डॉ. जॉन स्कडर (थोरले) या मेडिकल मिशनऱ्यांनी १८३६ साली तमिळनाडूत येऊन १८५५ मध्ये मृत्यू होईपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्या पुढच्या पाच पिढय़ांमधील ४२ वंशजांनीही त्यांचे अनुकरण करून तमिळनाडूतील अनेक शहरांमध्ये दवाखाने उघडून वैद्यकीय सेवा पुरवल्या. जॉन (थोरले) यांच एक पुत्र डॉ. जॉन स्कडर (कनिष्ठ) यांनी आपले वैद्यकीय कार्य अरकाटमध्ये केले. त्यांना दोन मुले, एक मुलगी. तिघी डॉक्टर. यातील मुलगी डॉ. इडा स्कडर यांचे कार्य विशेष संस्मरणीय आहे.

१८७० साली जन्मलेल्या इडा यांचं शिक्षण अमेरिकेत झालं. वैद्यकीय शिक्षण नॉर्थफिल्ड सेमिनरीतून घेतलेल्या इडाला खरं तर वैद्यकीय शिक्षण घेण्याची स्वतची इच्छा नसताना वडिलांच्या आग्रहाखातर ते घ्यावं लागलं. शिक्षण झाल्यावर आपला वडिलोपार्जति वैद्यकीय व्यवसाय न करता न्यू यॉर्कमध्येच लग्न करून संसार थाटायचा असा तिचा इरादा. पण १८९० मध्ये तिची आई डॉ. सोफिया भारतात त्यांच्या गावात – तिदीवनमध्ये गंभीर आजारी पडली. वडिलांच्या बोलावण्यावरून इडा भारतात आली. आई पुढे बरी झाली पण त्याच काळात तिला एक अनुभव असा आला की त्यामुळे तिने वैद्यकीय व्यवसाय न करण्याचा बेत रद्द केला. तिच्या आईच्या ओळखीच्या तीन मुस्लीम महिला प्रसूतिकाळात योग्य उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी मरण पावल्या. प्रसूतितज्ज्ञ स्त्री वैद्य त्या वेळी तिथे कोणी नव्हती आणि पुरुष वैद्यांकडून कोणतेही उपचार घेण्यास समाजाची मनाई, यामुळे हे घडले.

इडा यांनी मद्रासच्या परिसरात केवळ स्त्रियांसाठी इस्पितळ काढायचे ठरवून त्या न्यू यॉर्क कान्रेल मेडिकल कॉलेजातून स्त्रीरोग उपचारांचे काही शिक्षण आणि मॅनहटन बँकरकडून १० हजार डॉलरची देणगी मिळवून मद्रासला आल्या. १९०१ साली त्यांनी भारतातले फक्त महिलांवरील उपचारांसाठी इस्पितळ सुरू केलं. १९१८ मध्ये वेल्लोर येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल सुरू करून त्यांनी महिला डॉक्टर मोठय़ा संख्येनं तयार केल्या. डॉ. इडा स्कडर १९६० साली मरण पावल्या. आयुष्यभर त्या अविवाहित राहिल्या. सध्या वेल्लोर हे देशातील एक प्रसिद्ध वैद्यकीय उपचार केंद्र म्हणून विख्यात आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com