16 December 2017

News Flash

कुतूहल:फळे कृत्रिमरीत्या कशी पिकवितात?

झाडांवर फळांचे पिकणे हा एक नैसर्गिक, अपरिवर्तनिय बदल आहे. वनस्पतीचे जीवनचक्र पूर्ण होताना लंगिक

मुंबई | Updated: February 15, 2013 12:48 PM

झाडांवर फळांचे पिकणे हा एक नैसर्गिक, अपरिवर्तनिय बदल आहे. वनस्पतीचे जीवनचक्र पूर्ण होताना लंगिक प्रजननानंतर फुलाचे फळात रूपांतर होते. हे रूपांतर होताना फळाच्या अंतरंगात तसेच त्याच्या बाह्यरूपात फरक पडतो. काही विशिष्ट चयापचय क्रिया फळे पक्व  होण्याच्या प्रक्रियेशी निगडीत आहेत. या प्रक्रियेत पेक्टिनेजेस, सेल्युलेबेस यांसारखी विकरे सक्रीय होतात. अपरिपक्व  फळांत शर्करांचे प्रमाण कमी असून आम्लांचे प्रमाण जास्त असते. फळे पिकण्याच्या क्रियेत आम्लाचे प्रमाण कमी कमी होऊन शर्करा वाढतात. त्यामुळे फळांच्या चवीत फरक जाणवतो. विकरांच्या योग्य क्रियेसाठी काही विशिष्ट तापमान, हवेतील आद्र्रता  असणे गरजेचे असते. (नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी फळांना विशिष्ट मोसम आवश्यक असतो, तो यामुळे).
काही संप्रेरके (संजीवके) फळे पक्व होण्याच्या प्रक्रियेशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ, इथिलीन वायू. फळांच्या रंगातील बदलही लक्षणीय असतो. काही रंगद्रव्यांची निर्मिती उपलब्ध असणारया प्रकाशावर अवलंबून असते. काही फळांमध्ये पक्व  होण्याच्या क्रियेत श्वसनाचा वेगही जाणवण्याइतपत वाढतो. घट्टपणा कमी होऊ लागतो. नैसर्गिक घटकांच्या असंतुलनाने कधीकधी रोग अथवा कीड यांचा प्रादुर्भाव जाणवतो. अशा परिस्थितीत फळांचे नुकसान होऊ शकते. यावर मात करण्यासाठी फळे कृत्रिमरित्या पिकविली जातात. त्यांना आवश्यक ऊब (तापमान) मिळण्यासाठी कृत्रिमरित्या गवताच्या पेंढय़ात अथवा कागदात गुंडाळून ठेवली जातात. काही वेळा विशिष्ठ तापमानात ओव्हन अथवा इन्क्युबेटरमध्ये ठेवली जातात. फळांना वरून काही पावडरींचा लेप लावला जातो. या पावडरीमुळे इथिलीन वायूची निर्मिती होते व पुढील बदलांना चालना मिळते. फळांवर जीवाणूजन्य रोग येऊ नयेत, म्हणून योग्य पद्धतीने त्यांचे र्निजतुकीकरण केले जाते. विशिष्ट अवस्थेत फळांची झाडावरून काढणी केली जाते. मग स्वच्छ धुऊन पुढील कृत्रिम प्रक्रिया केल्या जातात.
कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यामुळे सर्व फळे एकाच अवस्थेत राहातात. त्यांची टिकवण क्षमता वाढते. त्यांचा आकर्षकपणा वाढतो. त्यांचा श्वसनाचा वेग कमी करण्यासाठी काही वेळा वरून काही लेप लावले जातात. फळांच्या वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान कमी होऊ शकते. अशा फळांना बाजारात विक्रीसाठी जास्त दर मिळून शेतकऱ्याचाही फायदा होऊ शकतो.
-स्मिता जाधव (ठाणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस:खांद्याचे विकार : फ्रोजन शोल्डर
खांदा जखडणे, अवबाहुक फ्रोजन शोल्डर या विकारापुरताच मर्यादित विचार या लेखात आहे. या विकारात खांद्याची रचना, सूज, स्नायू त्याचे शरीर व कार्य यांचा नीट विचार केला, तर कोणाही डॉक्टर वैद्यांनाच काय पण सामान्य माणसालासुद्धा या विकारावरचे तातडीचे उपचार लगेच सुचतील. कळते ते वळत नाही, असा थोडासा भाग या विकारात आहे. आपण हालचाल केली, शेकले, चोळले तर बरे वाटते हे रुग्णास कळत असते पण ते आमच्यासारख्यांनी कडक शब्दात सांगावयाची रुग्ण वाट पाहत असतात. या विकारात ऋतुमान, रोगाचे स्वरूप, जखडलेल्या अवयवाचे कार्य व रोग्याजवळ असू शकणारी सुविधा यांचा आढावा घ्यावा. जखडलेल्या भागाकरिता ‘दोषघ्न लेप गोळीचा’ दाट व गरम लेप; योग्य त्या अभ्यंगतेलाची निवड व तसे तेल सकाळ-सायंकाळ जिरवणे व त्यानंतर मीठ, गरम पाण्याचा शेक बहुधा रुग्णाला थोडा आराम देतो. लेपाचा प्रयोग स्वस्थपणे दुपारी करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जखडलेल्या हाताचा व्यायाम कटाक्षाने रुग्णाकडून करून घ्यावा. तो हात हट्टी आहे. अशा हट्टावर व्यायामाची सक्ती अत्यावश्यक असते.
रुग्णाला वात विकाराची नेहमीची पथ्ये कटाक्षाने पाळायला लावावी. उशी टाळावी. कठीण व उबदार अंथरुणावर काही काळ उताणे झोपावे. फ्रीजमधील पदार्थ, गार पाणी, मीठ, लोणची, पापड, आइस्क्रीम, लस्सी, बर्फ व जडान्न पूर्ण वज्र्य करावे. जखडलेल्या खांद्याला हलक्या हाताने तेल जिरवावे. त्याकरिता सुरुवातीला महानारायण तेलाबरोबर चतुर्थाश गवतीचहा अर्क मिसळावा. खूप तीव्र जखडले असेल, तर महविषगर्भ तेल वापरावे. माझ्या अनुभवात लाक्षादि, गोक्षुरादि, सिंहनाद, आभादि, त्रिफळा गुग्गुळ व वातगजांकुश प्रत्येकी तीन गोळ्या; दोन वेळा बारीक करून गरम पाण्याबरोबर घेतल्यास; सत्वर आराम मिळतो. जखडणे खूपच असल्यास वातगजांकुश सहा गोळ्या असा डोस वाढवावा. जेवणानंतर सौभाग्यसुंठ अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर द्यावी.
-वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..:हॅम्लेट, अर्जुन आणि ज्ञानेश्वर
उद्विग्नता शेवटी उद्विग्नताच असते मग ती कुठल्याही कारणे असो. अर्जुन आणि हॅम्लेटमधे साम्य आहे हे मला प्रथम लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात सांगितले. परंतु दोघांचेही काका खलनायक असले तरी अर्जुनाच्या आयुष्यात श्रीकृष्ण असतो तसा हॅम्लेटला मिळत नाही हेही खरेच. महाभारतात शेवटी वाताहतच होते, परंतु एक तत्त्वज्ञान उरते. हॅम्लेटमध्ये ते शोधावे लागते. महाभारतात मात्र ते लिहून ठेवले जाते. घाबरलेला अर्जुन काय म्हणतो ते बघा.. अंगावर भीतीचा काटा। मनामध्ये भयाचा बावटा। निसटले धनुष्यबाण। हात पडला लुळा थोटा।
याचे कारण तो देतो .. मेव्हणे मामा सासरे। बाकी भाऊ सगळे। सगळेच आम्हा प्रिय। नातू आणि मुलगे।
मग तो कुरुक्षेत्रावर काय होणार याचे वर्णन करतो.. उघडय़ावरती प्रेते। आणि भिरभिरणारी गिधाडे।
तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतो : युद्धात हा हळवेपणा। हे नातेवाईक। काय आजच। कळले तुला।
एवढेच विचारून न थांबत श्रीकृष्ण तत्त्वज्ञानही सांगतो.. हा विश्व नावाचा प्रकार। तो ज्याचा विस्तार। तिथे नाव जात आप्त। यांचे चिन्हही नसते।। आणि मग परत व्यवहार सांगतो आणि म्हणतो..  समजा कौरवांचे वाजले। किंवा तुझ्यावर काही कोसळले। किंवा विश्वच बुडाले। तरी तुझे कर्तव्य कोठे गेले।।
भावनांच्या अतिरेकाबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात.. ते पाण्यावाचून बुडवतात। आगीशिवाय जाळतात। गुपचूप प्राणाला जखडतात।। हे शस्त्राशिवाय मारतात। दोराशिवाय जेरबंद करतात। आणि ज्ञानी माणसांनाही। पैज लावून हरवतात।। चिखलाशिवाय रुतवतात। जाळ्याशिवाय गुरफटवून टाकतात। कसे आणणार आटोक्यात। फार आत असतात।।
इंग्रजीमध्येही Drown in sorrow किंवा Burn with Jealousy असे म्हणण्याचाच प्रघात आहे. सहाव्या अध्यायात ते त्यांनी सांगितलेल्या मराठी भाषेबद्दल काय म्हणतात ते बघा..  माझी साधी मराठी भाषा। परंतु पैजेने उतरवीन अमृताचा नक्षा। अशी रसाळ भाषा। वापरीन।। इतकी मऊ आणि कोवळी। की स्वरांचे तरंग भासतील भारी। आणि सुगंधाची खुमारी। ठरेल प्रभावहीन।। रसाळपणाच्या स्वादासाठी। कानाला फुटतील जिभा। हे बोल कळण्यासाठी। इंद्रिये करतील लढाया।। शब्द ऐकावे कानांनी। परंतु जिभा म्हणतील आम्हीही। आणि म्हणतील नाके। हे शब्द सुगंधी।।
अक्षरांची रेखीव महिरप। डोळे होतील तृप्त आणि स्तिमित। सौंदर्याची खाणच। जणू उघडली।।
काय बिशाद आहे कोणाची या भाषेला पार करायची.
-रविन मायदेव थत्ते 
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत:१५ फेब्रुवारी
१८७८ > ‘मराठी ग्रंथोत्तेजक सभा’ ही मराठी साहित्यसंस्था न्या. म. गो. रानडे व ‘लोकहितवादी’ गोपाळराव हरी देशमुख यांनी स्थापन केली.
१८९६ > ‘ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार’ हा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ लिहिणारे रामचंद्र नारायण वेलिंगकर यांचा जन्म.
१९४९ > कवी, कार्यकर्ते आणि लेखक नामदेव ढसाळ यांचा जन्म. ‘साहित्यात फक्त पांढऱ्या पेशी वाढणे चांगले नाही’ असा एल्गार करीत आलेल्या त्यांच्या ‘गोलपिठा’ने अधोविश्वाची दाहकता मराठी साहित्यात आणले. ‘दलित पँथर’चे संस्थापक असलेल्या ढसाळ यांनी पुढे ‘तुही यत्ता कंची’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’, ‘खेळ’, ‘गांडू बगीचा’, ‘प्रियदर्शिनी: आमच्या इतिहासातील एक पात्र’, ‘निर्वाणा अगोदरची पीडा’, ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’, ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ असे काव्यसंग्रह आणि ‘हाडकी हाडवळा’, ‘निगेटिव्ह स्पेस’ या कादंबऱ्या, ‘आंधळे शतक’ व ‘सारे काही समष्टीसाठी’ हे लेखसंग्रह अशी साहित्यनिर्मिती केली.  साहित्य अकादमीने सुवर्णमहोत्सवी वर्षांत (२००४) ढसाळ यांना ‘शतकातील साहित्यिक’ म्हणून गौरविले. त्यांच्या कविता अनेक भाषांत अनुवादित झाल्या आहेत.
-संजय वझरेकर

नैसर्गिक

First Published on February 15, 2013 12:48 pm

Web Title: how fruits can ripen artificially