आपल्या मेंदूत सर्वकाळ पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत विविध प्रकारची माहिती आदळत असते. या माहितीतूनच आपलं विविध प्रकारचं शिक्षण चालू असतं.

डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा सतत मेंदूला दक्ष अवस्थेत ठेवत असतात. नवी माहिती आली की विविध कॉर्टेक्समध्ये असलेले न्यूरॉन्स कामाला लागतात. अशा प्रकारे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे विद्युत- रासायनिक संदेशांची देवाणघेवाण सतत चालू असते. जशी एखाद्या गजबजलेल्या लग्नघरात कामांची गडबड- घाई चाललेली असते, तशीच कामं इथे चालू असतात.

प्रत्येक न्यूरॉन, प्रत्येक क्षेत्र आपली ठरवलेली कामं करत असतो, तसंच इतर अवयवांचं – हात, पाय, पोट इत्यादींचं सहकार्य सतत घेत असतो. आपल्यापकी प्रत्येकाचा मेंदू शिकतो तो असा. प्रत्येक  अनुभवाचं रूपांतर मेंदू सिनॅप्समध्ये करतो. कोणत्याही मेंदूत जेवढे सिनॅप्स जास्त, तितकी त्या माणसाची बुद्धी जास्त. मेंदूत सिनॅप्सचं जाळं तयार करणं हेच आपलं काम. त्यामुळेच लग्नघरासारखी विद्युत रोषणाई इथे सतत चालू असते.

डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांचा मेंदूशी संबंध कसा असतो, हे आपण पुढल्या आठवडय़ात पाहणार आहोत.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com