21 January 2019

News Flash

जे आले ते रमले.. : शेरशाह सुरी

शेरशाह ऊर्फ फरीदने प्रथम बहारखान लोहानी या मोगलांच्या बिहारच्या सुभेदाराकडे नोकरी धरली.

शेरशाह सुरी

भारतात आलेले पश्तून ऊर्फ पठाण लोक विविध प्रदेशांत स्थायिक झाले. त्यापैकी बिहारच्या पाटणा आणि परिसरात स्थायिक झालेले, ‘बिहारी पठाण’ म्हणून ओळखले जातात. सोळाव्या शतकात, काही काळ प्रबळ मोगलशाहीला खीळ घालणारा राज्यकर्ता शेरशाह सुरी हा बिहारी पठाण समाजातील होता. मोगल बादशाह हुमायुँला युद्धात पराभूत करून सुरी साम्राज्य स्थापित करणारा शेरशाह एक लोकप्रिय शासक होता.

सध्या बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराम या गावात १४७२ मध्ये जन्मलेल्या शेरशाहचे मूळ नाव फरीदखान होते. आजोबा मोगलांचे प्रतिनिधी आणि जहागीरदार तर वडील पंजाब मधील श्रीमंत जमीनदार जमाल खानकडे नोकरीला. वडील घोडय़ांचे संकरतज्ज्ञ होते. यांचे आडनाव सुरी हे त्यांच्या मुळच्या ‘सुर’ या टोळीच्या नावावरून घेतलेले आहे.

शेरशाह ऊर्फ फरीदने प्रथम बहारखान लोहानी या मोगलांच्या बिहारच्या सुभेदाराकडे नोकरी धरली. फरीदच्या युद्धकुशलतेमुळे प्रभावीत झालेल्या सुभेदाराने त्याला ‘शेरखान’ हा खिताब दिला. बहारखानाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा जलालखान याचा पालक कारभारी बनून शेरखान मोगलांच्या बिहारच्या सुभेदारीचा कारभार पाहू लागला. पुढे जलाल मोठा होऊन समज आल्यावर त्याला आपण नावाचेच सुभेदार असल्याचे जाणवू लागले. शेरखान ऊर्फ शेरशाहशी त्याचे खटके उडू लागले. एक उत्तम रणनीतीकार असलेला शेरखान बाबराच्या फौजेचा एक सेनाधिकारी म्हणूनही काम करीत असे. जलालखानने बंगालचा सुभेदार घियासुद्दीन महमूद शाह याची मदत मागून त्याला शेरखानावर फौज पाठवून हल्ला करण्याची विनंती केली. जलालच्या या कटाचा सुगावा लागलेला शेरखान घियासुद्दीनच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार होताच. १५३४ साली सूरजगढ येथे झालेल्या लढाईत शेरखान घियासुद्दीनचा पराभव करून बिहारचा सुभेदार म्हणून औपचारिकरीत्या कारभार करू लागला. पुढे चार वर्षांनी शेरखानाने घियासुद्दीनवर चढाई करून त्याचा परत एकदा पराभव केला, परंतु बंगाल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही.

sunitpotnis@rediffmail.com

First Published on May 16, 2018 3:04 am

Web Title: history of sher shah suri