मेंदूचे महत्त्व फार पूर्वीच उमगले असले तरी मेंदूकडून येणाऱ्या विविध सूचनांची अंमलबजावणी कशी केली जाते, हे एक कोडे होते. अठराव्या शतकात ‘प्राणिज विद्युत’ या प्राण्यांच्या शरीरातील विद्युतशक्तीवर बरेच प्रयोग झाले. याचे एक उदाहरण म्हणजे, इटालियन वैद्यकतज्ज्ञ लुइगी गॅल्वानी याने दोन धातू एकमेकांना जोडून बनवलेल्या (द्विधातुक) पट्टीने बेडकाच्या पायाला स्पर्श केल्यावर त्या बेडकाचे स्नायू आखडतात, हे दाखवून दिले. गॅल्वानीच्या मते मेंदूत विद्युतशक्ती निर्माण होऊन ती सर्व स्यायूंमध्ये पसरत असावी. स्नायूंना धातूंच्या पट्टीचा स्पर्श झाल्यावर ती विद्युतशक्ती नष्ट होत असल्याने, बेडकाचे पाय आखडत असावेत. हे प्रयोग संदेशवहनातील विद्युतसंदेशांचा सहभाग दर्शवत होते. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मज्जासंस्था ही एकसंध नसून ती न्यूरॉन या पेशींपासून बनली असल्याचे माहीत झाले. त्यामुळे मज्जासंस्थेतील एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत संदेशवहन कसे होते, याची संशोधकांत उत्सुकता निर्माण झाली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस हेन्री डेल या इंग्लिश वैद्यकतज्ज्ञाने काही रसायने ही नसांवर विशिष्ट परिणाम घडवून आणत असल्याचे नोंदवले होते. नसा उत्तेजित होतानाही अशी रसायने निर्माण होत असल्याची शक्यता त्याने वर्तवली. इ.स. १९२१ साली ऑट्टो लोएवी या जर्मन संशोधकाने एक प्रयोग केला. त्याने एक बेडकाचे हृदय घेतले. या हृदयाच्या स्पंदनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा तशाच ठेवल्या होत्या. हे हृदय लोएवीने क्षारांच्या द्रावणात ठेवून विद्युतप्रवाहाच्या मदतीने त्याला उत्तेजित केले. त्यानंतर हे वापरलेले द्रावण त्याने तशाच दुसऱ्या एका बेडकाच्या, नसा काढून टाकलेल्या हृदयात भरले. तेव्हा हे हृदय बाहेरून कुठल्याही प्रकारची मदत नसतानासुद्धा चालू झाले. म्हणजे या द्रावणात पहिल्या बेडकाच्या नसांद्वारे तयार झालेली काही विशिष्ट रसायने अस्तित्वात होती. हेन्री डेल याने १९१४ साली शोधलेले अ‍ॅसेटिलकोलाइन हे अशा प्रकारचे पहिले रसायन होते. एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे होणारे संदेशवहन हे या रसायनांद्वारे होत असते, तर न्यूरॉनच्या आतले, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे संदेशवहन हे मात्र विद्युतसंदेशांद्वारे होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हेन्री डेल आणि ऑट्टो ओएवी यांना मज्जासंस्थेतील या संदेशवाहक रसायनांच्या संशोधनाबद्दल १९३६ सालचे नोबेल पारितोषिक दिले गेले.

– डॉ. अंजली कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org