डॉ. श्रुती पानसे

मेंदूचं काम कसं चालतं, तो काय काय करतो, कसा ‘वागतो’? मेंदूविषयीच्या ताज्या संशोधनांचा आपल्या जगण्याशी कसा काय संबंध आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं वाचकांना मिळवून देणारं हे नवं सदर!

भाषा शिकण्यासाठी मेंदूतले ब्रोका आणि वर्निक ही दोन क्षेत्रं महत्त्वाची आहेत. मूल जन्माला येतं तेव्हापासून मेंदूतलं वर्निक हे क्षेत्र काम करत असतं. वर्निक हे भाषा आकलनाचं क्षेत्र आहे. ब्रोका हे भाषानिर्मितीचं क्षेत्र आहे. आसपासची माणसं ज्या भाषेत बोलतात, त्यातले शब्द वर्निक या क्षेत्रात साठवले जातात. वयाच्या साधारणत: वर्ष-दीड वर्षांपर्यंत ब्रोका हे क्षेत्र विकसित होतं. जेव्हा ब्रोका विकसित होतं, तेव्हापासून मुलं बोलायला लागतात. जी भाषा, जे शब्द आतापर्यंत वर्निकमध्ये साठवले गेले आहेत, तेच शब्द आणि तीच भाषा मूल बोलतं. ऐकलेल्या भाषेशिवाय दुसरं काहीही मूल बोलत नाही. प्रत्येक मुलाचा ब्रोका विकसित होण्याचा काळ वेगवेगळा असतो. मुलांच्या आसपास चांगल्या गोष्टी, वेगवेगळे शब्द बोलले गेले तर मुलांची भाषा पहिल्या दोन-अडीच वर्षांत चांगली विकसित होते. याउलट ज्या मुलांच्या कानावर भाषा फारशी पडत नाही त्यांचा भाषेचा विकास सीमित होतो.

contact@shrutipanse.com