मानवाच्या मेंदूने तयार केलेली एक खास गोष्ट म्हणजे जीवनमूल्यं. प्राण्यांच्या मेंदूमध्ये शरीरशास्त्रीय यंत्रणा काम करतात. त्यांच्या कृती या यंत्रणांवर चालतात. माणसाने मात्र ‘कसं वागावं, कसं वागू नये’  याचे नियम बनवले आहेत. ते बहुसंख्य मानवांना माहीतही असतात. पण दरवेळी मानवप्राणी त्या मूल्यांना धरून वागेलच असं नाही. मेंदूचीसुद्धा अनेकदा फसगत होते.

माणसाने श्रीमंत किंवा गरीब न पाहता दुसऱ्यांशी वागावं असं एक पुरातन मूल्य. पण ते पाळलं जात नाही. या प्रयोगातून मानवी मेंदूच्या विचारप्रक्रियेचं अक्षरश: स्कॅनिंग झालं आहे. या प्रयोगाची पालकांना पूर्ण कल्पना देऊन एका सहा वर्षीय बालकलाकार मुलीला बोलावलं गेलं. (असे प्रयोग लहान मुलांकडून करून घ्यावेत की नाही हा वेगळा विषय आहे.)

ही छोटी मुलगी चांगला पेहराव घालून फुटपाथवर उभी राहिली. त्या वेळेला ‘ती एकटी आहे का, चुकली आहे का, मदतीची गरज आहे का,’ असं तिला अनेकांनी विचारलं. यानंतर मळके कपडे, मळलेला चेहरा असा मेकअप करून तिला त्याच ठिकाणी उभं राहायला सांगितलं. त्या वेळी तिच्याकडे कोणीही पाहिलं नाही.

यानंतर चांगले कपडे घालून एका हॉटेलमध्ये पाठवलं. त्या वेळी लोकांनी तिला चांगली वागणूक दिली. जवळपासच्या टेबलवर तिचं कुटुंब असावं अशा पद्धतीने लोक तिच्याशी गोडीने वागत होते. यानंतर मळक्या कपडय़ात तिला हॉटेलमध्ये पाठवलं. त्या वेळी लोकांना ती तिथे मुळीच नको होती. काही जणांनी ‘तू इथून निघून जा’ असं सांगितलं. लोक तिच्याकडे अत्यंत घृणास्पद नजरेने पाहत होते. ती रडतच तिथून बाहेर पडली.

सर्वाना समान वागणूक द्यावी, एखाद्याकडे जर काही कमी असेल तर त्याला मदतीचा हात द्यावा अशा प्रकारच्या प्रार्थना, धर्म -मूल्य- संदेश लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षात तशी परिस्थिती उभी राहते त्या वेळेला माणसांच्या प्रतिक्रिया या पूर्णत: मूल्यविरोधी असू शकतात.

युनिसेफच्या या व्हिडीओमध्ये असं सांगितलं गेलं आहे की आजही कितीतरी खरीखुरी मुलं मोठय़ांच्या अशा नजरांचे अपमान झेलत असतात. सातत्याने अशाच प्रकारच्या अनुभवांची जोडणी मेंदूत झाल्यावर लोकांबद्दल- समाजाबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण होईल की चीड?

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com