ग्रंथसंपदा, जागेचा वापर, फíनचर, प्रकाश व्यवस्था, उपयोगकर्त्यांचा राबता, कर्मचारीवर्गाची संख्या व कार्याची व्याप्ती, सेवांचा दर्जा अशा बहुअंगांनी ग्रंथालयाचे मोजमापन केले जाते. भारतीय मानक संस्थेनेही यांबाबत वेळोवेळी मानके प्रसिध्द केली आहेत जशी की : IS:1553–1960,IS: 672–1966, IS:1829 (Part II) – 1993  वगरे.

शैक्षणिक, सार्वजनिक आणि संशोधन किंवा विशेष ग्रंथालयांसाठी थोडीफार वेगळी प्रमाणे वापरावी लागतात. उदा. महाविद्यालयीन ग्रंथालयात प्रति वाचक किमान १.५ चौरस मीटर जागा, १ चौरस मीटर जागेत १५० पुस्तकांचा संग्रह, ग्रंथपाल/उप-ग्रंथपाल यांसाठी ३० चौरस मीटरजागा अशी प्रमाणे सुचवलेली आहेत. तसेच दर २५,००० पुस्तंकासाठी एक सहाय्यक ग्रंथपाल, दर १०,०० पुस्तंकासाठी एक ग्रंथ-देखभाल सेवक आणि अशाच निकषाप्रमाणे इतर कर्मचारीवर्गाच्या संख्येबाबत आणि त्यांच्या अपेक्षित कार्याबाबत शिफारशी आहेत. बदलत्या गरजांप्रमाणे त्यांत सुधारणा केल्या जातात.

ग्रंथालयात सामिल केलेल्या प्रत्येक पुस्तकाला एक नोंदणी क्रमांक देऊन त्यापुढे पुस्तकांची ओळख सांगणारी माहिती जशी की लेखक, शीर्षक, प्रकाशक, मूल्य इत्यादी दाखलपुस्तकांत लिहून ठेवली जाते. त्यातील अंतिम क्रमांकावरून ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाची संख्या सहज मिळते. मात्र ती संख्या शीर्षकाप्रमाणे बघितल्यास कमी असू शकते, कारण काही शीर्षकांच्या अनेक प्रती ग्रंथालयात असू शकतात. दरवर्षी ग्रंथसंग्रह तपासणी करुन ताळेबंद करणे सामान्यपणे अपेक्षित असते.

काही मोजमापन दर दिवशी केले जाते,  जसे की किती वाचक ग्रंथालयात आले, किती पुस्तकांची देवघेव झाली, मुदतीनंतर पुस्तक परत केल्यामुळे आकारलेल्या दंडाची प्राप्त रक्कम वगरे. त्याचप्रमाणे दररोज झालेल्या पुस्तकांच्या एकूण दाखलनोंदी, त्यांचे विषयवार वर्गीकरण व तालिकीकरण, नियतकालिकांच्या नोंदी, संदर्भसाह्य देणे अशा अनेक ग्रंथालयीन तांत्रिक बाबींची आकडेवारी ठेवली जाते. तिची तुलना प्रमाणित मानकांशी किंवा मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे करुन ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीत आवश्यक फेरफार केले जातात.

अंकीय स्वरुपात माहिती कुठूनही मिळवण्याची सोय वाढू लागल्याने परंपरागत ग्रंथालयें त्यांच्या संग्रहाची निवड आणि सेवांत बदल करित आहेत. त्यामुळे केवळ अंकीय तसेच मिश्रित ग्रंथालयाचे मोजमापन वेगळ्याप्रकारे करणे ही गरज आहे.

ग्रंथालय ही माहिती-सेवा पुरवणारी संस्था असल्यामुळे निव्वळ वित्तीय रुपात तिच्या कामाचे मूल्यमापन करणे योग्य नसते. तरी ग्रंथालयातील साहित्याची विविधता, ते मिळण्याची सुलभता, ग्रंथालयातील वातावरण आणि सेवांची व्याप्ती व दर्जा यांचे मोजमापन करण्यासाठी काही पध्दती वापरल्या जातात जशा की  LibQUAL+, Insync, आणि बॅलेन्स्ड स्कोअर कार्ड. त्यासाठी ग्रंथालय वापरकर्त्यांचे सर्वेक्षण करुन माहिती गोळा केली जाते.

-डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कर्नाडांचे ‘तुघलक’

‘ययाति’ प्रकाशित झाले आणि पुढचे नाटक कोणत्या विषयावर लिहायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. ऑक्स्फर्डच्या वास्तव्यात त्यांनी भारतातून आणलेली पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि त्यांना जाणवले की, ऐतिहासिक विषय घेऊन त्यांच्या संदर्भात सत्याचे नवे पदर शोधून काढण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही.  मग भारताच्या इतिहासाचे एक पुस्तक आणले. मोहंजोदारोपासून वाचायला सुरुवात केली.  ते १४ व्या शतकातील महंमद तुघलकच्या कारकीर्दीपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांच्यापुढे आला ‘महम्मद तुघलकचा वेडा कारभार!’ एकाएकी त्याच्या जीवनातील दोन घटनांनी त्यांना आकर्षित करून घेतले. एक म्हणजे दिल्लीवर राज्य करणाऱ्या सगळ्या सुलतानांमध्ये तुघलक अत्यंत प्रतिभावान असला तरी भविष्याच्या दृष्टीने विचार करता, ‘वेडा’च मानला गेला. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने आपल्या राज्यकारभाराच्या काळात सुमारे पाच वर्षे सार्वजनिक प्रार्थना थांबवली होती. हे वाचून तर कर्नाड थक्क झाले. वाचन केल्यावर त्यांना जाणवले की, तुलघकच्या मनातल्या धर्मविषयक घुसळणीतून ही घटना घडली असेल.

१९६४ मध्ये ‘तुघलक’ नाटक प्रकाशित झाले. लोकप्रियता मिळाली. ‘तुघलक’ नाटकातील नायक इतिहासातील राजा तुघलक असला तरी या नाटकाचा उद्देश ऐतिहासिक नाही. माणूस राक्षस असला तरी तो देव बनण्याची स्वप्न पाहतो. ही या नाटकातील मुख्य समस्या आहे.

या समस्येतून उद्भवणाऱ्या अनेक समस्यांचा महंमद हा केंद्रबिंदू आहे. या नाटकातील जग गुंतागुंतीचे आहे. यातील नाटय़ व दृक् -श्राव्य माध्यमाची शक्ती याने हे नाटक लक्षात राहते.  खरे म्हणजे या नाटकाचा कॅनव्हास खूप भव्य आहे.  तुघलकच्या व्यक्तिगत स्वप्नद्रष्टा आणि शासक यांच्या रूपात दोन गोष्टी आढळतात. आपल्या आदर्शासाठीचा त्याचा अतिरेकी आग्रह एका हुकूमशाहाला जन्म देतो आणि यामुळे एका सामान्य माणसालाच सर्वाधिक सहन करावे लागते. हे सांगताना कर्नाडांनी घटनेतील ऐतिहासिक वास्तव तसेच ठेवले पण ‘तुघलक’ला आधुनिक काळातील रूपकाच्या स्वरूपात प्रस्तुत करण्यात ते यशस्वी झाले आहेत. अशा प्रकारे कर्नाड यांनी आपल्या नाटकांतून भूतकाळाच्या झरोख्यातून वर्तमानाला प्रतिबिंबित केले आणि हेच त्यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com