19 February 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : ‘स्व’

पौगंडावस्थेतल्या मुलांपासून प्रत्येक जण स्वत:चा आणि स्वत:पुरता विचार करतो आहे.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

जगातल्या कोणत्याही प्राण्याच्या मेंदूत स्वत:चं अस्तित्व टिकवणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीव कसा वाचवायचा, याचं कोणतंही प्रशिक्षण घ्यावं लागत नाही. मग तो छोटासा किडा असो किंवा माणूस. मेंदूच्या अंतर्गत रचनेतच- ‘हा आपला जीव आहे, कोणीही मदतीला येवो किंवा न येवो, तो आपल्यालाच वाचवायचा आहे,’ हे असतंच. त्यामुळे तसा प्रसंग आलाच तर मेंदू स्वत:च्या सुटकेचे जमतील तसे मार्ग शोधतोच. इतर प्राणी फार विचार करू शकत नसल्यामुळे स्वत:चा जीव वाचवण्यापुरता मर्यादित विचार ते करतात. पण आपलं तसं नसतं. माणूस फार वेगळा विचार करू शकतो – करतोच; पण त्याचा ‘स्व’ काही केल्या सुटत नाही. आपल्या जिवाचं अस्तित्व जपणारा तो ‘ब्रेनस्टेम’ आणि स्व-बरोबर इतरांचाही मानसिक- सामाजिक बाजूंनी विचार करू शकणारा माणसामधला ‘निओ कॉर्टेक्स’ यांना जोडणारा हा धागा आहे. कारण अस्तित्वाच्या जपणुकीकडून स्वप्रेमाकडे आणि स्वप्रेमाकडून अतिरिक्त स्वप्रेमाकडे, असा हा प्रवास दिसतो. माणसाला स्वत:चं अस्तित्वच केवळ नव्हे, तर  ‘स्व’ खूपच आवडतो. त्यामुळेच स्वत:चा दृष्टिकोन यालाही फार महत्त्व आहे. स्वत:चा दृष्टिकोन असावा, तो जपावा, तो विकसित करावा हे सर्व खरं; पण समाजात जगताना दुसऱ्याचा दृष्टिकोन हादेखील महत्त्वाचा असतो, हे विसरून चालणार नाही. माणसा-माणसातलं नातं जपायचं असेल, तर या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हेन्री फोर्ड यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘यशाचं जर काही रहस्य असेल तर स्वतच्या दृष्टिकोनातून विचार करण्याबरोबरच, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून घटनांकडे बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे.’  हे वाक्य केवळ यशासाठी नाही, तर एकूणातच खूप महत्त्वाचं आहे. आजच्या घडीला तर पूर्वी कधीही नव्हतं इतकं महत्त्वाचं आहे. कारण या जगात ‘मला काय हवं’  असा विचार करणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे.  पौगंडावस्थेतल्या मुलांपासून प्रत्येक जण स्वत:चा आणि स्वत:पुरता विचार करतो आहे. खरं तर जी माणसं दुसऱ्यांच्याही दृष्टिकोनातून विचार करू शकतात, आपल्याप्रमाणेच इतरांनाही विचार करता येतो, याचा  विचार करतात, ती माणसं वेगळीच असतात. कोणत्याही काळातल्या, कोणत्याही प्रदेशात राहणाऱ्या समाजाला अशा माणसांची कायमच फार गरज असते.

 

First Published on September 6, 2019 4:28 am

Web Title: human brain functions human brain work brain thinking power zws 70
Next Stories
1 कुतूहल – स्वच्छतेचे दूत
2 मेंदूशी मैत्री : हक्क
3 कुतूहल : काचेची वाटचाल
Just Now!
X