माणसं कधी कोणाशी मत्री करतील, कधी ती मत्री तोडतील, कधी आयुष्यभर दुरावा जपून ठेवतील आणि कधी अजिबात न राहवून मत्रीचा हात पुढे करतील हे काही सांगता येत नाही. कोणत्या माणसांशी मत्री असावी आणि कोणाशी शत्रुत्व, हे येणाऱ्या अनुभवांवरून ठरतं.

याच विषयावर १९५० मध्ये मुझफ्फर शेरीफ या मानसशास्त्रज्ञाने रोबर्स केव्ह स्टेट पार्क, ओक्लाहामा इथे केलेला हा प्रयोग. हा प्रयोग सामाजिक मानसशास्त्र या विषयात महत्त्वाचा मानला जातो. या प्रयोगांमध्ये प्रयोगकर्त्यांने अकरा मुलांचे दोन गट केले आणि त्या दोन्ही गटांना उन्हाळी शिबिरासाठी बोलावलं. आठ दिवस या मुलांनी उन्हाळी शिबिरात छान मजा केली. त्यानंतर दोन्ही गटांना प्रयोगकर्त्यांने एकमेकांसमोर आणलं. एकमेकांची ओळख करून दिली; परंतु हे दोन्ही गट एकमेकांमध्ये मिसळायला फारसे तयार झाले नाहीत. एकमेकांशी जवळीक वाढावी म्हणून काही खेळ घेतले; परंतु त्या खेळांचा परिणाम असा झाला की, त्यांच्यातला दुरावा काही प्रमाणात वाढला.

आता दुसऱ्या टप्प्यात दोन्ही गटांना अगदी भरपूर रिकामा वेळ वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज करण्यासाठी दिला; परंतु या तंत्रामुळेसुद्धा फारसा फरक झाला नाही. शेवटी या दोन्ही गटांना मिळून एक समस्या सोडवायला दिली. ही समस्या सोडवताना मात्र सर्व जण एकत्र आले. एकमेकांचा विचार करायला लागले.

हा प्रयोग वाचल्यानंतर आठवण येते ते वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आपत्तींची. ज्या वेळेला एखादी आपत्ती येऊन कोसळते, त्या वेळेला सर्व माणसं एकदिलाने काम करतात. त्या वेळेला आपला – परका असा भेद पूर्णपणे संपून जातो.

अशा कोणत्याही घटनांमध्ये दुरावा किंवा आपत्ती यामुळे ताणकारक कॉर्टसिॉलची निर्मिती होते. मात्र  समस्या सोडवणं, विशिष्ट निर्णय घेणं यासाठी फ्रंटल लोब जबाबदारी घेतो. जबाबदारी घेणं म्हणजे विविध पद्धतीने विचार करणं. यासाठी कित्येक रसायनं कामाला लागतात. एकदिलाने काम करण्यातून आनंदी रसायनं निर्माण होतात. एकत्र काम केलं तर फायदा होतो हे लक्षात येऊन समस्येतून सुटकाही होते आणि मत्रीही वाढते.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com