पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात. ही अन्नद्रव्ये धारण करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते. जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा एक भाग आहे. पुष्कळ वेळा जमिनी सकस असूनही त्या सुपीक असतातच असे नाही. परंतु सुपीक जमिनी मात्र निश्चितच कसदार असतात.
जमिनीची सुपिकता ही तिच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर तसेच मशागतीच्या पद्धतींवर अवलंबून असते. ज्या खडकापासून जमीन तयार झाली, त्या खडकात भरपूर खनिजे असल्यास त्यापासून सुपीक जमीन तयार होते. आयन विनिमयामुळे पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. मॉन्टमोरिलोनाइट खनिजाची आयन विनिमय शक्ती जास्त असते. हे खनिज मातीत असल्यास जमिनीची सुपिकता वाढते.
अतिपावसाच्या प्रदेशात जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून गेल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. गवताळ आणि थंड कटिबंधातील जमिनीत भरपूर सेंद्रीय पदार्थ असल्याने त्या प्रदेशातील जमिनी सुपीक असतात.
उष्ण कटिबंधातील कमी पावसाच्या भागात सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण कमी असते. या प्रदेशातील जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे विघटन झपाटय़ाने होते. म्हणून जमिनी लवकर नापीक होतात. जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण दोन ते तीन टक्के असते. टेकडय़ांच्या उतारावरील जमिनी कमी सुपीक असतात. अशा जमिनीत गाळाबरोबर वाहून आलेली अन्नद्रव्ये गोळा होतात व साठतात.
जमिनीच्या सुपिकतेच्या घटकांमध्ये मातीची जोपासना, सेंद्रीय व रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर, पाणी व जमीन व्यवस्थापन, योग्य मशागत, पिकांची योग्य फेरपालट, रोग व किडींचा योग्य बंदोबस्त यांचा समावेश होतो. जमिनीतील सेंद्रीय द्रव्यांमुळे जमिनीची घडण, निचरा शक्ती, आयन विनिमय शक्ती सुधारते आणि जमिनी सुपीक बनतात.
शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी जमिनीत ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, ती अन्नद्रव्ये आवश्यक त्या प्रमाणात घालून त्याची योग्य पातळी राखावी. जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रीय आणि रासायनिक खते घालून जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक घडण सुधारून घ्यावी आणि द्विदल पिकांची योग्य प्रमाणात फेरपालट करावी.

जे देखे रवी.. – दोष की प्रवृत्ती?
स्त्री आणि पुरुष यांच्यामधली ओढ ही आदिम आहे. त्यातून मूल होते आणि मग आई ही गोष्ट निर्माण होते आणि म्हणून या ओढीच्या मानाने आईचे प्रेम दुय्यम ठरते, असे मी लिहिले खरे; पण त्यामुळे भाबडी मानवजात रागावण्याची शक्यता आहे. इथे स्त्री-पुरुषांची एकमेकांमधली ओढ आणि हे आईचे प्रेम मी तराजूत टाकत नाही. प्रेमाला तराजू लावता येत नाही. स्त्री-पुरुषांबद्दलच्या सगळ्याच पुराणातल्या कथा मोठय़ा गमतीदार आहेत. ब्रह्मातून विश्व निर्माण करणारा देव म्हणजे ब्रह्मदेव, त्याची मुलगी सरस्वती अशी आख्यायिका आहे. हिचे वर्णन ज्ञानेश्वरांनी वागविलासिनी असे केले आहे. ती हवीच, कारण नाहीतर माणसाचा बौद्घिक आणि सांस्कृतिक विकास व्हायचा तरी कसा? या आपल्या मुलीच्या प्रेमात ब्रह्मदेव पडला अशी एक अस्पष्ट कथा पुसण्याचा प्रयत्न करूनही शिल्लक आहे. त्यावरही ज्ञानेश्वरांची ओवी आहे. त्यात हीच ती आदि (पुरुषाची) माया। ब्रह्मदेवही पडला होता पाया। अशी रचना आहे. वरील ओढीचीच ही आदिम आकृती. अकराव्या अध्यायात मला विश्वरूप दाखव, असा हट्ट अर्जुन धरतो तेव्हा श्रीकृष्ण जे स्वत:च्या बायकोला म्हणजे लक्ष्मीलाही दाखवले नाही ते अर्जुनाला दाखवायला एकदम उत्सुक होतो. याचे वर्णन करताना
। जरी लंपटाला। सुंदरी कह्य़ात घेते। तसे श्रीकृष्णाचे झाले। अर्जुनाशी।  या ओवीतला लंपट श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे ती सुंदरी. ज्ञानेश्वरांसारखे सभ्य संत असे दृष्टांत देतात तेव्हाही ते एका आदिम आकर्षणाचीच आठवण करतात. शेवटी पुरुष थोडा तरी लंपट असतोच आणि असावाच लागतो. ही निसर्गाची रीत आहे. नाहीतर सुंदऱ्यांनी कह्य़ात कोणाला घ्यायचे, असा प्रश्न निर्माण होईल. अ‍ॅडम आणि ईव्हच्या मध्यपूर्वेतील जुन्या करारातली गोष्ट बघा. अ‍ॅडमला एका बागेत ठेवले आहे. तो कंटाळतो म्हणून त्याला मैत्रीण देण्याच्या उद्देशाने त्याच्या बरगडीतून एक स्त्री निर्माण केली जाते आणि ‘तुम्ही मजा करा, पण निष्पाप तऱ्हेने’ असे त्यांना बजावण्यात येते. ते कोठले व्हायला? जे व्हायचे तेच होते आणि त्याचे खापर ईव्हच्या माथी फोडण्यात येते. हे ‘पुरुष मेले करून सवरून वेगळे’ असे बायका म्हणतात ते काही खोटे नाही.
दोष तुमच्या दोघांचा आहे, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते जरी खरे असले तरी त्याला दोष हा शब्द चुकीचा असतो, कारण ही वृत्ती किंवा प्रवृत्ती असते. ती आदिम असते. ही तात्कालीन शरीरात भिरभिरणाऱ्या रसायनांवर ठरते. असा विचार केला की मग, मुळात या पौराणिक कथाच मुळी पूर्वग्रहदूषित आहेत असेच म्हणावे लागते, कारण मानववंशशास्त्र म्हणते- ‘पहिल्यांदा मुळी पुरुष नव्हताच, होती केवळ एक आदिस्त्री.’
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – छातीत दुखणे : भाग – ३  
वरवर पाहता हा विकार सामान्य वाटत असला तरी ज्यांना हृद्रोगाचा किंवा हृदयाच्या झडपांचा; वा रक्तवाहिन्यांच्या रोगांचा इतिहास आहे. त्यांनी; अतिस्थूल व्यक्तींनी व कामाचा ताणतणाव चिंता असणाऱ्यांनी पुढील उपचार नेटाने करावे. सुवर्णमाक्षिकादि वटी, शृंग भस्म, लाक्षादि व त्रिफळा गुग्गुळ, अभ्रकमिश्रण प्र. ३ गोळ्या दोन वेळा; जेवणानंतर अर्जुनारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. मधुमेह व रक्तदाबवृद्धी ही लक्षणे असल्यास चंद्रप्रभा, मधुमेहवटी, रसायनचूर्ण यांची तारतम्याने योजना करावी. अतिस्थौल्य असल्यास त्रिफळा गुग्गुळ योजावा.
खूप औषधे घेण्यापेक्षा दहा ग्रॅम अर्जुनसाल चूर्ण, एक कप दूध, एक कप पाणी असे एकत्र उकळवून, पाणी आटवून ते दूध अनोशापोटी सकाळी घ्यावे. थोडय़ाशाही श्रमाने, छातीतील स्नायूंमुळे छातीत दुखत असल्यास लघुमालिनी वसंत सहा गोळ्या, शृंगभस्म, लाक्षादि, गोक्षुरादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा दुधाबरोबर घ्याव्यात. जेवणानंतर अश्वगंधारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. महानारायण तेल हलक्या हाताने सकाळी आंघोळीच्या अगोदर व रात्रौ झोपण्यापूर्वी छातीस जिरवावे. खोकला, कफ, सर्दी, दमा, क्षय, फ्लुरसी असा पूर्वेतिहास असणाऱ्यांनी लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमा गोळी, लवंगादि गुग्गुळ व अभ्रकमिश्रण प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. जेवणानंतर नागरादिकषाय चार चमचे घ्यावा. थुंकीतून रक्त पडत असल्यास लाक्षादि गुग्गुळ व प्रवाळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. एलादिवटी एक एक गोळी करून सहा गोळ्या रोज चघळाव्या. छातीत संचारी वेदना व पोटात वायू धरत असल्यास जेवणानंतर शंखवटी, पाचकचूर्ण, पिप्पल्यासव यांची तारतम्याने योजना करावी. मलावरोध लक्षण असल्यास गंधर्वहरितकी किंवा त्रिफळा चूर्ण रात्रौ घ्यावे. विविध वातविकार, अर्धागवात अशी पाश्र्वभूमी असल्यास; छातीत दुखणाऱ्यांनी दशमूलारिष्ट, अभयारिष्ट वा तज्ज्ञांच्या सल्ल्याने काढय़ाचा एनिमा किंवा तेलाची पिचकारी यांची योजना करावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –   २२ फेब्रुवारी
२००० > परदेशांतील मराठी भाषकांच्या साहित्यिक ऊर्मीना प्रोत्साहन देऊन अशी पुस्तके प्रकाशित करणारे पहिले महाराष्ट्रीय प्रकाशक व ‘श्रीविद्या प्रकाशन’चे संस्थापक दामोदर दिनकर (मधुकाका) कुलकर्णी यांचे निधन. प्रकाशन व्यवसायातील दीर्घ अनुभवानंतर त्यांनी ‘श्रीविद्या’ सुरू केले व कालांतराने पु. ल. देशपांडे, य. दि. फडके, द्वा. भ. कर्णिक, अमृता प्रीतम अशा बिनीच्या लेखकांसह दलित साहित्यातील महत्त्वाची पुस्तके प्रकाशित केली.
२००९ > ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे लेखक आणि त्यातील सर्व ५२ व्यक्तिरेखा रंगमंचावर सादर करणारे नट प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. डॉ.  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाटय़शास्त्र विभागाचे ते प्रमुख होते.
२१ फेब्रुवारी*
१९४५ > प्रकाशक व ‘दस्तयेवस्की’, ‘इब्सेन: व्यक्ती आणि नाटक’ या ग्रंथांचे लेखक अनिरुद्ध अनंत कुलकर्णी यांचा जन्म १९७७ > अर्वाचीन मराठी काव्याचे मीमांसक व समीक्षक प्रा. रामचंद्र श्रीधर जोग यांचे निधन
संजय वझरेकर
* कवी रा. अ. काळेले यांचा जन्म (२२ फेब्रु. १९०७) आणि राम केशव रानडे यांचा जन्म (२२ फेब्रु. १९०८) या नोंदी अनवधानाने २१ फेब्रुवारीच्या अंकात छापल्या गेल्या होत्या.