माणूस सहसा किती आनंदी असतो, याचेदेखील मापन केले जावे याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेतला आणि एप्रिल २०१२ मध्ये त्याने पहिला ‘जागतिक आनंदीपण’ अहवाल प्रसिद्ध केला. त्यासाठी काही निवडक घटकांबाबत विविध देशांतील नागरिकांचे नमुना पद्धतीने सर्वेक्षणही केले गेले. त्या आकडेवारीवर सांख्यिकी प्रक्रिया करून ० ते १० मधील संख्येत प्रत्येक देशासाठी आनंदीपण दर्शवणारा एक संयुक्त निर्देशांक विकसित केला गेला.  त्याप्रमाणे १५० हून अधिक देशांची या निर्देशांक मूल्याच्या उतरत्या क्रमाने २०१२ साली यादी देण्यात आली. त्यावरून असे प्रामुख्याने दिसले की केवळ आíथक सुबत्ता असणे म्हणजे आनंदी असणे; असा समज जागतिक पातळीवरही मान्य नाही. या निर्देशांकांवरून कुठला देश कुठल्या घटकांवर कमी पडला, हेदेखील स्पष्ट झाले. या निर्देशांकाच्या काही मर्यादा असल्या तरी कुठल्या गोष्टींत सुधारणा करावी याचे मार्गदर्शन त्या त्या देशाला मिळाले. देशोदेशीच्या राजकीय, आíथक आणि सामाजिक स्थितीमध्ये कालांतराने फरक पडणे स्वाभाविक असल्याने असा निर्देशांक दर वर्षी काढणे सयुक्तिक होईल असे ठरले. त्यानुसार अलीकडेच २०१६ सालचा ‘जागतिक आनंदीपण’ अहवाल प्रसिद्ध झाला. त्यासाठी विचारात घेतलेले घटक : १) दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन, २) सामाजिक आधार, ३) आयुष्यमान, ४) जगण्यासाठी पर्याय निवडण्याची स्वतंत्रता, ५) दानशूरता, आणि ६) लाचखाऊपणा. त्यासंदर्भात १५७ देशांतून सांख्यिकी तत्त्वानुसार निवडलेल्या प्रत्येकी ३,००० नागरिकांकडून एका प्रश्नावलीने माहिती मिळवली गेली आणि गणिती पद्धतींनी विश्लेषित करून देशांची आनंदीपण निर्देशांकाप्रमाणे नवी यादी काढली गेली.

यावरून असे दिसते की पहिल्या १० देशांच्या आनंदीपण निर्देशांकांची सरासरी ७.४१३ तर शेवटून १० देशांच्या आनंदीपण निर्देशांकांची सरासरी ३.४२३ आहे, जी आनंदीपणात असलेली मोठी तफावत दाखवते. सदर यादीप्रमाणे डेन्मार्क १, स्वित्र्झलड २, अमेरिका १३, जर्मनी १६, इंग्लंड २३, जपान ५३, रशिया ५६, आणि चीन ८३ व्या क्रमांकावर आहेत.

या यादीत भारताचा ११८ वा क्रमांक असून आनंदीपण निर्देशांक ४.४०४ आहे. आपले शेजारचे काही छोटे देश, जसे की भूतान (८४), पाकिस्तान (९२), नेपाल (१०७), आणि बांग्लादेश (११०) या यादीत आपल्यापेक्षा वर आहेत. त्यावरून किती लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे याची कल्पना मिळते. सर्वच घटकांत आपली सुधारणा होणे अतिआवश्यक आहे.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

सुभाष मुखोपाध्याय (१९९१, बंगाली)

१९९१चे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बंगाली लेखक आणि स्वातंत्र्य चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते सुभाष मुखोपाध्याय यांची बंगाली साहित्यात ‘पदातिक कवी’ म्हणूनही ओळख आहे. १९७१ ते ८५ या कालावधीत बंगाली भाषेतील सृजनात्मक साहित्य निर्मितीबद्दल त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

१२ फेब्रुवारी १९१९ रोजी पश्चिम बंगालमधील  कृष्णनगर (जि. नडिया) या गावी एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात सुभाष मुखोपाध्याय यांचा जन्म झाला. शाळकरी वयातच या कवीला वाचनाचे एवढे दांडगे वेड होते, की ते रस्त्याने चालतानासुद्धा वाचन करीत. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन हे त्यांचे आवडते खेळ होते. सातव्या इयत्तेत असताना शालेय हस्तलिखितात त्यांचे दोन लेख छापून आले. ते लेख वाचून संस्कृतच्या शिक्षकांनी विचारले, ‘तू गटे वाचला आहेस का?’ कारण त्यांच्या विचारांशी लेखातील विचारांचे साम्य होते. अर्थातच सुभाष ‘नाही’ म्हणाले. त्यानंतर त्यांना कविता लिहिण्याचा आग्रह करण्यात आला. प्रयत्न करून सुभाषजींनी ‘धोब्या’वर कविता लिहिली. पुढे हाच कवी ज्ञानपीठ विजेता म्हणून उदयास आला. कलकत्त्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजातून ते ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घेऊन बीए व  एमए (१९४०) झाले.

१९४१ मध्ये ते साम्यवादी दलाचे सदस्य बनले. त्या वेळी त्यांनी हुकूमशाही विरोधी गीते लिहिली. ती सामान्य जनतेत लोकप्रिय झाली. कारखान्यात, गावात, मोर्चामध्ये शेकडो लोक ती गाणी गाऊ लागले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असल्यामुळे त्यांना अटक व कारावासही भोगावा लागला. त्यांची पत्नी गीता बंदोपाध्याय याही प्रसिद्ध लेखिका होत्या.

सामाजिक चळवळीबरोबरच ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स युनियन’मधून त्यांनी काम केले. एशियन रायटर्स असोसिएशनचे ते डेप्युटी सचिव होते.  साहित्य अकादमी कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. कविता, कादंबरी, प्रवास वर्णने त्यांनी लिहिली. ते पत्रकारितेतही कार्यशील होते. ‘परिचय’ या प्रसिद्ध बंगाली साहित्यपत्रिकेचे ते संपादक होते. दलाच्या मुखपत्राकरिता लिहिण्यासाठी सुभाष मुखोपाध्याय यांनी १९४३ मध्ये सगळा बंगाल पायाखाली घातला. त्या लेखांचे नंतर पुस्तकही झाले.  १९८२ साली त्यांनी पक्ष सोडला, तरी त्यांची गाणी पक्षात व  चळवळींत आजही गायली जातात.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com