मध्ययुगीन काळात मध्य पूर्वेतून तुर्क, अफगाण, पठाण, मंगोल वगरे समाजाचे अनेक लोक तत्कालीन भारतीय राजे, महाराजे, नवाब, सुलतान यांच्या लष्करांमध्ये भरती झाले आणि त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. त्याचप्रमाणे युरोपीयन देशांमधील अनेक सनिक, सेनानी यांनी महाराजा रणजीतसिंग, कोचिनचा राजा, ग्वाल्हेरचे महादजी शिंदे, हैदराबादचे निजाम वगरे संस्थानिकांकडे नोकरीस येऊन, लढायांमध्ये त्यांना विजय मिळवून दिले. मराठा राज्यसंघातील ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांच्याकडे सुरुवातीला सामान्य सनिक म्हणून नोकरीस लागलेला फ्रेंच तरुण डी बिऑन आपल्या युद्धकौशल्याने लष्करप्रमुख या पदापर्यंत पोहोचला. महादजींनी डी बिऑनकडून आपली फौज आणि शस्त्रागार युरोपिअन पद्धतीने अद्ययावत करून एक प्रबळ सेनादल उभे केले.

डी बिऑन यांचे मूळ नाव बेनॉ लेबार्न. जन्म फ्रान्सच्या सॅव्हाय परगण्याच्या कॅनबेरी येथील १७५१ सालचा. वडिलांचे फर विक्रीचे दुकान. डी बिऑन हे तेरा भावंडांपकी एक. वडिलांनी त्यांच्या फरच्या दुकानावर जी पाटी लावली होती तिथे नावाच्या खाली लिहिले होते की ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात धाडसाने काहीतरी वेगळे करून दाखवा.’ पाटीवरचे हे बोधवाक्य रोज वाचून तरुण डी बिऑनच्या मनात काहीतरी धाडस करण्याच्या इच्छेनं घर करून ठेवलं होतं! वडील फरच्या व्यवसायानिमित्त स्कॉटलंडपर्यंतच्या देशात भ्रमंती करीत असत. जंगलं, त्यातले हिंस्र प्राणी, साप, नागांच्या चच्रेत असलेल्या हिंदुस्थानविषयी त्यांच्या मनात एक गूढ आकर्षण होतेच. ते लहान डी बिआनला हिंदुस्थानच्या सुरस कथा सांगत असत आणि त्याच्या मनातही हिंदुस्थान घर करून बसले!

लेबार्न ऊर्फ डी बिऑन यांनी कॅनबेरी येथील शाळेत आणि रॉयल कॉलेजात शिक्षण घेतल्यावर उत्तर फ्रान्समधील आयरिश रेजिमेंटमध्ये सामान्य सनिक म्हणून दाखल झाले. या सन्यात नोकरी करीत असताना त्यांना अनेक वेळा हिंदी महासागरातल्या बेटांवर जावे लागले. पुढे ते रशियन सन्यात भरती होऊन तिथे दोन वर्षे त्यांनी काम केले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com