ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना भारतात आल्यावर या देशाच्या विभिन्न स्थानिक भाषा, संस्कृती, कलाप्रकारांनी मोठी भुरळ घातली. कंपनी सरकारने ज्या कामासाठी त्यांची भारतात नियुक्ती केली ते काम करतानाच त्यापकी अनेकांनी काहीतरी निराळा व्यासंग लावून घेतला आणि आपला वेगळा ठसा उमटवला, आणि आपली वेगळी चिरंतन ओळख करून ठेवली आहे.

त्यापकी एक आहे होरॅस हेमॅन विल्सन. जन्म १७८६ सालचा, लंडनमधला. सेंट थॉमस हॉस्पिटलमधून विल्सनने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने काही काळ ऑक्सफर्ड विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे अध्यापन आणि भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथालय प्रमुख म्हणून काम पाहिले. त्या ग्रंथालयातील पुस्तके वाचून भारतातल्या विभिन्न भाषा, प्राचीन संस्कृती यांनी प्रभावित झालेल्या विल्सनने विद्यापीठीय नोकरीचा थेट राजीनामा देऊन कंपनीच्या लंडनच्या प्रमुख कार्यालयाकडे नोकरीसाठी अर्ज केला. साहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या कलकत्ता येथील प्रेसिडेन्सीत त्याची नियुक्ती झाली आणि विल्सन १८०८ साली कंपनीच्या नोकरीत रुजू झाला.

हरहुन्नरी स्वभावाच्या विल्सनचे धातुशास्त्राचेही चांगले ज्ञान होते त्यामुळे त्याचे कलकत्त्याच्या टाकसाळीतही जाणेयेणे होत असे. तिथेच त्याची ओळख जॉन लेडन या पौर्वात्य भाषा अध्यापकाशी झाली. जॉन लेडनच्या परिचयामुळे विल्सनला भारतीय प्राचीन भाषांमध्ये आणि साहित्यात रुची निर्माण झाली. या काळात तो बंगाली, संस्कृत आणि हिंदी भाषांचा चांगला जाणकारही झाला. त्याच्या भारतीय भाषा आणि साहित्य प्रेमामुळे आणि हेन्री थॉमस कोले ब्रुकच्या शिफारसीमुळे १८११ साली विल्सनची बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संस्कृत आणि बंगाली भाषा आणि साहित्याच्या प्रेमात पडलेला हा ब्रिटिश तरुण संस्कृतमधल्या वेद, पुराणांच्या ग्रंथांचा, पोथ्यांचा आणि संस्कृत नाटकांचा अभ्यास करण्यासाठी दोन वष्रे बनारसला जाऊन राहिला. विल्सनने बनारसमधल्या नामवंत वेदसंपन्न पंडितांच्या आणि संस्कृत नाटकांचे विद्वान अभ्यासक यांच्या शिकवण्या लावून सखोल अभ्यास केला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com