वय वर्ष चार हे बालवाडीत जाण्याचं योग्य वय आहे. सभोवतालच्या जगाकडे आनंदी दृष्टीने आणि अतिशय चौकस बुद्धीने पाहणारं, त्यातून स्वत:च्या जाणिवा विकसित करणारं मूल शाळेच्या उंबरठय़ाच्या आत पाऊल टाकतं. बालवाडीचे शिक्षण म्हणजे अशा उत्साहाने रसरसलेल्या मुलांना विविध प्रकारचे सर्जनशील उपक्रम देणं.

या वयात शिकण्याचा – मेंदूमधल्या न्यूरॉन्सच्या जुळणीचा वेग पहिल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा कमी झालेला असतो. मात्र तरीही तो प्रचंडच असतो. मेंदूत दर क्षणी नवी उलथापालथ होण्याचा हा काळ आहे.

आपल्या आसपासचं जग समजून घेताना मुलांना अनेक प्रश्न पडतात. मुलं अगदी सहजपणाने हे प्रश्न विचारत असतात. प्रत्येक मुलाच्या मनात कुतूहल असतंच, प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी मुलांना द्यायला हवीत. ‘हे काय आहे?’ हा प्रश्न असतोच. त्याबरोबरच ‘हे असं का आहे?’ हा प्रश्न पडतो. ‘काय’वरून ‘का’कडे जाणारा हा प्रगत बुद्धीचा प्रवास असतो.

मुला-मुलींना प्रश्न पडत असतात; पण ते विचारायला जवळ कोणी नसेल किंवा उत्तरं मिळाली नाहीत की, मग ही कुतूहलाची भावना विरून जाते. प्रश्न पडायचेही बंद होतात. ‘पानं हिरवी का असतात?’, ‘फूल लाल का आहे?’ यातलं ‘असं का आहे?’ हा प्रश्न एकूण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा प्रश्न वारंवार पडला पाहिजे. शिक्षकांना सर्व मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य नसेल तर पालकांनी प्रयत्न करायला हवा.

मुलांना योग्य ते प्रश्न पडायला हवेत, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी. नव्या, वेगळ्या गोष्टी सांगणे, दाखवणे, निसर्ग उलगडून दाखवणे यातून त्यांना प्रश्न पडतील. छोटय़ा, साध्यासुध्या या प्रश्नांना उत्तरांच्या वाटा फुटल्या की मूल आपणहून विचार करायला लागतं.

चार ते सहा या वयातही ‘स्व’ महत्त्वाचा असतो. आता आसपासचं जग समजून घेण्याची तीव्र इच्छाही असते. कारण या वयात मूल वैयक्तिकतेकडून सामाजिकतेकडे जातं. ‘मी एकटं खेळू शकतोच, पण इतर कोणी असलं तर जास्त मजा येते.’ मेंदूची यंत्रणा मुलांना योग्य वयात सामाजिकीकरणाकडे नेते.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com