News Flash

नवदेशांचा उदयास्त : तायनोंचे बहामाज्…

ब्रिटिश वसाहत असलेला हा द्वीपसमूह १० जुलै १९७३ रोजी मुक्त होऊन स्वायत्त, सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आला.

बहामाज् द्वीपसमूह

अमेरिकेच्या आग्नेयेकडच्या द्वीपराष्ट्र बहामाज्ची ऐतिहासिक ओळख म्हणजे, भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाच्या शोधात ख्रिस्तोफर कोलंबस निघाला आणि भरकटून पोहोचला तो या बहामाज् बेटसमूहातील सॅन साल्व्हादोर या बेटावर! ही घटना आहे सन १४९२ मधील. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यापासून आग्नेय दिशेला ३४० कि.मी. अंतरावरील हा बहामाज् द्वीपसमूह एकूण ७०० लहान-मोठ्या बेटांचा मिळून बनलेला आहे. यांपैकी केवळ ३० बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. येथील समुद्रकिनारे व सृष्टिसौंदर्य यांमुळे सध्या बहामाज् हा देश अमेरिका, कॅनडा, युरोप येथील पर्यटकांचे नंदनवन बनला आहे. बहामाज्च्या एकूण लोकसंख्येच्या पाचपट संख्या इथे वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांची असते!

ब्रिटिश वसाहत असलेला हा द्वीपसमूह १० जुलै १९७३ रोजी मुक्त होऊन स्वायत्त, सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आला. अटलांटिक महासागरात क्युबाच्या उत्तरेला आणि फ्लोरिडाच्या दक्षिणेला स्थित असलेल्या बहामाज् बेटांपैकी न्यू प्रॉव्हिडन्स हे प्रमुख बेट, तर नासाऊ हे राजधानीचे शहर.

१४९२ साली कोलंबस भारतीय भूमीच्या शोधात त्याची तीन जहाजे घेऊन स्पेनहून निघाला. पण तो पोहोचला बहामाज्च्या एका बेटावर. त्याने त्या बेटाचे नामकरण केले ‘सॅन साल्व्हादोर’ असे. त्या वेळी त्या बेटावर आणि आसपासच्या बेटांवर तायनो या जमातीचे लोक राहात. कोलंबस त्या बेटावर काही दिवस राहून पुढे शेजारच्या हैती, क्युबा वगैरे बेटांवर गेला. स्पॅनिश साम्राज्याने बहामाज्मध्ये आपली वसाहत केली नाही; परंतु त्या बेटांवरच्या तायनो आदिवासींना पकडून त्यांना गुलाम बनवून जवळच्या हिस्पानिओला या स्पॅनिश वसाहतीवर मजुरीसाठी पाठवणे सुरू केले. या आदिवासींना गुलाम बनवून, त्यांच्या स्त्रिया-मुलांसह हिस्पानिओलावर सक्तीच्या मजुरीसाठी पाठविण्याचे प्रमाण स्पॅनिशांकडून एवढे वाढले की, १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत बहामाज् बेटांवरची मुळची तायनो आदिवासी जमात पूर्णपणे लुप्त झाली. दक्षिण अमेरिकेतील इतर प्रदेशांप्रमाणे बहामाज्मध्ये सोने नव्हते आणि त्यामुळे स्पॅनिशांना तिथे स्वारस्य नव्हते. या कारणाने बहामाज् बेटे पुढची दीड-दोन शतके ओसाड बनून राहिली. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:09 am

Web Title: historical identity of the bahamas an island in the southeastern united states akp 94
Next Stories
1 कुतूहल : संख्याशास्त्रीय आलेखांचे अर्थ
2 नवदेशांचा उदयास्त : वादळी ग्रेनाडा
3 कुतूहल : संख्याशास्त्रीय आलेखांचे स्वरूप
Just Now!
X