रेशीम अळ्यांची पाचवी अवस्था साधारणपणे पाच ते सात दिवसांची असते. या अवस्थेतील अळ्या प्रचंड प्रमाणात तुती भक्षण करतात. बोटभर लांब आणि जाड अशा पांढऱ्या-हिरवट अळ्या सहाव्या दिवशी पक्व होण्यास म्हणजेच कोषावर येण्यास सुरुवात होते.
संपूर्णा, चेतना या संप्रेरकांचा वापर केल्यास सर्व रेशीम अळ्या एकाच वेळी कोषावर येतात. तसेच कोषांची प्रत सुधारते. रेशीम अळ्या पक्व होऊ लागल्या की त्यांचे खाणे मंदावते. त्या आखूड आणि पिवळट होऊ लागतात. तसेच डोके वर करून कोष बांधणीसाठी जागा शोधू लागतात. बरोबर त्याच वेळेस बेडमध्ये चंद्रिका ठेवतात. चंद्रिका म्हणजे प्लॅस्टिकच्या घडय़ा घडय़ा असलेल्या जाळ्या. या जाळ्यांवरती पक्व अळ्या चढतात आणि त्यांच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या धाग्यांचे चंद्रिकेवर कोष तयार करतात. तीन ते चार दिवसांत कोष घट्ट होतात. नंतर ते चंद्रिकेवरून सुटे केले जातात. त्यांच्यात अडकलेला कचरा साफ केला जातो. डागाळलेले कोष आणि स्वच्छ कोष वेगवेगळे केले जातात आणि पातळ सच्छिद्र गोणीतून विक्रीसाठी नेले जातात.
महाराष्ट्र राज्यात ग्रेडनुसार (गुणवत्तेनुसार) रेशीम कोषांचे दर ठरलेले असून त्या दराने शासनच कोष खरेदी करते. कोषांना किलोग्रॅममागे रु. १०० ते रु. १८० पर्यंत दर मिळतो. तसेच किलोग्रॅममागे रु. १० भत्ता मिळतो. कर्नाटक राज्यात मुधोळ, बंगळुरू, रामनगर अशा ठिकाणी रेशीम कोषांची विक्री होते. कोलार गोल्ड, हायब्रिड, प्युअर अशा जातींप्रमाणे कोषांना वेगवेगळे दर मिळतात. सरासरी दर किलोग्रॅममागे १०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे.
 रेशीम कोषापासून रेशीम धागा मिळवणे हा रेशीम उद्योगातील पुढचा टप्पा आहे. यात रेशीम कोषांपासून रेशीम सूत काढतात. यालाच ‘रीलिंग’ म्हणतात. या प्रक्रियेत कोषातील गुंतागुंतीचे धागे सोडवून त्यापासून एक सरळ धागा तयार केला जातो. रीलिंग करण्यासाठी चरका, कॉटेज बेसीन आणि मल्टी एन्डेड बेसीन अशी उपकरणे आहेत. रीलिंग करून जो एकसंध धागा मिळतो, त्याला ‘रॉ सिल्क’ म्हणतात. रिलर हे रॉ सिल्क रेशीम विणकरांना विकतात.
 यापुढील पायऱ्या म्हणजे रेशीम विणणे (विव्हींग), फिनििशग, डाइंग इत्यादी.

जे देखे रवी.. : लढा : अंक दुसरा- भाग २(शरद काळे)
शरद काळे या आयुक्तांच्या पुढय़ात बसल्यावर दोन तीन गोष्टी चटकन ध्यानात आल्या (१९९१-९२ साल असेल). हा माणूस आपल्याच वयाचा आहे. हसतमुख असले तरी हे गृहस्थ माझ्यापेक्षा गंभीर आणि खोल आहेत. त्याच काळात दर दोन तीन वर्षांनी होतो तसा ,निवासी डॉक्टरांचा संप झाला होता. तेव्हा एका प्रश्नाला  उत्तर देताना या प्रकरणाचा मला अभ्यास करावा लागेल असे प्रशासकीय विधान त्यांनी केले होते. संप म्हटला की मी पाहिजेच या न्यायाने निवासी डॉक्टरांच्या त्या वेळच्या सभेत हे ‘आयुक्त मोठे अभ्यासू दिसतात, पण इथे अभ्यास नव्हे तर कृती हवी आहे’ असे विधान करून मी टाळ्या मिळवल्या होत्या. त्या आठवणींची घंटा वाजत असताना आमचे संभाषण सुरू झाले. मी त्या भूखंडाबद्दल सांगू लागल्याबरोबर मला म्हणले ‘तो  भूखंड मला माहीत आहे. पुढे बोला.’ मी मनात म्हटले एवढय़ा अक्राळविक्राळ शहरात या माणसाला  नवीनच आयुक्त असूनही हा भूखंड कसा माहीत होता? त्या विधानाचे रहस्य हा लेख लिहिण्याआधी त्यांनाच विचारून मी उलगडले. यांच्या मुलीचे होणारे सासर या भूखंडाच्या अगदी समोर होते. आणि ती सासरची मंडळी माझ्या चांगली ओळखीची होती. माझ्या लढय़ाची समर्थक होती. तेव्हा माझ्या कारनाम्याची चर्चा झाली असणार. मग मी रामायण सुरू केल्यावर यांनी मला परत अडवले आणि म्हणाले ‘या भूखंडाचा विकास कोणी करावा हे तुम्ही कोण ठरवणार?’ मी अवाक्च झालो. मी म्हटले ‘मी केवढय़ा तरी अपेक्षेने आलो होतो.’ तेव्हा म्हणाले ‘प्रत्येकाच्या अपेक्षांची पूर्तता करू लागलो तर इथे काम करणे कठीण होईल. तरी सुद्धा तुमचे थोडे ऐकतो.’ मी मग लोकांच्या अनेक वर्षांच्या लढय़ाचा संक्षिप्त इतिहास सांगितल्यावर हे थोडे गंभीर झाले. तेव्हा मी माझ्या गोफणीतला शेवटचा खडा भिरकावला. मी म्हणालो ‘मीही पुण्याच्याच मॉडर्न स्कूलचा. तुम्ही  नूमविचे. मॉडर्नने म्हणजे मी माझे काम केले. आता नूमवि काय करते ते बघायचे’ तेव्हा ते मोठे दिलखुलास हसले आणि म्हणाले तुम्ही आता चला.
 मी महानगरपालिकेच्या टिळक रुग्णालयातच काम करीत होतो. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मुख्य कार्यालयात  बदल्या होत असल्यामुळे माझे गुप्तहेर सर्वत्र पसरले होते. तेव्हा या प्रकरणाचे कागद कसे हलतात हे मला लगेच कळत असे. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

वॉर अँड पीस : हृद्रोग : भाग ५
अर्जुनाची साल ही हृद्रोगाकरिता प्रशस्त आहे, त्यामुळे वाढता रक्तदाब कमी होतो, हार्ट सुरक्षित राहते अशा काहीशा गोड समजुती अनेकांच्या आहेत. अर्जुनसालीत मोठय़ा प्रमाणावर क्षार, राख, तुरट द्रव्य असते. त्याच्या शीत, स्तंभक गुणांमुळे लहान रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्ताभिसरण करणाऱ्या मोठय़ा रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. त्यानंतर हृदयाचे कार्य सुधारते. अर्जुनसालीच्या वापराने रक्तवाहिन्या संकुचित राहून रक्तदाबक्षय विकारात उपयोग होतो. अतिरक्तदाब विकारात किंवा निरोगी माणसाने केवळ अर्जुनसालीचाच वापर करू नये.
अर्जुनसालीचा यशस्वी उपयोग करण्याकरिता मी एक विलक्षण अनुभव १९८० साली घेतला. बिरवाडी महाड येथील एका वृद्ध वैद्यवरांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्या मुलाला बँकेत कॅशियर म्हणून बढती मिळाली. ज्याने आयुष्यात दहा-पाच हजार नोटा एकत्र कधी पाहिल्या नव्हत्या; अशा तरुणाला लाखो रुपये हाताळावे लागत होते. त्यामुळे त्याच्यात घबराट सुरू झाली. ‘रोज सायंकाळी हिशोब ठीक लागले पाहिजेत. १० रुपयेसुद्धा कमी-अधिक होऊन चालणार नाही;’ अशा मॅनेजरच्या दमबाजीमुळे ‘नवीन’ कॅशियर घाबरले. ते माझ्याकडे आले. माझा विश्वास अर्जुन म्हणजे हिम्मत-हृदयाच्या स्नायूंना जोम आणणारी, हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण सुधारणारी अशी ठाम समजूत होती व आजही आहे. अर्जुनाभ्र नावाचा एक पाठ रसयोगसागर ग्रंथातला निवडला; त्यात थोडी दुरुस्ती करून सुवर्णमाक्षिक, शंृग, अभ्रकभस्म, अस्सलवंशलोचन, शुद्धशिलाजीत व या मिश्रणाला अर्जुनसालीच्या काढय़ाच्या भावना; असा वृद्धवैद्यपाठ तयार करून गोळ्या बनवल्या. महद्आश्चर्य हे की या हादरलेल्या, प्रमोशन नाकारण्याच्या मन:स्थितीत असलेल्या रुग्णाला महिनाभरात आत्मविश्वास आला. त्यानंतर बँकेत वेगवेगळ्या बढत्या मिळत, खूप मोठय़ा पदावरून निवृत्ती मिळाली. ३३ वर्षांनंतर आजही ते उत्तम आरोग्यदायी जीवन जगत आहेत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १२ जुलै
१८६४ > ख्यातनाम इतिहास संशोधक, भाषाशास्त्राभ्यासक, प्रतिभासंपन्न लेखक विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती यांच्या संवर्धनासाठी ‘भाषांतर’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे मराठय़ांच्या इतिहासाच्या साधनांचे २२ खंड त्यांनी प्रसिद्ध केले, तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते एक संस्थापक. या ऐतिहासिक कामगिरीमुळेच ‘इतिहासाचार्य’ या बिरुदावलीने ते सन्मानित झाले. भाषाशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राजवाडय़ांनी महानुभावांची सांकेतिक लिपी उलगडली. १९१० >  कथाकार, लघुनिबंधकार गोविंद रामचंद्र दोडके यांचा जन्म. ललित लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या दोडक्यांनी कथालेखनही केले. ‘जन्म’, ‘पूर्वस्मृती’ हे त्यांचे कथासंग्रह. ‘माहेरवाशीण’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह.
१९२९> प्राचीन मराठी कवितेचे संग्राहक, संपादक, कवी  अच्युत सीताराम साठे यांचे निधन. ‘पद्यपद्याकर’ हा त्यांचा स्फुट कवितांचा संग्रह.  वैदर्भीय संतकवी दयाळनाथ व देवनाथ यांच्या रसाळ कवितेचे त्यांनी ‘श्रीदयाळनाथांची कविता आणि श्री देवनाथ महाराजांची कविता’ या संग्रहरूपाने संपादन केले.
– संजय वझरेकर