प्रकाशसंस्लेषण क्रियेमध्ये हरितद्रव्य असलेल्या पेशींमध्ये तयार झालेली साखर वनस्पतींच्या विविध भागांकडे कशी पोहोचते, हा पूर्वीच्या अनेक शास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा विषय होता. कार्ल न्येगेली या स्विस संशोधकाला १८५०-६०च्या दशकात, सूक्ष्मदर्शकातून वनस्पतींतील पेशी न्याहाळताना, काष्ठ पेशी (झायलम) या जलवाहक पेशींना जोडूनच असलेल्या, लांब नळकांडय़ांसारख्या वेगळ्या पेशी दिसून आल्या. जेव्हा या पेशींतून बाहेर येणाऱ्या द्रवाचे पृथ:करण केले, तेव्हा त्या द्रवात मोठय़ा प्रमाणात साखर असल्याचे आढळले. म्हणजे अन्नाचे परिवहन हे या पेशींद्वारे होत होते. या पेशींना कार्ल न्येगेलीने फ्लोएम म्हणजे अधोवाही पेशी हे नाव दिले. वनस्पतींतील अन्नाच्या या प्रवासावर त्यानंतर विविध सिद्धान्त मांडले गेले. यातला सर्वात लक्ष्यवेधी सिद्धान्त ठरला तो, जर्मनीच्या एर्न्‍स्ट म्यूंच याने १९३०च्या दशकात मांडलेला, परासरणाच्या (ऑस्मॉसिस) क्रियेशी निगडित असलेला सिद्धान्त.

या सिद्धान्तासाठी एर्न्‍स्ट म्यूंचने, जर्मन संशोधक विल्हेम पेफ्पर आणि इंग्लिश संशोधक फ्रेडरिक ब्लॅकमॅन यांच्या प्रयोगाचा आधार घेतला. या प्रयोगात एक नळी घेऊन, ती दोन्ही तोंडांकडे काटकोनात वळवली होती. या वळलेल्या भागांपैकी एका भागात साखरेचे अधिक संहत (काँसन्ट्रेटेड) द्रावण भरले आणि दुसऱ्या भागात साखरेचे कमी संहत द्रावण भरले. त्यानंतर ही दोन्ही तोंडे अर्धपार्य (म्हणजे ज्यातून काही पदार्थ जा-ये करू शकतात) अशा पटलांनी बंद करून टाकली. या दोन्ही द्रावणांच्या मधला भाग शुद्ध पाण्याने भरला होता. ही नळी त्यानंतर पाण्यात बुडवून ठेवली. परासरणामुळे नळीबाहेरचे पाणी अधिक संहत द्रावण ठेवलेल्या बाजूकडील पटलातून नळीच्या आत शिरले. परासरणामुळे निर्माण झालेल्या अंतर्गत दाबामुळे ते नळीत पुढेपुढे सरकत कमी तीव्रतेचे द्रावण असलेल्या भागातून बाहेर पडले. पाण्याच्या या प्रवासाबरोबर साखरसुद्धा पुढे सरकत दुसऱ्या तोंडाशी पोचली. म्यूंचने या प्रयोगाची तुलना वनस्पतींतील अन्नाच्या परिवहनाशी केली. अधिक संहत द्रावण असलेली बाजू म्हणजे जिथे साखरेची निर्मिती होते त्या हरितपेशी, शुद्ध पाणी भरलेला नळीचा भाग म्हणजे अधोवाही पेशींचे नळकांडे आणि कमी संहत द्रावण भरलेली बाजू म्हणजे साखर जिथे पोचवायची आहे त्या पेशी. एर्न्‍स्ट म्यूंचच्या या प्रयोगावरून वनस्पतींतील अन्नप्रवासाच्या पुढील संशोधनाचा पाया रचला गेला.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org