हॉल्मिअम हा मऊसर चमचमत्या चंदेरी रंगाचा धातू आहे. वर्धनीयता गुणधर्मामुळे तो वाकवता येतो अथवा त्याला आकार देता येतो. हॉल्मिअम धातू गंजरोधक आहे. सामान्य तापमानाला आणि दाबाला हॉल्मिअम कोरडय़ा हवेशी अभिक्रिया करत नाही. बाष्प असलेल्या हवेत आणि उच्च तापमानाला, हॉल्मिअमचं ऑक्सिडेशन होतं आणि पिवळ्या रंगाचं हॉल्मिअम ऑक्साइड तयार होतं. हॉल्मिअम ऑक्साइडच्या रंगाची गंमत म्हणजे प्रकाशानुसार त्याचा रंग बदलतो. दिवसाच्या प्रकाशात हॉल्मिअम ऑक्साइड पिवळा तर त्रिवर्णी (ट्रायक्रोमॅटिक) प्रकाश असेल तर नारंगी-लाल रंगाचा असतो. पिवळ्या किंवा लाल रंगाच्या काचा तयार करताना हॉल्मिअम ऑक्साइडचा वापर करतात. हॉल्मिअम ऑक्साइड असलेल्या काचा उत्तम प्रकारे दृश्य प्रकाश शोषतात, त्यामुळे त्यांचा उपयोग प्रकाशीय वर्णपंक्तीमापीमध्ये केला जातो. हॉल्मिअम ऑक्साइड उत्प्रेरक म्हणूनही वापरला जातो.

हॉल्मिअमचा मानवी शरीरात जीवशास्त्रीयदृष्टय़ा फारसा उपयोग नाही. तरीही प्रत्येक मूलद्रव्याचे काही ना काही गुणधर्म मानवाला उपयुक्त आहेतच त्याचप्रमाणे, हॉल्मिअम धातू अथवा त्याच्या संयुगांचाही आपल्याला उपयोग होतो. हॉल्मिअम या धातूची चुंबकीय क्षमता खूप जास्त आहे, त्यामुळे चुंबक तयार करण्यासाठी या धातूचा उपयोग केला जातो. एवढेच नव्हे तर या धातूच्या वापरामुळे चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्राची शक्ती वाढवता येते. याच कारणास्तव हॉल्मिअम हा धातू कृत्रिम चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी वापरला जातो. ‘एमआरआय’ मशीन, ज्यात चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरी यांचा वापर मानवी शरीरातील अवयवांची चित्रे मिळविण्यासाठी केला जातो, त्यात हॉल्मिअमचा वापर केला जातो. हॉल्मिअमच्या वापराने ‘एमआरआय’मधून मिळणारी चित्रे अधिक स्पष्ट असतात. हॉल्मिअमच्या न्यूट्रॉन शोषण्याच्या गुणधर्मामुळे अणुभट्टी नियंत्रक म्हणूनही हॉल्मिअम वापरले जाते.

मायक्रोवेव्हमधील लेझर, वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय लेझर, तसेच प्रकाशतंतूमध्येही हॉल्मिअमचा वापर होतो. निसर्गात हॉल्मिअम-१६५ हे स्थिर समस्थानिक आहे. कृत्रिम समस्थानिकांत हॉल्मिअम-१६३ हे सर्वात जास्त स्थिर आहे, तर इतर समस्थानिके किरणोत्सारी आहेत. हॉल्मिअम-१६३ चा अर्ध-आयुष्यकाळ ४५७० वर्षांचा आहे. मात्र, हॉल्मिअमच्या इतर अनेक किरणोत्सारी समस्थानिकांचा अर्ध-आयुष्यकाळ तीन तासांपेक्षाही कमी आहे.

अनघा वक्टे ; मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org