News Flash

नवदेशांचा उदयास्त : जमैकातील गुलामगिरी

गुलामांच्या गाऱ्हाण्यांची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने मळेवाल्यांवर गुलामांशी वागणुकीत काही बंधने घातली.

जमैकातील गुलामांची स्थिती दर्शवणारे चित्र

स्पॅनिश वसाहतवाल्यांच्या छळामुळे जमैकाचे मूळचे आदिवासी पळून गेल्यावर मजुरीसाठी जमैकात मोठय़ा संख्येने आफ्रिकन गुलाम आणणे सुरू झाले. यातल्या काही गुलामांचा जमैकाच्या आदिवासींशी संबंध येऊन तयार झालेल्या संततीला ‘मरून’ हे नाव पडले. या मरून लोकांचा एक समाज जमैकात अस्तित्वात आला. थोडेफार ज्यूही इथे स्थायिक झाले. सतराव्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश राजवटीला जमैकाच्या स्पॅनिश वसाहतीत स्वारस्य वाटायला लागून त्यांनी १६५५ साली दोन वेळा हल्ले केले. स्पॅनिश सैन्याने मरून लोकांच्या मदतीने हे हल्ले परतवून लावले. परंतु १६५८ आणि १६६० साली मरून लोकांनी ब्रिटिशांना मदत केली आणि ब्रिटिशांच्या आरमारी आक्रमणात स्पॅनिश पराभूत झाले. जमैका ब्रिटिश वसाहत बनली.

१६६० साली जमैकात साधारणत: ४५०० गोरे युरोपियन आणि १५०० कृष्णवर्णीय आफ्रिकन्स होते. गोऱ्यांमध्ये अधिकतर आयरिश होते. पुढे ब्रिटिशांनी मोठय़ा प्रमाणात उसाची लागवड करून मजुरीसाठी मोठय़ा संख्येने आफ्रिकन गुलाम आणले. दहा वर्षांमध्ये आफ्रिकन गुलामांची संख्या युरोपियनांहून अधिक झाली. १६६४ मध्ये ब्रिटिशांनी काही मर्यादित अधिकार देऊन जमैकाचे स्थानिक विधिमंडळ स्थापन केले. परंतु त्यात केवळ मूठभर श्रीमंत ब्रिटिश मळेवाल्यांचेच प्रतिनिधित्व होते. अठराव्या शतकात जमैकाची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी राहिली ती प्रामुख्याने साखर उत्पादनावर! पण साखरेच्या जोडीला ब्रिटिशांनी जमैकातून कॉफी, कापूस आणि नीळ यांची निर्यातही वाढवली. अर्थात हे सारे कृष्णवर्णीय आफ्रिकन गुलामांच्या अपार कष्टांमधूनच शक्य झाले. हे आफ्रिकन गुलाम अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस तर ऊसमळ्यांच्या वाढीबरोबर या गुलामांची संख्या इतकी मोठी झाली, की गोऱ्या युरोपियनांच्या वीसपट हे आफ्रिकन गुलाम झाले!

गुलामांच्या गाऱ्हाण्यांची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने मळेवाल्यांवर गुलामांशी वागणुकीत काही बंधने घातली. त्यामध्ये त्यांना आठवडय़ातून एक दिवस सुट्टी, मळेवाल्यांनी गुलामांना चाबकाने मारणे आणि स्त्रियांवरील अत्याचारास बंदी, गुलामांना त्यांच्या धर्मपालनाची मुभा अशी गुलामांना अनुकूल बंधने होती. ब्रिटिशांनी पुढे त्यांच्या साम्राज्यात १८३४ साली गुलामगिरी कायद्याने बंद केली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2021 2:16 am

Web Title: history of slavery in jamaica zws 70
Next Stories
1 कुतूहल- गणिती संक्षिप्तता
2 नवदेशांचा उदयास्त ; जमैका : जंगल व पाण्याची भूमी
3 कुतूहल :  विशाल गणिती सिद्धता
Just Now!
X