अर्जुनाने लक्ष केंद्रित केलं आणि त्याला आसपासचं काहीच न दिसता फक्त पक्ष्याचा डोळा दिसायला लागतो, अशी गोष्ट सांगितली जाते. हे  कशामुळे शक्य होतं?  एक उदाहरण. अनेक वर्षांपूर्वी ज्या वास्तूला भेट दिलेली असते, तिथेच पुन्हा जातो. ती वास्तू सापडत नाही. तिथल्या जुन्या खाणाखुणा आपण शोधायला जातो. आठवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आसपासच्या सर्व विचारांमधून आपलं लक्ष कमी होतं, कारण आपला मेंदू फक्त एकाच ठिकाण  लक्ष केंद्रित करतो ते म्हणजे आपल्या स्मरणात असलेली ती जागा. मेंदू जोरदार मदत करायला घेतो. ती वास्तू, त्याच्या आसपासचे रस्ते, दुकानाच्या पाटय़ा अन्य बारीक-सारीक तपशील हे डोळ्यासमोर दिसत राहतात. यासाठी विविध पेशी आपल्याला पुन्हा पुन्हा माहिती पुरवत राहतात. जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माहिती पुरवत राहतात. या वेळी इतर गोष्टी अंधुक झाल्यासारख्या वाटतात किंवा भासतात.

अजून एक प्रसंग. असं समजा की एखाद्या सोहळ्यासाठी अनेक माणसं जमली आहेत. सर्व माणसं एकमेकांशी बोलत आहेत. त्याच वेळेला मागे पाश्र्वसंगीतसुद्धा सुरू आहे. आपल्याला भेटलेल्या माणसाशी आपल्याला काही तरी बोलायचं आहे. पण स्पष्ट आवाज ऐकू येत नाही. अशा वेळेला आपण जो माणूस बोलत आहे त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो. तेव्हाच इतर सर्व आवाज काहीसे कमी झाल्यासारखे भासतात. तसे ते प्रत्यक्ष कमी झालेले नसतात. तितक्या गोंधळातही आपलं संभाषण सुरू राहू शकतं.

जर मेंदूने ठरवलं की ‘क्ष’ ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंच आहे, तर यात काही अवघड काही नसतं. आपण बघतो की, काही मुलं प्रचंड गोंधळामध्ये, एखाद्या दुकानात बसून, भाजी विकण्याच्या अध्येमध्ये, बागेमध्ये, मंदिरात, घरात माणसांचे, टीव्हीचे, शेजारपाजारचे खूप आवाज असतानाही अभ्यास करतात. त्यांना अभ्यास करायला जमतं. आणि काही मुलांना अभ्यासाला स्वतंत्र खोली असूनसुद्धा अभ्यास होत नाही. वास्तविक, आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं, फक्त तसं ठरवावं लागतं. हे आईबाबांनी आणि शिक्षकांनी ठरवून चालत नाही. मुलांनीच ठरवावं लागतं.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com