कोणतंही काम चांगलं होण्यासाठी त्या कामाकडे लक्ष एकाग्र होणं ही पहिली पायरी असते; पण मोबाइल फोनवरच्या विविध अ‍ॅप्सवर वेळ घालवण्यामुळे ही पहिली पायरीच धोक्यात आल्याचं जाणवतं आहे. हे केवळ लहान मुलांच्या बाबतीत नाही, तर मोठय़ांच्याही बाबतीत घडतं आहे.

मोबाइलवर खेळणं किंवा फोटो/व्हिडीओ बघणं ही कामं खूप वेगात चालू असतात. एका वेळी मेंदू अनेक कामं करू शकतो; पण चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल आणि काम महत्त्वाचं असेल, तर एका वेळी एकच काम केलेलं चांगलं; पण त्याला जर सतत असं ‘मल्टिटास्किग’चं काम दिलं, तर डोळ्यांना विलक्षण थकवा येतो, चिडचिड वाढते. जास्त काळ मोबाइल फोनवर काढला तर मेंदूतले पॅटर्न्‍स बदलू शकतात. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं तर जडणघडणीच्या काळातच हे घडल्यामुळे पॅटर्न त्याच पद्धतीने घडणं आणि तेच पॅटर्न दीर्घकाळ टिकणं या दोन्ही गोष्टी घडणार. यावर संशोधकांचं काम चालू आहे. कारण हा प्रकार, हे बदल याच पिढीत नव्याने घडत आहेत.

आपल्या मेंदूमध्ये सदासर्वकाळ विद्युतरासायनिक लहरी निर्माण होत असतात. हे मेंदूसाठी आवश्यक असतं. यालाच ‘ब्रेन वेव्ह्य़ज’ असं म्हणतात. ज्या वेळी मुलं किंवा मोठी माणसं गॅजेट्स हाताळत असतात त्या वेळी एरवी निर्माण होणाऱ्या मेंदूच्या लहरींपेक्षा या लहरींचा पॅटर्न वेगळा असतो. मेंदूशास्त्रज्ञांना आढळलं आहे की, जी मुलं मोबाइलवर खूप जास्त वेळ गेम खेळत असतात, त्यांच्यामध्ये एडीएचडी (अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर) हा एक प्रकारचा आजार निर्माण होऊ शकतो. एकाग्रतेची समस्या वाढू शकते.

घरात माणसं नसणं, त्यामुळे आलेला एकटेपणा, टीव्ही बघू देत नाहीत, आळस, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये धावणं,  अभ्यास – गृहपाठ यात खूपच व्यग्र दिनक्रम असणं, असा अतिशय व्यग्रतेचा बराच काळ गेला असेल आणि थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तर मुलं लगेच मोबाइलकडे वळतात. हेच काय ते एकमेव मनोरंजन, असं त्यांना वाटू लागतं. थोडक्यात काय, तर कोणत्याही उपलब्ध गोष्टींमधून विशेष उद्दीपन मिळालं नाही की या स्वस्त आणि मजेदार उद्दीपनाकडे मुलं वळतात.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com