16 December 2019

News Flash

घर शाळेत आणि शाळा घरात

शिक्षकांनी अभ्यासक्रम समजावून सांगावा, ही पहिली पायरी. आणि त्यासंबंधित काही सोपे आणि साधे उपक्रम मुलांना करायला द्यावेत.

संग्रहित छायाचित्र

घर शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा घरात आली पाहिजे, विनोबा भावे यांचं खूप महत्त्वाचं वाक्य आहे हे!

असे दोन वेगळे कप्पे किमान प्राथमिक शाळेत तरी नसावेत. घर आणि शाळा या दोन वेगवेगळ्या जागा असतात. तिथली माणसं वेगवेगळी असतात. रचना, सूचना, मांडणी, नाती सगळंच वेगळं असतं. सुरुवातीच्या काळात यामुळे मूल भांबावून जातं. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा काळ हा मुलांच्या दृष्टीने संवेदनशील असतो. शाळेत मूल जे काही शिकतं त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध कुठेतरी जीवनाशी असतोच. घराशीही असतो. भाषा, सामाजिक शास्त्रं, विज्ञान, गणित हे घरात असतं. पण त्याचा संबंध लावला जात नाही. मुळात शाळेत जे विषय शिकले जातात त्याचा संबंध केवळ प्रश्नोत्तरं लिहिण्यापुरता आणि गुण मिळवण्यापुरता आहे असा घट्ट समज झाला आहे.

अभ्यसक्रम म्हणजे शिक्षण असे कप्पे तयार  झाले आहेत. मुलं अभ्यासक्रम ऐकून घेतात  आणि परीक्षेत मांडतात. शाळेतल्या प्रयोगशाळेत प्रयोगही करतात. पण त्या प्रयोगाचा घरच्या कोणत्या गोष्टींशी संबंध आहे हेही सांगायला पाहिजे. घर आणि शाळा, समाज आणि शाळा – हे जोडकाम व्हायला हवं.

शिक्षकांनी अभ्यासक्रम समजावून सांगावा, ही पहिली पायरी. आणि त्यासंबंधित काही सोपे आणि साधे उपक्रम मुलांना करायला द्यावेत.  असे उपक्रम जे विकत मिळणार नाहीत, जे पालकांना करता येणार नाहीत, ज्यात स्पर्धा आणि गुण नसतील.  असे केवळ विचारप्रक्रियेला चालना देणारे उपक्रम. ते अर्थपूर्ण शिक्षण असेल. मग हे उपक्रम मुलाने शाळेत करावेत किंवा घरात करावेत. मात्र स्वत:ने करावेत.

मूल शाळेच्या आवारात प्रवेश करतं झालं की घरातल्या गप्पा बंद. घराविषयी कोणाशी फार बोलायचं नाही. शिक्षकांशी तर नाहीच. माझं घर, माझी आई असे विषय आले की तेवढय़ापुरतं घरात डोकावून यायचं आणि घराचा कप्पा बंद करायचा. अशी आपली व्यवस्थाच आहे.

तसंच शाळेतून घरी गेलं की ‘काय झालं आज शाळेत? काय अभ्यास दिलाय?’ अशा दोन- चार प्रश्नात शाळा हा विषय संपतो. अभ्यास     कर, अभ्यास का करत नाहीस? असा धोशा सुरू होतो. यापलीकडे शाळा या विषयावर गप्पा होत नाहीत.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on November 20, 2019 1:30 am

Web Title: home school school home akp 94
Just Now!
X