शाळेत असताना अनेक विद्यार्थी परवलय (Parabola) आणि अतिपरवलय (Hyperbola) यासारख्या संकल्पना शिकताना ‘याचा आपल्याला आयुष्यात काय उपयोग’ अशा भावनेने त्यांचा तिटकारा करतात; पण केवळ अतिपरवलयाच्या गुणधर्माचा वापर करून लक्षावधी जहाजांनी आणि विमानांनी सुमारे पन्नास वर्षे समुद्रात आपलं स्थान निश्चित केलंय आणि दाट धुक्यातही निर्धोकपणे आपला मार्ग शोधलाय. हे ऐकल्यावर त्यांना या अजब आकाराबद्दल नक्कीच कौतुक वाटेल.

‘डेका नॅव्हिगेटर’ या हायपरबोलिक नॅव्हिगेशन पद्धतीच्या एका चेनमध्ये एक मुख्य (मास्टर) आणि तीन उप (स्लेव्ह) अशी चार रेडिओ स्टेशन्स असतात. ही एकमेकांपासून ६० ते १२० सागरी मल अंतरावर असतात. ही स्टेशन्स एकाच वेळी वेगवेगळ्या तरंगलांबीच्या रेडिओ लहरी प्रसारित करतात. या लहरी पकडून त्यांमधला ‘फेज डिफरन्स’ मोजण्याचे उपकरण बोटीवर बसविलेले असते. हा फरक मोजून दोन स्टेशन्समधल्या अंतराच्या फरकाचा बिंदूपथ (Locus) मिळतो. असे तीन बिंदूपथ ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी जहाज आहे, हे निश्चितपणे समजते.

ही पद्धत वापरून किनाऱ्यापासून दिवसा २०० सागरी मल आणि रात्री सुमारे १०० मल अंतरापर्यंत बोटीचे स्थान निश्चित करता येते. ही पद्धत अस्तित्वात आल्यानंतर ती इतकी लोकप्रिय झाली की इंग्लिश चॅनेलपासून सुरुवात करून भारताच्या दोन्ही किनाऱ्यांसह जगातल्या ५०हून अधिक ठिकाणी अशा चेन्स उभारण्यात आल्या. त्यानंतरच्या काळात लोरान (लाँग रेंज नॅव्हिगेशन) ही पद्धत विकसित करण्यात आली. ही पद्धत किनाऱ्यापासून १००० ते १५०० मलांपर्यंत बोटीचे स्थान निश्चित करायला मदत करते. त्यानंतर ओमेगा नावाची एक पद्धत निघाली. हीदेखील हायपरबोलिक पद्धतच होती. परंतु जगभर पसरलेल्या केवळ आठ रेडिओ स्टेशन्सच्या मदतीने ही पद्धत जवळजवळ जगात कुठेही वापरता येत असे.

अशा तऱ्हेने सुमारे पन्नास वर्षे जगभरच्या बोटी आणि विमानेसुद्धा हायपरबोलिक नॅव्हिगेशनवर ‘डोळे मिटून’ विश्वास ठेवत आली आहेत. ‘डोळे मिटून’ म्हणण्याचे कारण म्हणजे धुक्यामुळे समोरचे काहीही दिसत नसताना बोट किंवा विमान चालविण्याच्या या पद्धतीला ‘ब्लाइंड नॅव्हिगेशन’ म्हणतात.

सुनील सुळे , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : महाश्वेतादेवी –  विचार

डॉ. नेल्सन मंडेला यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात महाश्वेतादेवींनी आपल्या लेखनाविषयीचे मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘केवळ एक लेखक म्हणून नव्हे तर, ज्या समाजात अजून खूप काही बदलणं आवश्यक आहे त्यासाठी खूप काम करणं आवश्यक आहे. त्या समाजाचा एक भाग म्हणून मला हा पुरस्कार दिला गेला आहे. याची मला इतरांपेक्षा जास्त जाणीव आहे.

माझ्या अनेक पुस्तकांतून राष्ट्रीय स्तरावरील जनजातींच्या अनुभवांचं दर्शन घडतं. पृथ्वीवर सगळीकडे जनजाती, शारीरिक आणि सांस्कृतिक दोन्हीही बाबतीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आमच्या देशातही त्यांना विकासापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. मनुष्य आपल्या जीवनातून, प्रत्यक्ष अनुभवातून, पुस्तकातून शिकत जतो. ते साहित्य जगतापेक्षा किती तरी विशाल असतं. आपलं लेखन वाचून वाचकांनी विचार करावा. खोटय़ा मूल्यांविषयी त्यांच्या मनात प्रश्नचिन्हं उभी राहावीत आणि ती मूल्यं नाकारण्याची प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न व्हावी असं, अनेक महान लेखकांना विचारवंतांना वाटत आलेलं आहे.  मी जरी बंगाली भाषेत लिहीत असले तरी मी स्वत:ला एक भारतीय लेखकच समजते. १९७९ मध्ये माझ्या महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचे हिंदीमध्ये अनुवाद करून, नॅशनल बुक ट्रस्टने त्याचे प्रकाशन करायला सुरुवात केली. या हिंदी अनुवादामुळेच  माझ्या सगळ्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवाद होऊ लागले.

केवळ आदिवासी लोकच आपल्या देशात उपेक्षित राहिलेले नाहीत. त्यांच्या तऱ्हेचे इतर लोकही त्यांचं जीवन, चांगलं जीवन जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष, त्यांच्या आशाआकांक्षा, त्यांचे जय-पराजय, हेदेखील माझ्या लेखनाचे विषय झालेले आहेत व नेहमी राहतील.

या सन्मानासाठी तुम्ही अशाच लेखिकेची निवड केलीय, या अवघड रस्त्यावरून अधिकाधिक लेखक जेव्हा चालू लागतील तेव्हा मला पूर्णत्वाचा आभास होईल. माझा भारत अजूनही घनघोर अंधकारात आहे. हे शतक संपण्याच्या वेळीच हा अंधकार दूर करण्याची, या आवरणाच्या मागे जे वास्तव आहे ते बघण्याची आणि सगळं करताना आपला खरा चेहरा ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. कुण्या दलित आदिवासी लेखकाला हा पुरस्कार दिला जाईल असा दिवस उजाडेलही नाही. कुणी सांगावं?’’

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com