एखाद्या वेळेला आपण समाज माध्यमावर गेलो तर त्यात आपला किती वेळ जातो हे आपल्यालाही समजत नाही. किमान एक तास गेल्यानंतर कुठेतरी आपण बराच वेळ घालवत आहोत अशी मेंदूला सूचना मिळते. जर मोठय़ांच्या बाबतीत हे होत असेल तर लहान मुलांच्या बाबतीत काय करावं? मोबाइलची सवय लागण्याचं मूळ जर डोपामाइन या आनंदी संवेदना निर्माण करणाऱ्या रसायनात असेल तर याची दखल घेऊनच सवय मोडावी लागेल. आपल्या हातात मोबाइल किंवा लॅपटॉप असतो. यावर आपण काय करत असतो, याचं एकदा विश्लेषण करूया.

गेम्स, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, गुगल सर्च, सेल्फी काढून पाठवणे, व्हिडीओ बघणे, सिनेमे बघणे / गाणी बघणे, ऑनलाइन शॉपिंग ही झाली आपली यादी. यापेक्षा अजून काही जास्त चालू असेल तर स्वत:ला यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आठवडय़ातला एक दिवस ‘नो-टाइम फॉर स्क्रीन’ हे तत्त्व पाळायला हवं. मोबाइल आणि इतर सर्व स्क्रीनपासून लांब राहायचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? एक दिवस तर शक्य नाहीच; एक तासही शक्य नाही. असं ज्यांना वाटतं आहे, त्यांनी अध्र्या तासापासून सुरू करावं. जागेपणीचे आपल्याला वाटतील तेवढे तास एक – दोन तासांपासून ते २४ तास – पूर्ण लांब राहायचं आणि बघायचं. असं ठरवायला हवं. बघूया जगता येतंय का?

इंटरनेट व्यसनाचं गांभीर्य लक्षात घेता काही ठिकाणी नो स्क्रीन झोन करायला हवा. मुलं माणसं एकत्र येतील, समोरासमोर बसून बोलतील, अशा संधी शोधून काढाव्या लागतील. मेंदूला चालना देणारे उपक्रम सुरू करावे लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मेंदूत आनंदी संवेदना निर्माण करणारं डोपामाइन इतर कोणकोणत्या कृतीतून मिळेल याची योजना मुलांसाठी आणि मोठय़ांसाठी आखावी लागेल.

काही मोठी माणसं या वस्तूला चिकटलेली तर काही माणसं कटाक्षाने फारच लांब राहतात. वास्तविक योग्य असा सुवर्णमध्य काढायला हवा. ज्याला हे जमलं, तो या आठ पायांच्या ऑक्टोपसपासून दूर राहू शकतो, असं समजायचं.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com