31 October 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : अपराधभावना

दृष्टिकोनात बदल करणं हे फार आवश्यक आहे. काही झालं तरी अपराधभावनेत वाहून जायचं नाही.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आई-बाबा कायम एक जबाबदारी निभावत असतात. पण मुलांना पुरेसा वेळ देता न येणं, मूल आयुष्यात मागे पडतं आहे ही जाणीव होणं, मुलांनी चुकीचा मार्ग धरणं, मुलांना नोकरी- व्यवसायात नुकसान होणं, त्यांना योग्य जोडीदार न मिळणं.. असं काहीही घडलं तरी अनेक पालक हा दोष स्वत:कडे घेतात. त्यातून अपराधभावना तयार होते.

तसंच आपण आई-बाबांना हवं तसं वागत नाही, पुरेसे मार्क मिळवत नाही, इतरांसारखं कुठे चमकत नाही, ही भावना लहान मुलांच्याही मनात असते.

एकमेकांना दोष देत बसल्यामुळेही ही परिस्थिती उद्भवते. तसंच स्वत:कडून काहीएक अपेक्षा असतात. इतरांच्याही आपल्याकडून असतात. काही कारणाने या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर मनात अपराधभावना निर्माण होते. या भावनेला आपल्या मेंदूत नेमकं काय स्थान आहे?

या संदर्भात मेंदूवर काही संशोधनं झाली आहेत. २००४ साली ताकाहाशी व सहकाऱ्यांनी केलेलं मेंदूवरचं संशोधन प्रसिद्ध आहे. अशा संशोधनांमधून समजलेलं एक सत्य म्हणजे- स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूत ठरावीक स्थानांवर अपराधभावना दिसून येते. यात लिंगभेद नाही. लिंबिक सिस्टीम या भावनांच्या क्षेत्रात, तसंच फ्रंटल व टेम्पोरल लोबमधल्या काही क्षेत्रांमध्येही या भावनेचं स्थान दिसून आलं आहे.

अपराधभावना निर्माण व्हायच्या आधी : (१) एखादी गोष्ट न आवडणं; (२) या न आवडलेल्या गोष्टीबद्दल मनात लाजिरवाणेपणा येतो; यानंतर (३) अपराधभावना निर्माण होते. या भावनेला आधीच रोखलं किंवा त्याविषयी बोलणं झालं, तर पुढच्या अनेक गोष्टी टळण्याची शक्यता निर्माण होते. या भावनांचा वेळीच निचरा झाला नाही, तर पुढे नराश्य आणि त्यापुढे जाऊन काही मानसिक आजार होऊ शकतात. यासाठी आधीच्या पायऱ्यांवर मदत करणं हेच फार महत्त्वाचं आहे.

दृष्टिकोनात बदल करणं हे फार आवश्यक आहे. काही झालं तरी अपराधभावनेत वाहून जायचं नाही. जी काही समस्या असेल, ती तार्किक पद्धतीनं सोडवायची- म्हणजे ती समस्या जटिल होणार नाही. एकदा का अपराधी वाटायला लागलं, की ही भावना वाढतच जाते. हे सगळं गुंतागुंतीचं होऊन बसतं. याचा परिणाम शून्यच होतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:28 am

Web Title: human brain and feelings of guilt zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : तुलना
2 कुतूहल : बोहरचा अणू
3 मेंदूशी मैत्री : रागावर मार्ग
Just Now!
X