19 January 2020

News Flash

सिनेमा आणि अनुकरण

सिनेमा किंवा चांगल्या फिल्म्स बघणं यातून मेंदूला नवीन अनुभव मिळतात.

सिनेमा किंवा चांगल्या फिल्म्स बघणं यातून मेंदूला नवीन अनुभव मिळतात. मेंदूच्या डाव्या अर्धगोलात भाषेची क्षेत्रं आहेत, तर उजव्या अर्धगोलात भावना, रंग, सर्जनशीलता यांची क्षेत्रं आहेत. सिनेमा बघणं म्हणजे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही अर्धगोलांना उद्दीपन मिळणं. यासाठी मुलांना मुलांसाठी तयार केलेले सिनेमे दाखवावेत. कारण त्यात मनोरंजन आणि प्रबोधन दोन्ही असतं; पण लहान वयातल्या मुलांना मोठय़ांचे सिनेमे दाखवणं हे चूक आहे.

आपल्याकडे ‘सेन्सॉर बोर्ड’ असतं. अठरा वर्षांखालील वयोगटासाठी कोणता सिनेमा बघणं अयोग्य आहे, याचं प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं असतं; पण मुलांना घरी ठेवणं अशक्य असतं म्हणून किंवा मुलांना नाही तरी काय कळणार आहे, असा पालक विचार करतात म्हणून मोठय़ांचे सिनेमे लहानांना दाखवले जातात. मुलं सिनेमाला जाऊन झोपून गेली तर ठीक; पण आठ-दहा वर्षांची मुलं झोपत नाहीत; ते सिनेमा बघत बसतात. अशा वयाच्या मुलांना समजतं आणि जरा जास्तच समजतं! अर्थातच, जे समजतं ते सगळं बरोबरच असतं असं नाही; पण त्यांनी त्याचे स्वत:ला हवे तसे, विविध प्रकारचे अर्थ लावणं ही गोष्ट नक्कीच चांगली नाही.

प्रौढ माणसं या काल्पनिक जगात रमतात आणि सिनेमा संपल्यावर पुन्हा अगदी सहजपणे आपल्या वास्तवात येतात. आपापली कामं सुरू करतात; पण मुलं अठरा-एकोणीसची होत नाहीत, तोपर्यंत मुलांना हे जमणं काहीसं अवघड असतं. जसजसे ते मोठे होत जातील, तसतसा काल्पनिक कथा आणि वास्तव यांतला फरक त्यांना कळायला लागतो. वास्तव कुठं संपलं आणि काल्पनिकता कुठून सुरू झाली, हे समजायला वेळ लागतो. म्हणून हिंसाचाराने भरलेले आणि लैंगिक दृश्य असलेले सिनेमे मुलांना दाखवू नयेत. याचा परिणाम मेंदूत असा घडतो की, आपण जे काही बघू त्याचं अनुकरण करण्यासाठी मेंदू उत्सुक असतो. त्याला अनुकरणासाठी कोणत्या अनुभवांचं खाद्य द्यायचं, हे आपणच ठरवलं पाहिजे. आज या दोन्ही साधनांपासून मुलांना दूर ठेवणं अवघड आहे; पण शक्यतो तसा प्रयत्न करायला हवा. माध्यमांनीही याचं तारतम्य ठेवणं आवश्यक आहे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on August 26, 2019 12:13 am

Web Title: human brain movies mpg 94
Next Stories
1 विकर.. सजीवांतली उत्प्रेरके!
2 कुतूहल : न्यूट्रॉनचा शोध
3 मेंदूशी मैत्री : शिस्तीसाठी धाक
Just Now!
X