जीवशास्त्राच्या अभ्यासात आणि प्रयोगशाळेत रोगनिदान करण्यासाठी पेशींच्या संख्येचं मापन करणं आवश्यक आणि काही वेळा अनिवार्य ठरतं. हे पेशींचं मापन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. मग त्यात एकतर पेशींची संख्या प्रत्यक्षात मोजली जाते किंवा एखाद्या नमुन्यात असलेलं पेशींचं तुलनात्मक प्रमाण शोधून काढलं जातं. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पेशी मोजण्याच्या नव्या पद्धती विकसित झाल्या आहेत. एखाद्या द्रवात असणाऱ्या पेशींचं कुल्टर काउंटर या यंत्राच्या सहाय्याने केलं जाणारं मापन ही या सगळ्या पद्धतींमध्ये तुलनेनं सर्वात सोपी आणि स्वस्त असलेली पद्धत आहे. विशेष म्हणजे कुल्टर काउंटरने केवळ पेशींची संख्याच नाही तर त्यांचं आकारमानसुद्धा मोजता येतं.

पेशींचा विद्युतरोध अधिक असतो. त्यामुळे अर्थातच त्यांच्यातून विद्युत प्रवाह जाऊ शकत नाही. पेशींच्या या गुणधर्माचाच या यंत्रामध्ये वापर करून घेण्यात आलेला आहे. ज्या द्रवातल्या पेशींची संख्या मोजायची आहे, तो द्रव या उपकरणात भरला जातो. आणि त्या द्रवातून विद्युतधारा प्रवाहित केलेली असते. या उपकरणात विशिष्ट ठिकाणी एक सूक्ष्म फट असते. या सूक्ष्म फटीजवळ दोन इलेक्ट्रोड असतात. या इलेक्ट्रोडच्या मदतीने विद्युत विभवांतर प्रयुक्त केलं जातं. उपकरणात भरल्या जाणाऱ्या द्रवात तरंगत असणाऱ्या पेशी एकेक करून या सूक्ष्म फटीत शोषल्या जातात. जेव्हा उपकरणातल्या सूक्ष्म फटीत एकही पेशी नसते, तेव्हा अर्थातच कोणत्याही अडथळ्याशिवाय द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित होते. पण जेव्हा या फटीत एखादी पेशी असते तेव्हा तिथला विद्युतरोध बदलतो. विद्युतरोध किती वेळा बदलला याच्या नोंदीवरून द्रावणातल्या पेशींची एकूण संख्या समजते.

या उपकरणाद्वारे कमी वेळात खूप मोठय़ा संख्येनं पेशी मोजता येतात. सेकंदाला काही हजार इतका पेशी मोजण्याचा दर असतो. त्यामुळे कमी वेळात अचूक मापन मिळणं शक्य होतं.

इलेक्ट्रोडमधल्या फटीतून पेशी जात असताना त्या जागेतील पेशीच्या आकारमानाइतका द्रव बाजूला सारला जातो आणि तिथल्या विद्युतरोधात बदल होतो. विद्युतरोधामध्ये होणारा हा बदल किती द्रव बाजूला सारला जातो यावर अवलंबून असल्याने विद्युतरोधात होणाऱ्या बदलावरून पेशीचं आकारमान समजतं.

– प्रिया लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

‘इंग्रजीच्या वर्चस्वाविरुद्ध विद्रोह करणं गरजेचं’

ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात केळेकरांनी मातृभाषेविषयी काही तौलनिक विचार मांडले आहेत. ते म्हणाले, ‘‘मला आज खूप आनंद वाटत आहे की कोंकणी भाषेला भारतातील सर्वोच्च साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार मिळत आहे आणि तोही तिच्या मातेच्या संस्कृत भाषेसह मिळत आहे. या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की काल-परवापर्यंत ज्या भाषेला मोठमोठे लोक भाषाही मानायला तयार नव्हते कारण तिला लिपी नाही, व्याकरण नाही. या भाषेत साहित्य नाही असे म्हणून ही भाषा बोलणारेसुद्धा हिणवत होते. हीच भाषा आज  ज्ञानपीठसारखा पुरस्कार सन्मान मिळवू शकते. याचं सारं श्रेय त्याच लोकांना जातं की जे गेल्या ५०-६० वर्षांपासून या कोंकणी भाषेला भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी तीव्र संघर्ष करीत आले आहेत.

कोंकणी तशी छोटय़ा भागाची भाषा आहे. तसं तर मला या देशातील सर्व देशी भाषांच्या माथ्यावर एक काळा ढग फिरताना दिसतो आहे, भारतासारख्या सार्वभौम प्रजासत्ताक देशावर इंग्रजीच्या वर्चस्वाचा. या स्वतंत्र देशाचा कारभार इंग्रजीत चालतो. इथले कायदे इंग्रजीत आहेत. न्यायदान इंग्रजीत चालते. अशा परिस्थितीत आपण मातृभाषेचे कितीही गौरवस्तोत्र गायलं तरी कुणावर कसलाही परिणाम होणार नाही. दिवसेंदिवस लोक इंग्रजीमय होत चालले आहेत. अशा परिस्थितीत देशी भाषांतील साहित्य कोण वाचणार? कोणीही शिक्षित व्यक्ती आमची पुस्तकं वाचणार नाही. ते इंग्रजी पुस्तकंच वाचत राहतील.

मुळं छाटून मोठमोठय़ा वृक्षांचे बोन्साय बनविण्याची कला जपानने विकसित केली आहे. उंच नारळाच्या झाडाला फक्त पाच फूट उंचीचे करून त्यांनी त्याला सौंदर्य प्राप्त करून दिलं. पण त्याला नारळ लागत नाहीत. अशाच प्रकारे इंग्रजी भाषेने आपल्या देशात किती तरी बोन्साय विद्वान, बुद्धिजीवी, लेखक आणि शिक्षक निर्माण केले आहेत. ही मंडळी परिसंवादाची शोभा वाढवतात. पण ठोस काहीही देऊ शकत नाहीत. मग आम्हाला अशा बोन्साय लोकांचा देश बनवायचा आहे का? नाही ना! मग देशातील इंग्रजीच्या वर्चस्वाविरुद्ध विद्रोह करणं अत्यंत गरजेचं आहे. एक काळ होता डॉ. लोहियांनी विद्रोह सुरू केला होता पण आता देशी साहित्यकारांनी याकडे लक्ष घालायला हवे. मुळापासूनच ही परिस्थिती बदलायला हवी..’’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com