डॉ. श्रुती पानसे -contact@shrutipanse.com

जेव्हा एखादी ज्ञानशाखा उदयाला येते, तेव्हा ती पूर्णत शास्त्रीय तत्त्वावर आधारित असली पाहिजे. त्या संदर्भात केली जाणारी विधानंही शास्त्रीय तत्त्वावर असली पाहिजेत. परंतु काही वेळेला त्या शास्त्रीय तत्त्वाखेरीज इतरही काही विधानं निर्माण होतात आणि ती व्यावहारिक पातळीवरही लोक वापरायला लागतात. अनेकदा वापरल्यानंतर तीच विधानं खरी वाटायला लागतात. सध्याची एक नवीन ‘न्यूरो-मिथ’ म्हणजे ‘आपण आपल्या मेंदूचा दहा टक्के वापरसुद्धा करत नाही’ (म्हणे).

व्यावहारिक पातळीवर आपण आपल्या मेंदूचाच वापर दिवसरात्र आपल्या कामांसाठी करत असतो. आपल्या मेंदूमध्ये प्रचंड क्षमता आहे. कदाचित खूप काही करण्याची क्षमता निसर्गत: असताना आपण पुरेसा न्याय देत नाही इथपर्यंत ठीक आहे. पण यापुढे जाऊन जेव्हा ‘१० टक्केच भाग वापरला जातो’ असं म्हणतो तेव्हा ते योग्य ठरत नाही.

याचं कारण मेंदूचा वापर हा आपल्याला अशा कोणत्याही टक्केवारीमध्ये मोजता येत नाही. मेंदूतले सर्व अवयव, त्यातल्या रक्तवाहिन्या, त्यात वाहणारी रसायनं या सर्व गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात आणि ते प्रत्येक क्षणी आपलं काम करत असतात. आपण किती टक्के मेंदू वापरतो याचं गणित आपल्याला मांडता येत नाही.

‘शास्त्रीय तत्त्वावर आधारित’ असं म्हटलं तरीसुद्धा ते शास्त्रीय तत्त्वावर आधारित असेलच असं नाही. याचं कारण मेंदू संशोधनाला न्यूरो इमेजिंग तंत्राचा भक्कम आधार असावा लागतो. अत्याधुनिक यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने उदाहरणार्थ ‘एफएमआरआय’ तंत्राने प्रत्यक्ष आणि जिवंत काम करणाऱ्या मेंदूच्या प्रतिमा टिपल्या जातात. त्या प्रतिमांवरून निघालेल्या निष्कर्षांचा आधार मेंदू संशोधनाला आहे. आधुनिक मेंदू संशोधन हे यावर आधारित आहे आणि अशा कुठल्याही प्रतिमांमध्ये, ‘केवळ दहा टक्केच मेंदू वापरला जातो,’ अशा प्रकारचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.

मेंदूविषयी अचाट आणि अतक्र्य विधानं आणि त्या आधारावर विविध टेस्ट्स बाजारात आलेल्या आहेत. ‘आपल्या मुलांचे मार्क वाढवण्या’चा हव्यास भारतीय जनतेत किती फोफावला आहे याचा चांगलाच अंदाज बाजाराला आहे. त्यामुळे बाजार अशी उत्पादनं आणतो. पैसे कमवून मोकळाही होतो. हजारो रुपये खर्च करून भलंमोठं बाड ग्राहकाच्या हातात सोपवलं जातं! ..इथे मात्र ‘मेंदू वापरण्या’ची खरी गरज आहे.