे पर्यायी तंतू हीच मानवनिर्मित तंतूंची ओळख होती. पण नंतरच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीने नवी आव्हाने वस्त्रोद्योगापुढे उभी केली. ही आव्हाने पूर्ण करणे तेव्हापर्यंत उपलब्ध असलेल्या नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंना शक्य नव्हते. यातूनच विशिष्ट उपयोगांसाठी विशिष्ट गुणधर्माचे, उच्च कार्यक्षमतेचे तंतू निर्माण करण्याची कल्पना पुढे आली. यातून जन्म झाला तिसऱ्या पिढीतील मानवनिर्मित तंतूंचा.
सामान्य माणसांशी या तंतूंचा प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी आजच्या अनेक सुविधा अशा तंतूंअभावी प्रत्यक्षात येऊ शकल्या नसत्या हे तितकेच खरे. रसायन विरोध, ज्वलन विरोध, घर्षण विरोध, आघात विरोध, उच्च तापमानाला विरोध असे गुणधर्म थोडय़ाफार प्रमाणात बऱ्याच मानवनिर्मित तंतूत होते. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांना उपलब्ध पातळ्या पुरेशा वाटत नव्हत्या. त्यांना अतिउच्च दर्जाचे गुणधर्म हवे होते. आणि त्याकरिता प्रयोगशाळेत नव्या तंतूंची निर्मितीच करावी लागली.
वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून वेगवेगळ्या गुणधर्माचे तंतू निर्माण करण्यात आले. त्यातील अ‍ॅरामिड, कार्बन, पॉलिथिलीन, सिरॅमिक या वर्गातील तंतूंचा वापर अधिक प्रमाणात होतो. प्रत्येक वर्गातील तंतू वेगवेगळ्या व्यापारी नावांनी बाजारात उपलब्ध असतात. या तंतूंचा उपयोग खास क्षेत्रात केला जातो. युद्धसामग्रीचे संरक्षण, आगीपासून संरक्षण, बांधकामाची मजबुती वाढवणे, भूवस्त्रांच्या वापराने जमिनीची धूप कमी करणे, खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी वापरली जाणारी जाळी तसेच प्रकाशीय तंतूंचे केबल यामधे उच्च कार्यक्षमतेच्या तंतूंचा वापर होतो. याशिवाय बुलेटप्रूफ जॅकेट, विमानाची बाह्यांगे, मोटार आणि विमान यांचे टायर्स, वाहक पट्टे, पाणी वाहून नेणारे होज पाइप, चिलखत, शिरस्त्राणे, हेल्मेट यामध्येही उच्च कार्यक्षमतेच्या तंतूंचा उपयोग होतो. उच्च कार्यक्षमतेचे तंतू आणि त्यांचे उपयोग हे सतत विस्तारत जाणारे क्षेत्र आहे. आणि हे आव्हान पेलण्याकरिता वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ समर्थ आहेत.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – इंदूर राज्यस्थापना
पुण्याजवळच्या जेजुरीजवळचे खेडे होळ येथील राहणारे मल्हारराव होळकर यांनी १७३३ साली इंदूरचे राज्य स्थापन केले. एक कुशल योद्धा म्हणून मल्हाररावांचा मराठा सन्यात लौकिक होता. पहिला बाजीराव उत्तर दिग्विजय करीत लढाया मारीत असताना त्यांच्याबरोबर अनेक मराठी सेनाधिकारी आपले युद्धकौशल्य दाखवीत होते. उत्तर भारतातील मल्हाररावांच्या उत्तम कामगिरीने प्रभावित होऊन बाजीरावाने त्यांना इंदूरची जहागिरी दिली.
निजामाशी झालेल्या लढायांमध्ये विजय मिळविल्यावर संपूर्ण माळव्यावर मराठय़ांचे वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर मल्हाररावांना माळव्याची चौथ वसुलीची कामगिरी देऊन पेशव्यांनी त्यांना माळव्याचे सुभेदारपद देऊन त्यांना इंदूरजवळचे २८ परगणे दिले. मल्हाररावांनी उत्तर भारतात मराठय़ांचे वर्चस्व निर्माण करून आपला दरारा बसविला. मल्हाररावांनी अनेक लढायांमध्ये स्वत: भाग घेतला. त्यापकी मराठय़ांचा दिल्ली विजय, निजामाचा भोपाळ येथे पराभव, पोर्तुगीज-मराठा युद्धात मल्हाररावांचा सहभाग, जयपूर शासकास मदत हे उल्लेखनीय आहेत.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धापूर्वीच मल्हाररावांनी अहमदशाह अब्दालीबरोबर तहाची बोलणी करून त्याला युद्ध न करता परत पाठविण्याची योजना आखली होती; परंतु त्या आधीच पेशव्यांचे सन्य दिल्लीपर्यंत पोहोचले होते. पानिपत युद्धात गंभीर जखमी झालेल्या मल्हाररावांवर पार्वतीबाईंना सुखरूप बाहेर काढून पुण्यास पोहोचविण्याची कामगिरी सदाशिवराव भाऊंनी सोपविली होती. त्याप्रमाणे ती त्यांनी बरोबर पार पाडली.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

तत्त्वविचार – शरणागती..
श्रीसद्गुरूंचा खरा सहवास घडला तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संतांचा सहवास। याहून भाग्य नाही दुसरे खास।। संतचरणी विश्वास। त्याने भगवंत जोडला खास।।’’ (प्रवचन, २० एप्रिल). सद्गुरूचा खरा सहवास, सद्गुरूच्या चरणी दृढ विश्वास कसा असतो हे तुकाराम महाराज एका ओळीत सांगतात, ‘ठेवूनियां भाव ठेलों पायीं’! अंत:करणातला संपूर्ण भाव त्यांच्या चरणी ठेवून मी स्वत:लादेखील त्यांच्या चरणी संपूर्ण समर्पित केलं. या संपूर्ण समर्पणालाच शरणागती म्हणतात आणि गीतेत अठराव्या अध्यायात भगवंतानं त्या शरणागतीचं महत्त्व सांगितलं आहे. ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।’ (श्लोक ६२) आणि ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज।’ (श्लोक ६६). हे अर्जुना सर्वभावानिशी मला शरण ये आणि सर्व धर्म सोडून देऊन फक्त मला शरण ये! या शरणागतीचं फळ काय आहे? ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत् प्रसादात् परां शांतिम् स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।।’  हे अर्जुना सर्व भावानिशी मला शरण ये. मग तुला अपार शांतीचं स्थान कायमचं प्राप्त होईल. भगवान सर्व भावानिशी शरण यायला सांगतात. आपली स्थिती कशी असते? आपला भाव दुनियेकडे असतो आणि भौतिक जीवनातला अभाव संपावा, एवढाच आपला भाव असतो! मन दुनियेकडे आणि शरीर महाराजांच्या सेवेत कसंबसं वावरत आहे, अशी स्थिती. खिरीच्या पात्रातल्या चमच्याला खिरीची चव कळत नाही तसेच साक्षात ज्ञानस्वरूपाच्या जवळ असूनही आपलं अज्ञान सुटत नाही. तेव्हा दुनियेकडची ओढ, दुनियेकडचा भाव सुटला आणि सर्व भाव त्यांच्या चरणी एकवटला तर अशा शरणागताला शाश्वत शांतीचं स्थान लाभतं. आता हे ‘स्थान’ म्हणजे काय? आपण एखादं घर शोधत असतो. ते घर त्याच परिसरात असतं पण ते सापडत नसतं. जसं आपल्याला सापडत नाही म्हणून घर त्या परिसरात नाहीच, असं काही म्हणता येत नाही. जेव्हा घर सापडतं तेव्हा आपल्याला आनंद वाटतो. तसंच शाश्वत शांतीचं स्थान काही या जगाबाहेर नाही! ते या जगातच आहे पण ते आपल्याला सापडत नाही. आपलं जगणं चिंता, भय आणि अशांतीनं व्यापून आहे. सत्पुरुषांचं जगणं हे निश्चिंती, निर्भयता आणि अखंड शांतीनं व्यापून आहे. दोघेही एकाच जगात आहेत पण दोघांची आंतरिक स्थिती वेगवेगळी आहे. एक अशांत आहे. शांतीचं स्थान त्याला सापडलेलं नाही. दुसरा अखंड शांतीचा सागरच जणू. तेव्हा सर्व भावानिशी मला जर सद्गुरूंच्या चरणी समर्पित होता आलं तर माझी आंतरिक स्थितीच ते पालटतील आणि मग जग आहे तसंच राहूनही याच जगात मला अखंड शांती, अखंड निर्भयता, अखंड निश्चिंतीचा लाभ होईल!
सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण जाणं आणि सर्व धर्म सोडून सद्गुरूंना शरण जाणं, हे एकच आहे.  गुरुदेवांनी सांगितलं, ‘सर्व धर्म म्हणजे मनोधर्म!’ देहसुखासाठीच धडपडणे, हाच मनाचा धर्म असतो. आपलं पाहणं, बोलणं, ऐकणं, वावरणं सारं काही स्वसुखासाठीच असतं. त्या मनोधर्माचा त्याग करून मला शरण ये, असं भगवंत सांगतात. गीतेचे जे दोन श्लोक आपण पाहिले ते ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत् प्रसादात् परां शांतिम् स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।।’ (श्लोक ६२) आणि ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यमि मा शुच:।।’ (श्लोक ६६) असे आहेत. या ६२ आणि ६६ श्लोकांच्या मध्ये बरंच काही घडलं आहे! भगवंत सांगतात की, सर्व भावनिशी मला शरण ये, मग तुला शाश्वत शांतीचं स्थान लाभेल. त्यानंतर ६३ व्या श्लोकात भगवंत सांगतात, हे अर्जुना, अत्यंत गुह्य़ असं ज्ञान मी तुला सांगितलं. आता तू तुला जे योग्य वाटतं ते कर! ‘यथा इच्छसि तथा कुरू’! एकदा सर्व भावनिशी शरण यायला सांगितल्यावर इच्छा कुठून उरणार? हे ऐकताच अर्जुन स्तब्ध झाला. सत्य काय ते सांगितले. आता तू आवडेल ते कर म्हणजे पुन्हा घसरणीचा मोठाच धोका आहे. इथे सद्गुरूंचा स्पष्ट उल्लेख करीत माऊली भगवंताच्या माध्यमातून सांगतात की, हे अर्जुना, समोर ताट भरलं असूनही जो जेवत नाही आणि वर मी उपाशी राहिलो, असं सांगतो तर त्याला काय अर्थ? सर्व दोष त्याचाच आहे. त्याचप्रमाणे, ‘तैसा सर्वज्ञु श्रीगुरू। भेटलिया आत्मनिर्धारू। न पुसिजे जैं आभारू। धरूनियां।। तै आपणपेंचि वंचे। आणि पापही वंचनाचें। आपणयाचि साचें। चुकविलें तेणें।।’ सर्वज्ञ सद्गुरूची भेट होऊनही जो परमकल्याणाचा मार्ग विचारीत नाही तो स्वत:हून त्या मार्गापासून वंचितच होतो आणि वंचनेचे पापही त्याचेच होते.
(चैतन्य प्रेम यांच्या ‘चैतन्य चिंतन’ सदरातून)