News Flash

जठरातील तीव्र हायड्रोक्लोरीक आम्ल

तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये कित्येक धातू विरघळतात. घरातील फरशा, टाइल्स यांच्यावरील सहजी न निघणारे डाग स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर होतो.

| November 17, 2014 02:33 am

तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये कित्येक धातू विरघळतात. घरातील फरशा, टाइल्स यांच्यावरील सहजी न निघणारे डाग स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर होतो. रासायनिक उद्योगांमध्ये या आम्लाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल त्वचेला घातक असते. त्यामुळे ते हाताळताना संरक्षक रबरी हातमोजे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा, संरक्षक कपडे व पादत्राणे वापरणे श्रेयस्कर असते. आम्लाचा संपर्क त्वचा, डोळे यांच्याशी झाल्यास त्वचा, डोळे त्वरित भरपूर पाण्याने धुवावेत.
आपल्या जठरामध्ये पाचक रस स्रवत असतो. त्यात हेच तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल असते. जठराच्या त्वचेवर या तीव्र आम्लाचा दुष्परिणाम होत नाही. असं का होत असेल? उलट जठरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी ते मदत करत असते. जठरातील घातक सूक्ष्म जंतूंचा नायनाट होण्यासाठीही त्याचा उपयोग होत असतो. या आम्लाचा अभाव असेल तर पोटाचे अनेक विकार उद्भवतात.
पोटाच्या अंतर्गत भागात म्युकस नावाचा पदार्थ सतत स्रवत असतो. त्याचा जाड व घट्ट थर पोटाच्या आतील त्वचेवर तयार होत असल्यामुळे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लाचा आतील त्वचेशी संपर्क टाळला जातो आणि त्वचेवर दुष्परिणाम होत नाही.
पचनाच्या कार्यात मदत केल्यानंतर पुढे हायड्रोक्लोरिक आम्लाचा प्रवास आतडय़ांमध्ये सुरू होतो. तेथे असलेल्या सोडियम बाय काबरेनेट (बेकिंग सोडा) या अल्कधर्मीय द्रव्यामुळे आम्लाचे उदासीनिकरण घडून घातक नसलेले सामान्य पदार्थ तयार होतात. या क्रियेत आम्लाची तीव्रता नाहीशी झाल्यामुळे आतडय़ांना इजा होण्याची शक्यता अजिबात नसते.
वरीलपकी कोणत्याही क्रियेत काही कारणाने व्यत्यय आला, तर मात्र हायड्रोक्लोरिक आम्ल आपला रंग दाखवायला सुरुवात करते. श्वसनमार्गात, छातीत जळजळ होऊ लागते. पोटात अल्सर (व्रण किंवा जखम) होतो. अशा वेळी हायड्रोक्लोरिक आम्लाच्या निर्मितीवर बंधने आणावी लागतात. त्यासाठी काही औषधांची उपाययोजना करावी लागते. पोटात आधीपासून असलेल्या आम्लाचे उदासीनिकरण करून दाहकता कमी करण्यासाठी अ‍ॅन्टासिडसारखे औषध घ्यावे लागते.
यातील अल्कधर्मीय रसायन (अ‍ॅल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड) आम्लाशी त्वरित क्रिया करून सामान्य पदार्थ तयार करतात.

मनमोराचा पिसारा: सुख में सुमिरन सुख में सुमिरन
सुख में सुमिरन
दुख में सुमिरन सब करै,
सुख में करे न कोय.
जो सुख में सुमिरन करे,
तो दुख काहे होय।।
कबीरजींच्या दोह्यमधील १५-१६ शब्दांमध्ये अजब जादू आहे. ते अगदी सहजपणे, कधी देहाती, तर कधी खडी बोलीमध्ये साधे शब्द वापरून सांगत जातात, आपण ऐकत जातो. कबीरजींचे दोहे अनेक नामवंत गायकांना खुणावतात. त्यांच्या शब्दापलीकडे जाणारी त्यांची दृष्टी आपल्याला भावते.
दोन पंक्तींमधल्या शब्दांमध्ये त्यांची वृत्ती जाणवते. त्यांची भाववृत्ती (मूड) ही मनाला स्पर्श करते. दु:खी माणसाबद्दल त्यांना विलक्षण कळवळा आहे. आईच्या मायेनं ते आपल्याशी बोलतात, तर कधी पाठीवरून प्रेमळ हात फिरवताना धपाटाही मारतात, कान पिळतात आणि थोपटतात. सत्य आणि वास्तवाची प्रखर जाणीव ठेवून कबीरजी विलक्षण आध्यात्मिक अनुभव आपल्यात निर्माण करतात.
प्रस्तुत दोह्यामधून ते आपल्या मनात भान निर्माण करतात.
ते म्हणतात, दु:खद प्रसंग कोसळला की, आपण मदतीसाठी, कृपेसाठी, सामर्थ्यांसाठी देवाचा धावा करतो, आपल्याला ईश्वराची आठवण येते. आपण नामोच्चार करून स्वत:ला धीर देण्याचा प्रयत्न करतो, देवाला साकडं घालतो. अनेकदा, त्या मनोबलाच्या आधारे, संकटातून सुटण्याचा मार्ग आपल्याला दिसतो.
हे अगदी स्वाभाविक आहे, असं म्हणून कबीरजी एकदम पलटतात आणि म्हणतात, ही जाणीव आणि भान तू सुखाच्या क्षणी का ठेवत नाहीस. तू ईशचिंतन का करीत नाहीस? सुखी-समाधानी परिस्थितीत मात्र तुला देवाची आठवण येत नाही. भल्या माणसा, सुखात ती ‘जाणीव’ जागृत ठेवलीस, तर तुझ्यावर दु:खद प्रसंग आणि संकटं ओढवणारच नाहीत.
खरंय, परंतु इतका सरळसोट अर्थ या दोह्यात नाहीये. शालेय क्रमिक पुस्तकातील निरूपणाकडे आपण पाहिलं, तर लक्षात येतं की, या दोह्यात कबीरजींनी कोणत्याही देवाचं, रामाचं, साईचं नाव गुंफलेलं नाही. सुख-दु:खात कोणाचं ‘सुमिरन’ करावं आणि ठेवावं यावर नेमका शब्द वापरलेला नाहीये. हे सुमिरन कशाचं? आणि कसलं?
दु:खात असताना आपण धावा करतो तेव्हा त्यात रागाची किनार असते, आपण कोणावर तरी रागावलेले असतो. त्या रागाच्या पोटी आपण स्मरण करतो. ती जाणीव मनात पक्की असते. मग सुखात असताना कोणतं स्मरण आपण करायला चुकतो? तर आपण कृतज्ञतेची जाणीव ठेवत नाही. या कृतज्ञतेच्या भावनेऐवजी आपण गर्विष्ठ होतो. गर्विष्ठपणा म्हणजे फाजील आत्मविश्वास, म्हणजे वास्तवापासून फारकत. सुखाच्या आणि आनंदाच्या क्षणी जर आपण अवास्तव गर्व बाळगला नाही, तर आपण विनम्र राहतो. आपण आत्मसामथ्र्य वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणून कबीरजी म्हणतात, सुखात सुमिरन केलंस. स्वत:ची रास्त जाणीव जागृत ठेवलीस. स्वत:मधली शक्तिस्थानं आणि त्रुटींचा आढावा घेत राहिला नाहीस, तर खचितच अडचणीत येशील.
कबीरजी, इतकं व्यावहारिक सत्य इतक्या साध्या शब्दांत.. मनमोराचा पिसारा फुलला, खरंच.
डॉ.राजेंद्र बर्वे  office@mavipamumbai.org  

प्रबोधन पर्व: ‘मा-फु-आ’कार कॉम्रेड शरद पाटील
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी ‘मार्क्‍सवाद- फुले-आंबेडकरवाद’ आणि ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ अशा ग्रंथांतून आणि ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी’ या मासिकातून जातिअंताच्या प्रश्नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणले. फुले-आंबेडकरांच्या जातीविरोधी विचारांचा मार्क्‍सवादाशी समन्वय करून मार्क्‍सवाद-फुले-आंबेडकरवादाचे तत्त्वज्ञान शरद पाटलांनी स्थापित केले. त्यांच्या या ‘मा-फु-आ’वादाने महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात बरेच वादळ निर्माण केले होते. मार्क्‍स, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे खरे वारसदार म्हणून त्यांनी साहित्य, धर्म, विचारप्रणाली आणि संस्कृती यांच्या संदर्भात नवे सिद्धांत मांडले.
‘जातीय सामंती सेवकत्व’ आणि ‘भांडवली लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी भारतातील लोकशाही क्रांतीची नवी परिभाषा मांडण्याचेही काम केले आहे.  महाराष्ट्रातील पहिली धरणग्रस्तांची चळवळ उकाई धरणाच्या निमित्ताने त्यांनी उभी केली. आदिवासी भूमिहिनांसाठी वनकायद्याची भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात कॉ. शरद पाटील आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी लढवली.
सुरुवातीची काही वष्रे पाटील यांनी माकपचे काम केले; पण जातिव्यवस्थेविरुद्ध लढायला नकार दिल्याने माकपचा राजीनामा दिला. १५ ऑक्टोबर १९७८ रोजी मार्क्‍सवाद- फुले- आंबेडकरवादी तत्त्वावर आधारलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. १९८२ ते १९९३ या काळात या पक्षाचे मुखपत्र ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी’चे संपादक म्हणून कामही केले. ‘जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व’, ‘शिवाजीच्या िहदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण – महंमदी की ब्राह्मणी?’,  ‘मार्क्‍सवाद- फुले- आंबेडकरवाद’, ‘भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत’, ‘बुद्ध- भारतीय इतिहासातील लोकशाही’, ‘स्वातंत्र्य व समतेचा  अशा विविध पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 2:33 am

Web Title: hydrochloric acid for achlorhydria
Next Stories
1 पचन प्रक्रियेतील विकरांचे महत्त्व
2 विकरांची क्रिया
3 पचन प्रक्रियेतलं रसायनशास्त्र
Just Now!
X