अभ्यासातल्या एकाग्रतेविषयी खूपदा बोललं जातं. मुलांनी अभ्यासाकडे किंवा कोणत्याही अवघड वाटणाऱ्या कामाकडे लक्ष द्यावं असं वाटत असेल तर इतर व्यवधानं कोणती आहेत, हे बघावं लागेल. यामध्ये कदाचित खेळ असतील, छंद असतील. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारण्याचा वेळ असेल. अनेक घरांमध्ये मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढावी म्हणून या गोष्टींवर गदा येते. यातल्या काही गोष्टी बंद करण्यात येतात.

खरं तर शालेय मुलांच्या दिनक्रमात मैदानी खेळ, ते शक्य नसेल तर टेनिस-बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ, पोहणं, सायकलिंग याला पर्याय नाही. यामुळे शरीरातलं रक्ताभिसरण वाढतं. मेंदूला ऑक्सिजन मिळतो. याचा चांगला परिणाम एकाग्रतेवर होतो. प्रत्येक मुलामुलीला जे खेळायचं आहे, त्या खेळापासून त्यांना वंचित ठेवलं तर त्यांचं मन इतर कोणत्याही गोष्टीत एकाग्र होऊ  शकत नाही. याशिवाय जे छंद असतील, त्यातही मुलांचं मन गुंतलेलं असतं. त्या छंदांमुळे मुलांना आनंद होत असतो. म्हणून मुलांच्या टाइमटेबलमध्ये रोजचा वेळ या खेळांसाठी, छंदांसाठी ठेवायलाच हवा.

ज्या गोष्टींची मनापासून आवड असते, त्यात आपले न्यूरॉन्स प्राधान्याने जुळत असतात.  मुलांना काही वेळ या आवडीच्या आणि बौद्धिक गोष्टी करू दिल्या आणि मग अभ्यासाची वेळ ठरवली त्यांचं मन अभ्यासासाठी एकाग्र होण्याच्या शक्यता वाढतात. जर हे करू दिलं नाही तर मनात असमाधान राहतं. मूल एकाग्रतेने अभ्यास करू  शकत नाही.  आवडीच्या आणि नावडीच्या विषयांचा संबंध न्यूरॉन्सशी असतो, म्हणून त्या विषयांमुळे मनाला समाधान मिळतं किंवा त्रास होतो. कोणालाही कॉर्टिसॉलसारखी ताणकारक रसायनं नको असतात, तर आनंदी रसायनं निर्माण होतात. ही रसायनं मुलांच्या मेंदूत निर्माण व्हायला हवीत. याशिवाय, अभ्यास करण्याची प्रक्रिया ही मेमरी या भागात घडत असते. या भागांमध्ये जर धुसफुस, कंटाळा, अतिआनंद, अतिआत्मविश्वास, त्रास अशा भावना असतील, तर मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही. अभ्यासाआधी या सर्व भावना समस्थितीत आणाव्या लागतील. असं लक्षात आलं आहे की, घरातल्या भांडणामुळे, ते आवाज सतत कानात राहण्यामुळे मुलांना खूप त्रास होत असतो. पालकवर्गाने यावर काम केलं तर मुलांसाठी ते फारच महत्त्वाचं असेल.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com