१८३४ साली ब्रिटिश पार्लमेंटला लागलेल्या आगीत इमारतीचे अनेक भाग आणि कागदपत्रे बेचिराख झाल्यामुळे त्या जागी नवीन इमारत बांधण्यात आली. सहा वर्षांत नवीन इमारत उभी राहील असा प्राथमिक अंदाज होता, पण इमारत परिपूर्ण होण्यास ३० वष्रे लागली. चार्ल्स बरी हा या इमारतीचा वास्तुरचनाकार होता. ३० वर्षांनी एक नमुनेदार आणि पुढे जगप्रसिद्ध झालेली इमारत उभी राहिली.

चार्ल्स बरी त्यामुळे ‘सर चार्ल्स बरी’ झाला. त्याचा पुतळा पार्लमेंटच्या दर्शनी भागात आहे. या भव्य इमारतीत ११८० दालने, १२६ जिने आणि ४० लिफ्ट आहेत. त्याशिवाय तीन कि.मी. लांबीचे व्हरांडे आहेत. मूलभूत आणि आवश्यक असलेले बांधकाम झाल्यावर १८५० मध्ये कॉमन्सची बठक झाली. गंमत म्हणजे या बठकीवरच सभासदांनी बहिष्कार टाकला, कारण त्यांना बरीने तयार केलेले इमारतीचे छत पसंत नव्हते! त्यात बदल केला गेला. १८५२ साली व्हिक्टोरिया राणीने दोन्ही सभागृहांचे उद्घाटन केले. पार्लमेंटमध्ये कोणत्याही सदस्याने दुसऱ्या सदस्याच्या नावाचा उल्लेख करावयाचा नाही, फक्त त्याच्या मतदारसंघाचे नाव घेऊन त्या मतदारसंघाचे सन्माननीय सभासद असे म्हणण्याचा प्रघात होता. सभापतीसुद्धा ही प्रथा पाळत. पण सर चार्ल्स ट्रिव्हार हा सभापती तिरळा होता. तो कोणाकडे पाहतोय आणि कोणाशी बोलतोय हे कळायचे नाही! तेव्हापासून सदस्यांची नावे पुकारण्याची प्रथा सुरू झाली!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

वर्गीकरणाचा इतिहास जाणून घेतल्यावर आता प्रत्यक्ष वर्गीकरण अर्थात वनस्पतींमधील विविधता आपण जाणून घेऊ या.

संपूर्ण वनस्पती विश्व प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभागले जाते. अपुष्प. वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. सर्वप्रथम आपण अपुष्प वनस्पतीची माहिती घेणार आहोत. अपुष्प वनस्पती एक मोठा आणि महत्त्वाचा गट आहे. या गटातील वनस्पतींची माहिती कमी प्रमाणात असते. या गटाला ‘कनिष्ठ वनस्पती’ किंवा ‘लोअर प्लॅण्ट्स’ म्हणूनही संबोधिले जाते. वास्तविक या वनस्पतींमध्ये कोणतेही वैगुण्य नसते किंवा कमीपणाही नसतो, पण त्यांचे जीवनचक्र साधे, सोपे, असते म्हणून या गटाला हे नाव पडले आहे.

शैवाल, कवक, दगडफूल जिवाणू ब्रायोफाइट्स आणि नेचे या अपुष्प वनस्पती या गटातील आहेत. पृथ्वीवर निर्माण झालेल्या सजीवात पाण्यातील शैवाल वनस्पती या सर्वप्रथम अस्तित्वात आल्या. शैवाल हा गोडय़ा पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात, ओलसर जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पतींचा एक मोठा समूह आहे. शैवाल साध्या रचनेच्या वनस्पती म्हणून ओळखल्या जातात, असे असूनही यांत अनेक प्रकार आणि आकार असलेल्या शैवालांचा सामावेश आहे. शैवालाला खरेखुरे मूळ, खोड, पाने, व फुले नसतात. काही गोडय़ा आणि समुद्राच्या पाण्यात / खाऱ्या पाण्यातील शैवाल याला अपवाद आहे.

शैवालात प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एकपेशीय शैवाल आणि बहुपेशीय शैवाल. एकपेशीय शैवाल अतिसूक्ष्म असते. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते किंवा पाण्यात मोठय़ा वनस्पतींवर स्थिरावते. सूक्ष्म शैवालाला हालचालीसाठी एक किंवा दोन सूक्ष्म तंतू असतात. उदा. क्लॅमिडोमोनोस वॉलवाक्स. एकपेशीय शैवाल एवढे सूक्ष्म असतात की त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग करावा लागतो.

बहुपेशीय शैवालाच्या आकारात आणि प्रकारात विविधता असते आणि ते एखाद्या वनस्पतीच्या प्राण्यांच्या कवचावर किंवा  इतर निर्जीव वस्तूंचा आधार घेत पाण्यात वाढते.

शैवालाचे वर्गीकरण त्यांच्या पेशीत असणाऱ्या रंगीत द्रव्यानुसार ठरविली जाते. नील-हरित शैवाल, हरित शैवाल,  पिवळसर शैवाल आणि लाल शैवाल असे चार प्रकार असतात.

डॉ. सी. एस. लट्ट, मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org