कोल्हापूर राज्याचा शासक शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) याच्या निधनानंतर गादीवर आलेला संभाजी महाराज द्वितीय याचा त्याच्या राजवाडय़ातच १८२१ साली सयाजी मोहिते याने खून केला. त्यानंतर कोल्हापूरच्या गादीवर आलेल्या शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब याची कारकीर्द इ.स. १८२१ ते १८३८ अशी झाली. इंग्रज आणि कोल्हापूर राज्य यांच्या दरम्यान इ.स. १७६६ पासून १८२९ सालापर्यंत एकूण पाच तहनामे झाले. बुवासाहेबांना त्यांच्या कौटुंबिक कलहामुळे राजेपदावर येण्यासाठीसुद्धा गव्हर्नर एलफिन्स्टन साहेबाची मान्यता घ्यावी लागली. बुवासाहेबांनंतर गादीवर आलेल्या शिवाजी महाराज तृतीय (कोल्हापूर) ऊर्फ बाबासाहेब यांची कारकीर्द इ.स. १८३८ ते १८६६ अशी झाली. त्याच्या काळात राज्यात शाळांची संख्या झपाटय़ाने वाढून शैक्षणिक प्रगती झाली. १८५४ मध्ये कोल्हापुरात नगरपालिका स्थापन होऊन तिचा कारभार पोलिटिकल सुपरिंटेंडंटच्या देखरेखीखाली सुरू झाला. राज्यात वजने-मापांची सुसूत्रता आणली गेली. पूर्वी कोल्हापूर राज्यात पन्हाळी रुपया, हुकेरी रुपया, नीलकंठी रुपया आणि पीरखानी अशी चार नाणी चलनात होती. त्या जागी या काळात ईस्ट इंडिया कंपनीची नाणी सुरू झाली. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा दत्तकपुत्र राजाराम याची राजेपदाची कारकीर्द इ.स. १८६६ ते १८७० अशी केवळ चार वर्षांची झाली. राजारामाचे परदेशात निधन झाले. राजाराम महाराजाचे निधन झाल्यावर कोल्हापूरच्या राजेपदावर आलेल्या शिवाजी महाराज चतुर्थ या दत्तकपुत्राची कारकीर्द इ.स. १८७१ ते १८८३ अशी झाली. पहिली चार-पाच वष्रे त्याने व्यवस्थित कारभार केल्यावर महाराजाची मन:स्थिती बिघडून त्याला वेडाचे झटके येऊ लागले. अहमदनगरच्या किल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने यशवंत घाटगे या मुलास दत्तक घेऊन शाहू चतुर्थ असे नामकरण केले. शाहू महाराज चतुर्थ यांची राजकीय कारकीर्द इ.स. १८९४ ते १९२२ अशी झाली. शहाजी महाराज द्वितीय यांनी १९४७ साली कोल्हापूर संस्थान भारतीय गणराज्यात विलीन केले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

जलसा – तयार पोशाख

हाय! हाऊ आर यू? कसे आहात? कशा आहात? अशी संभाषणं ऐकू आली की समजायचं पार्टीचा माहोल रंगत आहे. आपली संस्कृती तसं म्हटलं तर उत्सवप्रधान, समाजात मिळून मिसळून जाणं अगदी अंगवळणी पडलंय हे अगदी खरंच आहे. मग ते लग्न, मुंज समारंभाचे एकत्र येणे असो, वाढदिवसाचे निमित्त असो अथवा बिझिनेसनिमित्त पार्टी असो, नेटवìकग साधण्याची संधी ही लाभतच असते. काही रडतराव हजेरी लावून, कारण सांगून सटकण्याच्या प्रयत्नात असतात तर काही दिलखुलास संभाषणांचा आनंद घेतात.
नेटवìकग साधायचं तर तशी मानसिकता हवी. तसा आत्मविश्वास हवा आणि उमंग आणि जोशही हवा. विन-विन परिस्थितीवर पूर्ण भरवसाही हवा. आणि या सगळ्यासाठी हवा साजेसा, समारंभास अनुरूप असा पोशाख. आपल्या रूपास उभारी आणून इम्प्रेशन पाडणारा. कधी निर्धारित ड्रेस कोड असतो, पण बहुतांशी असते आपल्या आवडीच्या वेशभूषेची मुभा. अगदी प्राचीन काळापासून बघा राजा-महाराजांनीसुद्धा वेशभूषेला किती महत्त्व दिले होते ते. कोट, पगडी, जाकीट वगरे. महिला वस्त्रप्रावरणाच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत खूपच जागरूक असतात.
बिझिनेस पार्टीत कधी निर्धारित ड्रेस कोड असतो. आणि जरी नसला तरी एकंदरीत कल बघून वेशभूषा केलेली बरी. आपली वेशभूषा नकळत अबोलपणे बरेच काही सांगून जाते. ती आपल्या व्यक्तिमत्त्वाची ‘सदिच्छा सूचक’ (‘ब्रान्ड इन्फर्मर’) असते असं म्हणू हवं तर. विविध रंगांची, वेगवेगळ्या पोतांची, अनेकविध डिझाइनची वस्त्रे उपलब्ध आहेत. हवी तशी, कमी-अधिक प्रमाणातील चमकधमकही असते. अतिशय कल्पकतेने डिझाइनर्स डिझाइन बनवतात. विविध प्रकारचे तंतू, विविध प्रकारच्या वीण त्यांच्या कल्पनाशक्तीला बहर आणतात. प्रोसेसिंग प्रक्रियेद्वारे या वस्त्रांना जणू फुलोरा येतो. गरज असते ती योग्य, गुणवत्तेच्या वस्त्रांच्या निवडीची. औपचारिक वेशभूषा असो, उत्सवी वेशभूषा असो, पारंपरिक वेशभूषा असो, नमित्तिक पोशाख असो अथवा इतर काही कल्पना : टेलर्स, स्टायलिस्ट अथवा डिझाइनर्स आपल्या कल्पना आविष्कारासाठी वस्त्रनिर्मात्यांबरोबर सज्जआहेत. मग वाट कसली बघताय, साजेसा, अनुरूप, आत्मविश्वास द्विगुणीत करणारा पोशाख निवडा आणि करा आपल्या जीवनात दिलखुलास ‘जलसा’.

> सुनील गणपुले (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org