दुसऱ्या व्यक्तीच्या मनात उठणारे विचार, समस्या आणि संवेदना यांचा अनुभव आपण घेऊ शकणे; या प्रक्रियेला परभाव अनुभवतेची जाण घेणे, असे म्हटले जाते. तसे करू शकल्यास, दिलेल्या परिस्थितीत दुसरी व्यक्ती कशी वागेल, याचा अचूक अंदाज सहसा घेता येतो. एका अर्थाने ती एक कला मानली जाते. मात्र प्रभावी व्यवस्थापनासाठी हे कळीचे ठरते. परभाव अनुभवतेची चांगली जाण असू शकणारा व्यवस्थापक अनेक प्रश्न उद्भवणे मुळातच टाळू शकतो.

बुद्धिमत्ता गुणांक आणि भावनिकता गुणांक मापनाबरोबरच परभाव अनुभवतेचे मोजमापन करणे, हेदेखील महत्त्वाचे ठरू लागले आहे. या संदर्भात परभाव अनुभवता गुणांक (एम्पेथी कोशंट) मोजण्यासाठी बरेच संशोधन चालू आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजणे आणि त्याचे मन वाचता येणे हे परभाव अनुभवतेचे दोन मोठे घटक अनेकदा स्वतंत्र नसून एकत्रित निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांचा एकजिनसी विचार करावा लागतो.

परभाव अनुभवता गुणांक प्राप्त करण्याच्या पद्धती या सामान्य व्यक्ती तसेच मानसिक वाढ नीट न झालेल्या व्यक्तींसाठीही विकसित केल्या गेल्या आहेत. त्यातील दोन पद्धती प्रमुख असून त्या सांख्यिकी तत्त्वांवर आधारित आहेत. ‘रॅश मॉडेल’ आणि ‘कन्फम्रेटरी फॅक्टर अ‍ॅनालेसिस’ अशा नावांनी त्या ओळखल्या जातात. काही वेळा त्या दोघांचे मिश्रण वापरले जाते.

अशा चाचणी परीक्षेत सहसा १६, २६ किंवा ४० मिसळलेली विधाने (अर्धी समर्थन आणि अर्धी असमर्थन अशा प्रकारची, ज्यामुळे पक्षपात टाळला जातो) असतात. त्या प्रत्येक विधानाबाबत उमेदवाराने मत व्यक्त करणे अपेक्षित असते. मत व्यक्त करण्यासाठी पुढील चार पर्याय दिलेले असतात: १) पूर्ण समर्थन, २) आंशिक समर्थन, ३) आंशिक असमर्थन  आणि ४) पूर्ण असमर्थन. त्या पर्यायांना ठरवलेल्या गुणांद्वारे सांख्यिकी विश्लेषणाने परभाव अनुभवता गुणांक काढला जातो. हा गुणांक मोठा असलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे मन ओळखण्यात अधिक सक्षम मानली जाते. साधारण लोकांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचा परभाव अनुभवता गुणांक बहुधा मोठा असल्याचे आढळते.

भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक क्षमतांचे मोजमापन करणे, हे फार कठीण असले तरी त्या संदर्भात विश्वसनीय असे बुद्धिमत्ता, भावनिकता आणि परभाव अनुभवता गुणांक बरेच मदत करतात, असे आढळले आहे.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

सुमित्रानंदन पंत- पुरस्कार

सुमित्रानंदन पंत हे एक प्रमुख छायावादी कवी. काव्यासंबंधीचे त्यांचे चिंतन, त्यांचे विचार ‘पल्लव’ या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत प्रामुख्याने स्पष्ट झालेले दिसतात. ते म्हणतात- ‘‘नव्या जीवनाच्या जाणिवा, नवा आशय, नवे भावनाविश्व, व्यक्त करण्यासाठी ब्रजभाषा अपुरी आहे. काव्य आणि काव्यभाषा गतिशील प्रवाही जीवनाशी अनुसंधान साधणारी असायला हवी,’’ अशी भाषा आणि अभिव्यंजनेचे विविध प्रकार त्यांनी प्रत्यक्ष काव्यातून शोधले, निर्मिले, वापरात आणण्याचे फार मोठे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे आणि ही काव्यविषयक जाणीव चर्चेपुरती मर्यादित न ठेवता, त्यांच्या कवितांतून समर्थपणे व्यक्त केली आहे. अशा प्रकारे पंतांनी खडीबोलीला काव्यभाषा म्हणून अतिशय संपन्न केले आहे. त्यांनी भाषेवर संस्कार करण्याचे, भाषेचे सामथ्र्य प्रकट करण्याचे, काव्याला एक आनंददायी रूप देण्याचे कार्य तर केलेच पण नवीन विचारांनी भाषा समृद्ध करण्याचे कार्यही केले. आपल्या साहित्यकृतीद्वारे साहित्यात अनेक मापदंड निर्माण केले. शब्दाची ताकद वाच्यार्थापेक्षाही खूप आहे. हे पहिल्यांदा जाणवण्याचे आणि प्रकट करण्याचे श्रेय त्यांनाच आहे. त्यांनी हिंदीतील खडीबोलीचे सामथ्र्य ओळखून आणि तिचा छंदाच्या माध्यमातून वापर करून ती प्रचलित करण्याचे फार मोठे कार्य केले आहे.

मध्यंतरी एक वेगळीच माहिती वाचनात आली. पेशवाईत उत्तर भारतात जी काही मराठी कुटुंबे स्थायिक झाली, त्यापैकी पंत घराणे एक होते. एका मूळच्या मराठी भाषकाने हिंदीची अभूतपूर्व सेवा केली, ही गोष्ट निश्चितच अभिमानास्पद आहे. सुमित्रानंदन पंतांना महाराष्ट्र व उत्तर भारत यांच्यातील सांस्कृतिक दुवा समजले जाते- ते यथार्थच आहे.

१९६१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरवले. १९६२ मध्ये ‘कला और बुढा चाँद’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९६४ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने एका विशेष साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. तसेच द्विवेदी सुवर्णपदक, हिंदी साहित्य संमेलन, प्रयागचा देव पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ मध्ये हिंदी साहित्य संमेलनात त्यांना ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी देण्यात आली. १९६९ मध्ये गोरखपूर विश्वविद्यालय व विक्रम विश्वविद्यालयाने त्यांना डी. लिट् पदवी प्रदान केली आणि १९६८ मध्ये ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च साहित्यिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com